Panaji Smart City: पावसाळा निकट आल्याने आम्ही कामे बंद करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी पणजीत पावसाळ्यात काही कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते, याची आम्हाला चिंता आहेच, असे मत सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी आज (ता.15) ‘दै. गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केले.
ते म्हणाले, जीसुडाने मलनिस्सारणासाठी रस्ते 900 मीटर खणून 700 मीटरचे पाईप बसविणे चालविले आहे. त्यात 200 मीटरचा फरक असणारच आहे. जमीन कितीही मातीचा भराव टाकून बुजविली तरी पावसात हे रस्ते खचू शकणार आहेत. त्यावर काही तांत्रिक उपाय नाहीत व असतील तर ते खूप महाग आहेत.
‘पावसाळ्यात पणजीतील रहिवाशांना अडचणीला सामोरे जावे लागेलच, परंतु विकास पाहिजे असेल तर काही त्रास सहन करावा लागेलच. पणजीतील मलनिस्सारण योजना 60 वर्षे जुनी आहे. हे काम नव्याने हाती घेणे भाग होते.
डॉन बॉस्कोजवळ ही लाईन अडकली असल्याचे आढळून आल्याने तिची तातडीने दुरुस्ती हाती घ्यावी लागली. हे काम माझ्या खात्याचे नसले तरी या कामाची मी जिल्हाधिकारी, पालिकेचे मुख्याधिकारी व अभियंत्यांना घेऊन आज पाहणी केली.’
काब्राल पुढे म्हणाले, अनेक रहिवाशांनी मलनिस्सारण जोडणी न घेता आपले सांडपाणी कसेही सोडून दिले आहे. त्यांच्यावर ‘सीआरपीसी’खाली कारवाई करण्याच्या सूचना मी अभियंत्यांना दिल्या आहेत.
पणजीत एकाबरोबरच स्मार्ट सिटी, जीसुडा व साबांखाची कामे सुरू आहेत. ती ३० मेपर्यंत आहेत तशी रेटून बंद करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. सर्वच कामे पूर्ण होणे कठीण; परंतु ती आता बंद करून चार महिन्यांनंतर पूर्ववत सुरू करण्याचा सरकारचा मानस असल्याचे काब्राल म्हणाले.
"शहरात कामे सुरू झाल्यापासून आपण कोणतेही नियोजन न करता ती करण्यात येत असल्याचे सांगत आलो आहोत.
महापौर आणि आमदाराने यापूर्वीच या कामांबाबत हात वर केले आहेत. कोणतेही नियोजन न करता ही कामे करण्यात आली आहेत. नागरिकांनी आता शहरातील लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदार, नगरसेवक निवडताना विचार करायलाच हवा."
उत्पल पर्रीकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.