Goa Corona Update : राज्यात गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. १० टक्क्यांच्या वर असलेला कोरोनाचा संक्रमण दर (पॉझिटिव्हीटी रेट) ही भीतीची छाया आणखी गडद करताना दिसत आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, एप्रिल महिन्यात कोरोनाचा उद्रेक होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेली आरोग्यविषयक संहिता पाळावी, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.
आरोग्य खात्याचे साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत सूर्यवंशी म्हणाले की, आजचाही पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांच्या वर आहे. उपचारासाठी भरती होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. त्यामुळे ‘एसओपी’चे पालन करणे अनिवार्य बनले आहे.
शनिवारी कोरोनाच्या नव्या 117 बाधितांसह राज्यातील एकूण बाधितांचा आकडा 601 झाला आहे. आज घेतलेल्या 969 संशयितांच्या चाचण्यांमध्ये 117 नवे बाधित सापडले.
गेल्या 13 मार्चपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे राज्यात एन्फ्ल्युएंझाचेही रुग्ण आहेत. हे दोन्हीही विषाणू वेगवेगळे आहेत. मात्र, एकाच वेळेला हे दोन्हीही विषाणू रुग्णाच्या शरीरात सापडू शकतात. यामुळे रुग्णाचा धोका वाढतो आहे.
मात्र, पूर्वानुभवानुसार एप्रिल मध्यापर्यंत एन्फ्ल्युएंझा कमी होईल आणि पुन्हा ऑगस्टमध्ये वाढेल. त्यामुळे सध्या तरी एन्फ्ल्युएंझाचा धोका कमी झाला आहे. तथापि, एप्रिलच्या मध्यावर कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.
नव्याने सापडणारे व्हेरियंट जुनेच आहेत, हे आतापर्यंतच्या प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालानुसार सिद्ध होत आहे. तरीही जिनोम सिक्वेलिंगच्या अहवालासाठी राज्यातून नमुने पाठवले आहेत.
कोरोना बचावासाठी राज्यात झालेल्या लसीकरणाचे प्रमाण समाधानकारक असल्याने कोरोनाचा जीवघेणा धोका काहीसा कमी झाला आहे. मात्र, नागरिकांनी सतर्कता बाळगून कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असेही डॉ. प्रशांत सूर्यवंशी म्हणाले.
कोरोनामुळे आज कोणाचा मृत्यू झाला नसल्यामुळे राज्यातील एकूण बळींचा आकडा 4,014 वर कायम आहे. राज्यात आतापर्यंत 2,60050 नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 2,55,435 नागरिक पूर्णत: बरे झाले असून हे बरे होण्याचे प्रमाण 98.23 टक्के आहे.
राज्यात कोरोनाचे नवे तब्बल 117 रुग्ण
दिवसा 200 हून अधिक बाधित शक्य
यापूर्वीचा कोरोना उद्रेकाचा अनुभव पाहता बाधितांची संख्या प्रतिदिन 200 पेक्षा जास्त होऊ शकते. सध्या ती 120 च्या दरम्यान आहे. हा उद्रेक येत्या महिन्याभरात कधीही होऊ शकतो. एन्फ्ल्युएंझा आणि कोरोनाच्या लक्षणांमध्ये बऱ्याच अंशी साम्य आहे. त्यामुळे नागरिकांनी तपासणी करून घेणे जास्त हितकारक आहे. बाधित सापडल्यास स्वत:हून विलगीकरणात राहणे कोरोना थोपवण्यासाठी फायद्याचे ठरेल.
जिनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुने पुण्याला : सध्या वाढत असलेला कोरोना हा कोणत्या व्हेरियंटचा आहे, हे तपासण्यासाठी काही नमुने म्हापसा येथील उपजिल्हा रुग्णालयात उभारलेल्या विषाणू प्रयोगशाळेत पाठवले आहेत. दर आठवड्याला केवळ २४ नमुन्यांची तपासणी येथे करता येते. तर काही नमुने पुणे येथील विषाणू प्रयोगशाळेत पाठवले असून तेही प्रलंबित आहेत.
एप्रिल-मे चा अनुभव वाईटच
यापूर्वी कोरोनाच्या तीन लाटा या एप्रिल-मे दरम्यानच आल्या होत्या. या नेमक्या याच कालावधीत का येतात, याचे संशोधन सुरू आहे. खरे पाहता हा कालखंड उष्ण असतो. अशा स्थितीत विषाणू संक्रमण कमी होणे अपेक्षित असतानाही ते वाढते आहे.
...तर नवा कक्षही
सध्या गोमेकॉत बाधितांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. मात्र, शुक्रवारी राज्यातील सर्व प्राथमिक, उपजिल्हा आणि दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात आवश्यकता भासल्यास कक्ष सुरू करण्यात येईल. यासाठी तशा जागांची निवड करण्यात आली आहे. तसेच सतर्कचे आदेश प्रशासनाच्या वतीने दिले आहेत, अशी माहिती कृती दल सदस्यांनी दिली.
10,11 एप्रिल रोजी मॉक ड्रिल
केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनेनुसार राज्यात 10 आणि 11 एप्रिल रोजी कोरोनासंबंधी मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. यावेळी रुग्णालयातील व्यवस्था, खाटांची संख्या, वाहतूक व्यवस्था, रुग्णवाहिकांची संख्या, पीपीई किट, मास्क, औषधे, ऑक्सिजन, वापरलेल्या साहित्याची विल्हेवाट याबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात येणार आहे.
विशेष कक्षात 21 रुग्ण दाखल
अधिकच्या उपचारांसाठी विशेष कक्षात शनिवारी 21 रुग्ण दाखल झाले आहेत. गेल्या आठ दिवसांत सातत्याने यात वाढ होत आहे. यासाठीच आणखी कक्ष उभारण्याची तयारी प्रशासनाने केली असून जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयांना तशा सूचना केल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.