Smart City : रायबंदरवासीयांना मरण यातना! स्‍मार्ट सिटीचा फटका

Smart City : घराबाहेर पडणेही झाले मुश्‍‍कील; सर्वत्र धुळीचे साम्राज्‍य
Smart City
Smart CityDainik Gomantak

प्रसाद सावंत

Smart City :

तिसवाडी, ‘स्मार्ट सिटी’ जणू रायबंदरवासीयांचा संयमच पाहत आहे. कामाची मुदत वाढल्याने लोक संतप्त बनले आहेत.

प्रवासाची गैरसोय, धूळ आणि ध्वनिप्रदूषणाला त्‍यांना सामोरे जावे लागतेय. या कामांमध्‍ये नियोजनाचा अभाव असल्‍यामुळे पणजीचे आमदार आणि महानगरपालिकेविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यातही ही कामे पूर्ण होतील असे म्‍हणणेही धाडसाचे ठरेल.

१० मार्च रोजी सुरू झालेली कामे ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याची मुदत होती. जुने गोवा येथील बासेलिका ऑफ द बॉम जीसस चर्च ते पणजी दिवजा सर्कल या टप्प्यातील रस्ता बंद करण्यात आला होता.

Smart City
South Goa : दक्षिणेत काँग्रेसचा ७ हजारांच्‍या मताधिक्‍याने विजय शक्‍य; पक्षाच्या विश्‍लेषकांचा दावा

परंतु ३० एप्रिल उलटून जवळपास अर्धा महिना गेला असला तरी काम पूर्ण होण्याचे चिन्ह दिसत नाही. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिगीस यांनी तर निवडणुकीमुळे मजूर आपल्या गावी गेले, पाऊस अशी कारणे पुढे केली आहेत. आता ३१ मेपर्यंत काम पूर्ण होईल असे त्‍यांनी सांगितले आहे. मात्र ते होईल के नाही असे ठामपणे त्यांना देखील सांगता येणार नसल्याचे रायबंदरवासी बोलतात.

या कामांचा आढावा घेण्यासाठी दै. ‘गोमन्तक’च्या प्रतिनिधीने रायबंदर येथे जाऊन निरीक्षण केले व स्थानिकांसोबत चर्चा केली. काम होत असल्याचा लोकांना आनंद आहे, परंतु त्‍यात नियोजन नसल्‍याने नाराजी आहे.

बससाठी जावे लागते पाटोवर

सर्वाधिक गैरसोय वाहतुकीबाबत झालेली आहे. बस पकडण्यासाठी लोकांना आता पाटो-रायबंदर येथे जावे लागते. त्यात रस्ते खोदले गेल्याने घरी पोहोचण्‍यासाठी मोठी कसरत करावी लागतेय. काम सुरू झाल्यानंतर सर्वत्र धूळ पसरते. पाणी मारूनही देखील घरात धूळ येते. दरदिवशी धूळ खाणे नित्याचे झाले असल्याचे लोक म्हणतात.

स्मार्ट सिटीची कामे कधी पूर्ण होतील हे सांगता येणार नाही. गेल्या दोन महिन्यांपासून कामे सुरू आहेत. आता लवकरच पावसाळा सुरू होणार आहे. तेव्हा रस्ते असतील की नाही याची खात्री देता येत नाही. सर्वत्र खोदकाम केल्‍यामुळे धुळीचे साम्राज्‍य आहे. उद्या एखादा बाका प्रसंग उद्‌भवल्‍यास रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल देखील वेळेत पोचू शकणार नाही.

- विश्‍‍वंभर नाईक, ज्येष्ठ नागरिक (रायबंदर)

गेल्या दोन महिन्यांपासून प्रवास करण्यासाठी आम्हाला कसरत करावी लागतेय. काम नियोजनबद्ध पद्धतीने केले असते तर एवढ्यात पूर्ण देखील झाले असते. परंतु त्‍यात नियोजनाचा अभाव स्‍पष्‍टपणे जाणवतोय. त्यात दर दिवशी आम्हाला धूळप्रदूषण रोखण्‍यासाठी घराबाहेर पाणी मारावे लागतेय. या सगळ्यात ज्येष्ठ नागरिकांची मोठी फरफट होत आहे.

- फिलोमिना लोपेस, ज्येष्ठ नागरिक (रायबंदर)

स्मार्ट सिटी स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. ज्या पद्धतीने काम सुरू आहे, ते पाहता पुढील वर्षीही ते पूर्ण होईल असे वाटत नाही. नागरिकांना होणारा त्रास समजून घेण्याची तसदी कोणी घेत नाही. घराच्या खिडक्या आणि दरवाजे सदाच बंद ठेवावे लागतात. दिवसातून तीनदा बाल्कनी साफ करावी लागते. संयमालासुद्धा काही मर्यादा असतात, हे लक्षात घ्‍यावे.

- जुझे (बाबाश) परेरा (रायबंदर)

Smart City
South Goa : दक्षिणेत काँग्रेसचा ७ हजारांच्‍या मताधिक्‍याने विजय शक्‍य; पक्षाच्या विश्‍लेषकांचा दावा

दुकानदारांवर आलीय माशा मारण्‍याची वेळ

रस्त्याच्या बाजूला असलेली दुकाने, लहान चहाच्या टपऱ्या आणि रेस्टॉरंट्‌सची अवस्‍था तर बेकार झाली आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत होती. त्यात ओल्‍ड गोव्‍याला जाणाऱ्या पर्यटकांचा समावेश होता.

परंतु आता माशा मारत बसण्‍याची वेळ आमच्यावर आली असल्याचे एका व्यावसायिकाने सांगितले. काम होत असल्याचे समाधान आहे, मात्र ते नियोजित वेळेत पूर्ण झाले पाहिजे. आता लवकरच पावसाळा सुरू होईल. त्यानंतर आम्हाला व्यवसाय बंदच करावा लागेल, अशी भीती अनेक व्यावसायिकांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com