Women's Day 2023 : दिव्‍यांग महिलांच्या पाठीशी उभे राहा

‘सोलफ्री’च्या संस्थापक प्रीती श्रीनिवासन यांचे शारीरिक मर्यादांपलीकडे पाहण्याचे आवाहन
Preethi Srinivasan
Preethi SrinivasanDainik Gomantak
Published on
Updated on

Women's Day 2023 : वयाच्या 18व्या वर्षी झालेल्या अपघातात लकवा मारल्याने मानेखालचे शरीर बधिर होऊन गेले. या स्थितीचा सामना कसा करावा याची काहीच समज, जाणीव तेव्हा मला नव्हती. ही परिस्थिती माझ्यासाठी योग्य नाही असाच विचार सतत मनात येते असे. त्या काळ्या आठवणींना उजाळा देताना प्रीती श्रीनिवासन सांगतात.

पण मग हळूहळू आसपासची परिस्थितीत मला शिकवू लागली. त्यातूनच मग पूर्णतः स्वीकार, प्रेम आणि परिस्थितीला सामोरे जाण्याची माझी मानसिकता तयार होत गेली. त्यामुळे आयुष्यातील यापुढचा प्रत्येक क्षण हा चमत्कार आहे आणि हा चमत्कार अनुभवण्यासाठी मला आशीर्वाद प्राप्त आहे ही मनाची खूणगाठ पक्की होत गेली.

प्राणावर बेतलेल्या अशा दोन घटनांचा सामना करूनही ध्यास आणि जिद्दीच्या बळावर संकटांवर मात केलेल्या प्रीती सांगतात, कोणत्या तरी भव्य उद्देशासाठीच मी स्वतःला जिवंत ठेवू शकले आहे. समाजाच्या एका वर्गाचे, ज्या काही सामाजिक अस्तित्व नसल्यासारखा आहे आणि ज्याला कोणताही चेहरा किंवा आवाज नाही अशा वर्गाचे प्रतिनिधित्व करणे हा तो उद्देश होय.

2013 साली लज्जा आणि सामाजिक भार यामध्ये दोन दिव्यांग मुलींना विष पाजले गेल्याची बातमी जेव्हा समजली तेव्हा ही समस्या खूपच गंभीर व व्यापक असल्याची जाणीव झाली.

भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या समाजात शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महिलांनाही न्यायासाठी संघर्ष करावा लागतो तेथे शारीरिकदृष्ट्या विकलांग महिलांना सन्मानाने जगायला केवढा मोठा लढा द्यावा लागेल याची गंभीरता समजू लागली.

आई विजयालक्ष्मी श्रीनिवासन यांच्यासमवेत त्यांनी समाजातील शारीरिक विकलांग व्यक्तींचे पुनर्वसन करणे, त्यांना मुख्य समाजप्रवाहात आणणे आणि सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करणे या उद्देशाने सोलफ्री या संस्थेची चेन्नई-तामिळनाडू येथे स्थापना केली.

मणक्‍याच्‍या उपचारांसाठी सोलफ्री इन्स्पायर सेंटर

२० हजार चौरस फुटांवर उभे राहिलेले सोलफ्री इन्स्पायर सेंटर हे भारतातील पहिले अद्ययावत व एकात्मिक असे मणक्याबाबतच्या समस्यांवर उपचारांसाठीचे पुनर्वसन केंद्र ठरले आहे.

मणक्याच्या समस्यांबाबत सर्वसमावेशक उपचार व्यवस्थापन करणारे संशोधन केंद्र तसेच सेंटर ऑफ एक्सलन्स बनवण्याचे उद्दिष्ट श्रीनिवासन यांनी बाळगले आहे.

पारंपरिक वैद्यकीय प्रणालीचा अवलंब करत तसेच उपचारांच्या विविध पद्धतींची जोड देत आम्ही खूप मोठे काम उभारले आहे, असे त्या सांगतात.

आपल्या या म्हणण्याला आधार देण्यासाठी तिरुवनमलई या छोट्याशा, मंदिरांच्या शहरात उभारलेल्या सोलफ्री इन्स्पायर सेंटरच्या माध्यमातून नवे आयुष्य मिळालेल्या, जगण्याची नवी उमेद मिळालेल्या अनेकांच्या यशोगाथांची उदाहरणे त्या सादर करतात.

आयआयटीत पीएचडी प्रवेश घेणारी पहिली दिव्‍यांग महिला

९० टक्के शारीरिक अपंगत्व असूनही आयआयटीमध्ये पीएचडीसाठी प्रवेश घेणारी पहिली महिला अशीही ओळख श्रीनिवासन यांची बनली आहे. भारतातील विकलांग महिलांच्या लढ्याचा हा प्रवास सोलफ्रीमधील आपल्या कार्यातून आणि समाजासमवेत होणाऱ्या आपल्या संवादातून अधोरेखित होईल असा त्यांना विश्वास आहे.

आमच्याबद्दल समाजाला माहिती होईल याची निश्चिती मी करेन. प्रत्येक बदल घडवण्यासाठी एक ठिणगी पुरेशी असते. ती ठिणगी पेटवण्याचे काम मी करेन, अशी आशा त्या व्यक्त करतात.

"सामान्यतः महिलांना दुय्यम, वाईट वागणूक दिली जाते. शारीरिक विकलांगांना तर सामाजिक लज्जेचे कारण व समाजाचे ओझेच मानले जाते. ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे. हा कलंक मोडून काढण्यासाठी आवश्यक बदल प्रथम स्वतःतून (स्त्रियांच्या) आला पाहिजे. येणाऱ्या आव्हानांवर मात करून सतत पुढे गेले पाहिजे."

- प्रीती श्रीनिवासन, ‘सोलफ्री’च्या संस्थापक

पर्वरीत ११ मार्चला करणार मार्गदर्शन

पर्वरी येथील संजय स्‍कूलच्या वतीने महिलादिनाचे औचित्य साधून ११ मार्च रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमास प्रीती श्रीनिवासन यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी आपला जीवनप्रवास, शारीरिक विकलांग महिलांच्या यशोगाथा सादर करत महिलांचे सक्षमीकरणाचे काम गोमंतकीयांसमोर त्‍या सादर करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com