खरी कुजबुज.....फोंडा तालुक्यात खरेच आलेत ‘अच्छे दिन’

फोंडावासीयांची सध्या ‘देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी’ अशी अवस्था झाली आहे.
खरी कुजबुज.....
खरी कुजबुज.....Dainik Gomantak

फोंडा: फोंडा तालुक्यात चार मंत्री असल्यामुळे सध्या गोव्यातील सर्वात ‘गब्बर’ तालुका म्हणून फोंडा तालुक्याकडे पाहिले जात आहे आणि या चारही मंत्र्याकडे सध्या गर्दी ओसंडून वाहताना दिसते आहे. काहीजण तर फक्त आपली छबी दिसावी म्हणून मंत्र्याच्या दरबारात हजेरी लावताना दिसतात. आतापर्यंतच्या इतिहासात एका तालुक्याला मंत्र्याच्या रूपात शंभर टक्के प्रतिनिधित्व मिळाल्याचे उदाहरण नाही.

यामुळे फोंडावासीयांची सध्या ‘देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी’ अशी अवस्था झाली आहे. आता हे मंत्री कोणाला काय देतात हे मात्र बघावे लागेल. मात्र, जो तो आपल्या झोळीत काहीतरी पडेल या अपेक्षेने या मंत्र्यांचे उंबरठे झिजवताना दिसत आहेत. देण्याचे नंतर बघूया पण सध्या चार मंत्र्यामुळे फोंडा तालुक्याला खरेच ‘अच्छे दिन’ आले आहेत यात मात्र संशयच नाही. आता हे ‘अच्छे दिन’ किती लोकांवर आपली किरणे फाकतात हे पाहावे लागेल एवढे खरे.

खरी कुजबुज.....
भाजप कार्यकर्त्यांची पणजीत निदर्शने...

डोरिस पुन्हा बाबांच्या गोटात?

मडगावचे बाबा म्हणजे दिगंबर कामत हे तसे हुशार राजकारणी. ते आपल्या कट्टर विरोधकांनाही आपल्याकडे कसे वश करून घेतात हे त्यांच्या विरोधकांनाही कळत नाही. मग पूर्वी त्यांना जवळ असलेले, पण नंतर सोडून गेलेल्यांची बात सोडाच. तृणमूल काँग्रेसची मडगावात आपल्याला उमेदवारी मिळणार या आशेने ऐन निवडणूक तोंडावर आलेली असताना बाबांच्या जवळ असलेल्या डोरिस टेक्सेरा यांनी बाबांची साथ सोडून दीदींची दोन फुले जवळ केली, पण तिथे त्यांची निराशा झाल्याने त्यांनी निवडणुकीपूर्वीच या पक्षाला रामराम ठोकला. ही गोष्ट जरी खरी असली तरी त्या कोणत्याच राजकीय पक्षात परत सामील झाल्या नव्हत्या. मात्र, काही दिवसांपूर्वी त्या बाबांच्या मालभाट येथील घरी दिसल्या आणि सर्वांमुखी एकच वाक्य उमटले... झाले तर डोरिस बाई पुन्हा बाबांसाठी सक्रिय झाल्या! ∙∙∙

शपथविधीची ऐशीतैशी

प्रमोद सावंत सरकारचा शपथविधी होऊन महिना उलटून गेला आहे. अगोदर शपथविधीस झालेल्या विलंबामुळे, नंतर खातेवाटपाच्या विलंबामुळे हा शपथविधी चर्चेत राहिला, तर आता या शाही सोहळ्यावर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या चुराड्याचा विषय चर्चेत आला आहे. या चर्चेतून साध्य काहीच होणार नाही. खरे तर शपथविधी हे राष्ट्रपती भवन वा राजभवन येथेच होणे अनिवार्य होणार नाही, तोपर्यंत अशी स्टंटबाजी चालूच राहील. त्यासाठी जनजागृती गरजेची आहे. पण खरेच ती होईल का? ∙∙∙

गिरीश पुन्हा मास्तराच्या भूमिकेत

काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर हे खरे तर हाडाचे शिक्षक, पण मध्येच त्यांना राजकारणात जाण्याची हुक्की आली. त्यांना दिल्लीत बोलावले गेले. राहुल गांधी यांनी त्यांना तेथे राष्ट्रीय स्तरावरील जबाबदाऱ्याही दिल्या. दिल्लीत काँग्रेस वर्तुळात वजन असलेल्या गिरीशरावांना गोव्यातील गल्लीचे राजकारण मात्र जमले नाही. गोव्यात काँग्रेस पक्षाची सुत्रे त्यांच्याकडे आली. गोव्यात काँग्रेस आमदारांची संख्या १७ वरून दोनवर आली. त्यामुळे त्यांना हे पद सोडावे लागले. आता गिरीशराव पुन्हा आपल्या अध्यापकाच्या भूमिकेत शिरले आहेत. चांगले राजकारणी घडविण्यापेक्षा चांगले विद्यार्थी घडविणे बरेच सोपे हे त्यांना एव्हाना कळून चुकलेही असेल. ∙∙∙

मिकींचा थयथयाट

मिकी पाशेको स्वतःला कोण समजतात ते त्यांनाच माहीत. यापूर्वी ते राष्ट्रवादीत मंत्री असताना त्यांच्यावर नादिया प्रकरण थोपवून त्यांना तुरुंगात डांबले आणि त्यानंतर या पक्षाला धडा शिकविण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी सोडून गोवा सुराज पार्टी जवळ केली, पण तिथेही त्यांची डाळ शिजली नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसी दामाद रॉबर्ट वाध्रा यांचे बोट पकडून काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.

त्यावेळी त्यांना गोवा काँग्रेसमध्ये कुठलेही पद नसतानाही त्यांनी काँग्रेसच्या बड्या नेत्यांना सल्ले देण्याबरोबरच गोव्यातील काँग्रेस मीच साफ करणार अशी वक्तव्ये सुरू केली. त्यावेळी ते आपण बाणावलीचे आमदार झालोच या थाटात वावरायचे. मात्र, शेवटच्या क्षणी काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारली आणि ते पुन्हा स्वगृही म्हणजे राष्ट्रवादीत सामील झाले. आता त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांना दोष द्यायला सुरवात केली आहे. मिकी स्वतःला समजतात तरी कोण? ∙∙∙

राजेश वेरेकरांची ‘काँग्रेस’

राजेश वेरेकर हे फोंडा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार होते. थोड्या मतांनी पराभव झाला असला तरी राजेशनी काँग्रेस सोडलेली नाही. त्यांच्या कार्यालयावर असलेला काँग्रेसचा झेंडा आजही कायम आहे. त्याचप्रमाणे पक्षाच्या बैठकाही आयोजित केल्या जात आहेत. मात्र, आपण पुढची निवडणूक लढविणार की नाही याबाबत ते बोलत नाहीत. आपले समाजकार्य मागेही सुरू होते आणि पुढेही सुरू राहणार एवढे मोघम ते बोलतात.

काहीजण आपल्या समाजकार्याचा ज्यारीतीने डंका पिटतात त्या पार्श्‍वभूमीवर वेरेकरांची ही शांतता बरेच काही सांगून जाते. पुढील पाच वर्षांत काय होणार हे सांगणे कठीण असल्यामुळे उगीच ‘शीतापुढे मीठ खाणे’ हे बरोबर नाही हे कोणीही सांगू शकेल. उथळ पाण्याला खळखळाट फार पेक्षा कधी कधी संयमच मदतीला येत असतो असे बोलले जाते ते उगाच नव्हे. सध्या वेरेकरांच्या रुपाने फोंडा तालुक्यात काँग्रेस जिवंत राहिली आहे एवढे मात्र खरे. आता ‘सब्र का फल मिठा होता है’ की ‘नही’ याचे उत्तर काँग्रेसला व वेरेकरांना मिळायला आणखी पाच वर्षे जावी लागणार आहे एवढे मात्र निश्‍चित. ∙∙∙

कुठे गेल्या रणरागिणी?

यापूर्वी राज्यात ज्यावेळी कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर होते, त्यावेळी जीवनावश्‍यक वस्तूंची दरवाढ व्हायचा अवकाश, भाजपच्या रणरागिणी कॉंग्रेसवर अक्षरश: तुटून पडायच्या. आंदोलन, मोर्चे यांनी शहरे दुमदुमून जायची. पण आज तोच भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे आणि महागाईचा कडेलोट होऊनही कोणी आंदोलन करताना दिसत नाही, ही केवळ खेदाची नव्हे, शरमेची बाब म्हणावी लागेल.

म्हणजे त्यांचा आटापिटा केवळ राजकीय हेतूने होता, असे म्हणायला भरपूर वाव आहे. विशेष म्हणजे, यावर विरोधी पक्षही मूग गिळून गप्प आहेत, ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे. मग सामान्य जनतेचा कैवार घ्यायचा तरी कुणी? मधल्या काळात कॉंग्रेसमध्ये असताना प्रतिमा कुतिन्हो अधूनमधून महागाईच्या विरोधात आंदोलने करताना, रस्त्यावर चूल मांडून जेवण बनवताना दिसायच्या. आता त्या ‘आप’मध्ये गेल्या आणि दिसेनाशाच झाल्या आहेत. याला काय म्हणावे? काळाचा महिमा, की राजकीय सुस्ती? ∙∙∙

हॉकीतील जोश

पेडे-म्हापसा येथे ॲस्ट्रो टर्फ हॉकी मैदान सुविधा उपलब्ध झाल्याने त्या ठिकाणी राष्ट्रीय सबज्युनियर मुलांची स्पर्धा घेणे शक्य झाले, पण गोव्यातील हॉकीमध्ये अजून व्यावसायिकता आणि समर्पित भावनेचा अभाव दिसतो. गोव्याच्या मुलांनी स्पर्धेतील दोन सामन्यांत जोशपूर्ण खेळ केला. दिल्लीला बरोबरीत रोखले, नंतर पुदुचेरीचा धुव्वा उडविला.

जिगरबाज खेळ केलेल्या या मुलांना पहिल्या सामन्यापूर्वी काही मिनिटे अगोदर जर्सी व साहित्य मिळाले होते. हा सारा समन्वयाच्या अभावाचा परिणाम आहे. हॉकी खेळाची गोव्यात अफाट गुणवत्ता आहे, पण संघटनेकडे वेग नाही. मूळ गोमंतकीय, पण गोव्याबाहेर जाऊन देशातर्फे आंतरराष्ट्रीय हॉकीत सफल ठरलेल्यांची यादी मोठी आहे. आता राज्यात साधनसुविधा येत आहेत, हॉकी गुणवत्तेला खतपाणी घालण्यासाठी उत्साह हवा आहे. ∙∙∙

आयपीएल मैदानावर गोविंद गावडे..!

गोव्यात येत्या पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडयम उभारण्याचा क्रीडामंत्री गोविंद गावडे यांचा निर्धार आहे, संधी लाभल्यास राज्यात आयपीएल सामने खेळविणे शक्य असल्याचे त्यांनी क्रीडामंत्रिपदाचा ताबा स्वीकारल्यानंतर सांगितले होते. सध्या मुंबई-पुण्यात आयपीएल क्रिकेटची धूम आहे. शनिवारी व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून गावडेसाहेब पुण्यात लखनौ सुपर जायंट्स व कोलकता नाईट रायडर्स यांच्यातील सामना पाहण्यासाठी गेले. तेथे स्टेडियमवर गोव्यातील काही क्रिकेटप्रेमी त्यांना भेटले. त्यांनी क्रीडामंत्र्यांसमवेत फोटो सोशल मीडियावर टाकले आणि मंत्री आयपीएल सामना प्रत्यक्ष स्टेडियमवर पाहत असल्याचे साऱ्यांना कळले. आयपीएलचा झगमगाट पाहून क्रीडामंत्री खूपच उत्साहित होते आणि तेज त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे गोव्यात आयपीएल सामना घेण्याबाबत गावडे पुढाकार घेऊ शकतात असे राज्यातील क्रिकेटपटूंना वाटू लागलेय. ∙∙∙

खाणींचे खापर कोणावर?

गोव्यातील खाणी बंद झाल्यास दहा वर्षे उलटली. त्यानंतर सरकारने त्या सुरू करण्याची अनेक आश्वासने दिली, पण अजून काही त्या सुरू झालेल्या नाहीत. गत विधानसभा निवडणुकीवेळी काहींनी सत्तेवर आल्यास सहा महिन्यांत खाणी सुरू करण्याचे अभिवचन जाहीरनाम्यातून दिले होते, पण लोक काही त्यांच्या या वचनाला भाळले नाहीत की त्यांना सत्तेप्रत नेले नाही. मुद्दा तो नाही, सरकारने खाणी आपल्या ताब्यात घेण्याची पावले उचलताना लीज संपलेल्या खाणमालकांना त्या जागा मोकळ्या करण्याची नोटीस दिलेली असतानाच मायनिंग फ्रंटच्या नेत्यांनी खाण समस्येला भाजप जबाबदार असल्याचा केलेला आरोपाचा खरा मुद्दा आहे. वास्तविक गेली दहा वर्षे या मुद्यावर भरपूर ऊहापोह झालेला आहे. असे असताना मायनिंग फ्रंटने शिळ्या कढीला ऊत देऊन काय साधले असा सवाल त्या वर्तुळातच केला जात आहे. ∙∙∙

खरी कुजबुज.....
'आमदार विरेश बोरकरांनी आमच्‍या विरोधात केलेली धमकीची तक्रार चुकीची'

जिल्हा पंचायत भवने

दक्षिण गोवा पंचायतीपाठोपाठ आता उत्तर गोवा पंचायतही जिल्हा पंचायत भवन उभारणार आहे. नवे अध्यक्ष सिध्देश नाईक यांनीच तसा संकेत दिला आहे. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीने यापूर्वीच तसा ठराव घेऊन जागाही निवडली आहे. मात्र, निधी व अधिकार याबाबत सतत नाराजी व्यक्त करणारे जिल्हा पंचायती भवने उभारून काय साध्य करणार, त्यांच्या होणाऱ्या बैठकांना काहीच अर्थ नसतो, त्यांच्याकडे स्वतःचा महसुल नसतो असे असताना भवनांचा अट्टाहास कशासाठी असे प्रश्न या संस्थांशी जवळचा संबंध असलेले करत आहेत. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीस जुन्या जिल्हाधिकारी इमारतीत जागा मिळाल्यावर तेथे साधारण एक कोटी खर्चून अंतर्गत व्यवस्था केली गेली. जिल्हा भवन झाल्यावर हा खर्च वाया जाणार याचा विचार भवनवाल्यांनी करायला हवा. ∙∙∙

मायकल लोबो ‘म्युट’

एकेकाळी भल्याभल्यांच्या नाकी दम आणणारे, भाजपातील वरिष्ठांच्या बंड्या उतरवणारे तत्कालीन भाजपा सरकारातील मंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते मायकल लोबो सध्या डोळ्यांसमोर राजकीय खलबते होत असताना गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे ‘बुरा मत सुनो’, ‘बुरा मत बोलो’ तसेच ‘बुरा मत कहो’प्रमाणे ‘म्युट’ अवस्थेत गेल्याची जोरदार चर्चा सध्या संपूर्ण राज्यात ऐकू येत आहे. मागच्या सरकारात भाजपचे मंत्री असताना मायकल यांच्या तोंडावर असलेले तेज आणि वलय सध्या औषधालाही दिसत नसल्याचे त्यांचे जवळचे मित्र आणि सहकारी खुलेआम सांगतात.

इतकेच नव्हे तर एकेकाळी त्यांच्या निवासस्थानी होणारी लोकांची भाऊगर्दीही दिवसेंदिवस ओसरत चालल्याचे दिसून येत आहे. दहा वर्षे भाजपात मानाची पदे भूषविल्यानंतर मागच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हात पकडलेल्या मायकल लोबो तसेच त्यांच्या पत्नी दिलायला लोबो यांच्यावर ‘युद्ध जिंकलो तरी मैदान हरलो’ असेच म्हणण्याची वेळ आली आहे. गेल्या पंधरवड्यात हडफडेतील डोंगर कापणी आणि पर्रातील शेतजमिनीवरून उद्भवलेल्या वादात लोबो दांपत्य राजकीयदृष्ट्या बॅकफुटवर गेल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. भल्याभल्यांची झोप उडवून त्यांना तुरुंगाची हवा खाण्यासाठी काळ कोठडीत पाठवणाऱ्या व भाजपची धास्ती घेतलेल्या विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी सध्या तरी मौन व्रत धारण केल्याची चर्चा जोरात सुरू आहे. ∙∙∙

पर्यटनवृद्धीचे स्वप्न....

आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून गोवा नावारूपाला आला हे जरी सत्य असले, तरी पर्यटकांना हव्या असलेल्या साधनसुविधा पुरविण्यात अजूनही सरकारला म्हणावे तसे यश आलेले नाही. अनेकवेळा सरकारकडून पर्यटनवृद्धीसाठी अनेक घोषणा केल्या जातात, पण त्या प्रत्यक्षात येत नाहीत. दिलीप परुळेकर पर्यटनमंत्री असताना त्यांनी गोव्यात पर्यटकांसाठी पाण्यातून आणि रस्त्यावरून धावणारी बस आणण्यासाठी प्रयत्न केले होते, पण ती योजना योजनाच राहिली. प्रत्यक्षात गोव्याच्या पाण्यात ती अँफिबियस बस उतरलीच नाही. आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात पर्यटनवृद्धीसाठी केंद्रीय जहाज बांधणी आणि जलमार्ग वाहतूकमंत्री सर्वांनंद सोनीवाल यांच्याशी सागरमाला प्रकल्पातील ‘सी प्लेन’संदर्भात चर्चा केल्यानंतर ‘सी प्लेन’, लहान विमाने गोव्याची पर्यटन क्षमता वाढवतील आणि पर्यटनासह आर्थिक संधीची व्याप्ती वाढेल अशी आशा व्यक्त केली आहे. मात्र, खरेच ही योजना प्रत्यक्षात उतरेल? की पूर्वीप्रमाणेच एक योजनाच राहील अशी चर्चा मात्र सुरू झाली आहे. ∙∙∙

- यशवंत पाटील

खरी कुजबुज.....
'यंदा गोव्यात मॉन्‍सून जोरदार बरसणार'

मेरे सपनो में तीन सिलिंडर

कधी कांदे तर कधी टोमॅटो स्वप्नात यायचे, आता तर चक्क तीन सिलिंडर स्वप्नात यायला लागले म्हणे... गोव्यात राजकारण्यांनी खासकरून विरोधकांनी नकली गॅस सिलिंडर खांद्यावर घेऊन मोर्चा काढला होता. कांद्यांचे हार गळ्यात घालून राजधानीत हल्लाबोल केला. मात्र, झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला काही केल्या जाग आली नाही. निवडणुकीपूर्वी सत्तेवर येण्यासाठी भाजपने मोफत तीन सिलिंडर देण्याची घोषणा केली. बिचाऱ्या गृहिणी जाम खूष होत्या आणि त्याच आमिषावर काहींनी भाजप उमेदवारांच्या नावावर शिक्काही मारला. आता सत्तेवर आलेल्या भाजपला ही सिलिंडर योजना डोकेदुखी ठरत आहे. सिलिंडरचा दर इतका वाढेल, याची कल्पना योजनेची घोषणा करताना भाजपला आली नसेल. आता पेट्रालने शंभरी गाठली... सिलिंडरनेही हजारी... योजनेचे काय होणार ते अजून अधांतरीत... मात्र, ते तीन सिलिंडर अनेकांच्या स्वप्नात येत असतील हे मात्र नक्की.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com