तृणमूलचे गोव्यात ‘बारा’ का वाजले?

तृणमूल कॉंग्रेस हा पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष. या पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना बंगालात ‘बंगालची वाघीण’ असे संबोधले जाते. पण का कोण जाणे, निवडणुकीला सहा महिने असताना त्यांची नजर गोव्याकडे वळली. आता का वळली, या प्रश्नाला नेमके उत्तर सापडत नाही.
Goa TMC
Goa TMC Dainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

तृणमूल कॉंग्रेसच्या ‘भुलभुलैय्या’ला गोव्यात अनेक दिग्गज बळी पडले. सुरुवातीला ज्या अकरा जणांना पश्चिम बंगालमध्ये नेऊन ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत सदस्यत्व दिले, त्यात एन. शिवदास, राजेंद्र काकोडकर यांसारखे लेखकही होते. आता लेखकांना ‘विचारवंत’ ही उपाधी दिली जाते. त्यामुळे कोणत्याही गोष्टींचा विचार करून हे लोक निर्णय घेत असतात, अशी एक समजूत आहे. त्यामुळे गोव्यात नवीनच आलेल्या तृणमूलला भुलण्यासारखे या लोकांनी काय पाहिले, याचे कारण आजसुध्दा सापडत नाही.

Goa TMC
'वास्को कदंब बसस्थानक प्रकल्प मार्गी लावणार'

तृणमूल हा जरी बंगालमध्ये मोठा पक्ष असला तरी बंगालची आणि गोव्याची विचारसरणी फार भिन्न आहे, हे या लोकांनी लक्षात घ्यायला हवे होते. यामागे अर्थकारण असेल तर ते बुध्दिवंतांच्या बाबतीत संयुक्तिक वाटत नाही, हेही तेवढेच खरे आहे. नंतर तृणमूलमध्ये प्रवेश करण्याची जणू शर्यतच लागली. माजी आमदार किरण कांदोळकर, माजी मुख्यमंत्री तथा माजी खासदार चर्चिल आलेमाव तसेच माजी मुख्यमंत्री तथा नावेलीचे तत्कालीन आमदार लुईझिन फालेरो हे यापैकी महत्त्वाचे मोहरे होते. लुईझिनना राज्यसभेची खासदारकी मिळाल्यामुळे ते पावन झाले असतील; पण बाकीच्यांची मात्र गोचीच झाली. किरण कांदोळकर हे आता गळा फाडून तृणमूलच्या विरोधात बोलत असले तरी त्यांनी आधी आपण या पक्षात का आलो, याची कारणे द्यायला हवीत.

वास्तविक कांदोळकर हे गोवा फॉरवर्डचे कार्याध्यक्ष होते. त्यांना थिवी मतदारसंघाची उमेदवारीसुध्दा मिळाली असती आणि ते थिवीतून निवडून येण्याची शक्यताही अधिक होती. पण आपल्या सौभाग्यवतींना थिवीची आमदारकी मिळावी, या हेतूने पछाडलेल्या कांदोळकरांनी फाॅरवर्डचा राजीनामा दिला आणि तृणमूलतर्फे स्वतःला हळदोणेमधून तर पत्नी कविता यांना थिवीतून उमेदवारी प्राप्त करून घेतली. याचा अर्थ पत्नी मोहापोटी त्यांनी नजरेच्या टप्प्यात असलेली थिवीची आमदारकी गमावली. त्याचबरोबर गोवा फॉरवर्डला एक पाऊल मागे जाण्यास भाग पाडले. परवा फॉरवर्डचा एक पदाधिकारी हेच सांगत होता. कांदोळकरांमुळे आमची थिवीची आयती जागा गेली, असे त्यांचे म्हणणे होते. यामुळेच असेल, पण कांदोळकरांची परिस्थिती सध्या ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. ते स्वतः तर हरलेच; पण पत्नीलाही विजयाने हुलकावणी दिली.

चर्चिलबद्दलही तेच सांगता येईल. वास्तविक चर्चिल हे गोव्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा होते. त्यांनी जर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करुन उमेदवारी मिळवली असती तर आज तेच बाणावलीचे परत एकदा ‘सिकंदर’ ठरले असते. पण त्यांना आपल्याबरोबर कन्या वालंका यांनाही उमेदवारी हवी असल्यामुळे त्यांनी उमेदवारीचे ‘दुकान’ उघडलेल्या तृणमूलमध्ये प्रवेश केला; पण दोघेही विजयाच्या किनाऱ्यापर्यंत पोहचू शकले नाहीत. याचा अर्थ या सगळ्या लोकांनी तृणमूलमध्ये प्रवेश करण्याकरिता स्वार्थाचे गणित मांडले. त्यामुळे आता पश्चात्ताप करून काहीही फायदा नाही. ‘अब पछताने से क्या फायदा, जब चिडिया चूग गयी खेत’ ही जी हिंदीत उक्ती आहे, तिची अशा प्रसंगी आठवण येते.

तृणमूलची नीती म्हणजे ‘चार आण्याची कोंबडी आणि दहा आण्याचा मसाला’ अशा प्रकारची होती. त्यात ‘मृगजळ’च अधिक होते आणि याचा कोणीही विचार केला नाही. मगोपसारख्या पक्षानेसुध्दा तृणमूलशी युती करून स्वत:चा घात करून घेतला. निवडणुकीच्या वेळी मतदारसंघात फिरताना याचा अंदाज येत होता. शिरोडा, प्रियोळ, डिचोली, पेडणे, मये, मांद्रे यासारख्या मतदारसंघात मगोपने तृणमूलशी युती करायला नको होती, असाच सूर उमटत होता आणि त्याचे फळही मगोपला या निवडणुकीत मिळाले. त्याचबरोबर रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी जो गोमंतकीयांना गृहीत धरण्याचा प्रयत्न केला, तो त्यांच्या अंगलट आला.

Goa TMC
गोव्यातील उच्चशिक्षित तरुणाची दूग्धव्यवसायातून बक्कळ कमाई

तृणमूलमध्ये प्रवेश करावा म्हणून माझ्याकडे ‘आयपॅक’चे शुभमसारखे कार्यकर्ते तसेच राज्यसभेचे खासदार डॉ. शंतनू सेन आले होते. त्यावेळी मी त्यांना पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हटलेल्या ‘अजब है ये गोवा के लोग’ या वाक्याची आठवण करून दिली होती. पण त्यांचा आत्मविश्वास कल्पनेपलीकडचा होता. त्यांची एक खासियत म्हणजे, ते कोणाकडे जायचे तर त्या व्यक्तीची पुरेपूर चौकशी करून जात असत. त्यामुळेच त्या व्यक्तीची ‘बलस्थाने’ तसेच कच्चे दुवे त्यांना माहीत असायचे. त्यामुळेच गोव्यातील बरेच दिग्गज लोक त्यांच्या नादी लागले असावेत, असे वाटते. केवळ सहा महिन्यांत गोवा पादाक्रांत करता येत नाही, हे त्यांना कळायला हवे होते. आतापर्यंत ते कोणत्याही पक्षाला जमलेले नाही.

भाजप-कॉंग्रेससारख्या राष्ट्रीय स्तरावरच्या पक्षांना सुध्दा गोव्यात प्रवेश करण्याकरिता मगोपसारख्या पक्षाची मदत घ्यायला लागली होती आणि तरी त्यांचा प्रवेश सुखासुखी झाला नव्हता. तृणमूलने कदाचित याकरिता मगोपचा आसरा घेतला असावा. पण या आसऱ्याचा परिणाम असा झाला की ते तर बुडालेच, त्याबरोबर मगोपलाही गटांगळ्या खाव्या लागल्या. आता तृणमूलचा गोव्यातील अध्याय संपल्यातच जमा आहे. सध्या या पक्षात प्रवेश केलेल्यांचे राजीनामा देण्याचे सत्र सुरू झाले आहे. त्याचबरोबर ज्यांची बिले थकली आहेत, तेही कंठशोष करताना दिसत आहेत. हे पाहता तृणमूलची सध्या ‘शिमगा संपला तरी कवित्व उरले’ अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे सध्या तरी तृणमूलचे गोव्यात बारा वाजले आहेत. आता ते लोकसभेच्या वेळी परत गोव्यात उतरतात, की कायमचा गाशा गुंडाळतात याचे उत्तर येत्या वर्ष-दीड वर्षातच मिळणार हे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com