म्हापसा: एस्कॉर्ट मुली पुरवण्याच्या नावाखाली पर्यटकांची लूटमार करून खंडणी मागणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा पर्वरी पोलिसांनी पर्दाफाश केला. बबिता रमेश उपाध्याय (२८, रा. मुंबई) व सुतापा बॅनर्जी (३८, रा. पश्चिम बंगाल) या दोन महिलांसह टॅक्सीचालक दीपक साळगावकर (३७, रा. कांदोळी) या तिघांना अटक करण्यात आली. ही घटना काल शुक्रवारी ३० रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास पर्वरीतील ‘क्लासिक’ हॉटेलमध्ये घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर अन्सारी व त्याचा मित्र शोएब अहमद सादिक हे दोघे पंजाबमधील युवक गोव्यात पर्यटनासाठी आले होते. त्यांचा एस्कॉर्ट संकेतस्थळावर संशयित महिलांशी संपर्क झाला. हॉटेलच्या खोलीवर गेल्यावर संशयित महिलांनी दोन्ही पर्यटकांना मारहाण केली. तसेच पैसे न दिल्यास पोलिसांत बलात्कार केल्याची तक्रार करू, अशी धमकी दिली. त्यामुळे दोन्ही पर्यटकांनी घाबरून नाईलाजास्तव संशयित महिलांच्या बँक खात्यात २० हजार रुपयांची रक्कम जमा केली. त्यानंतर संशयित महिला घटनास्थळावरून पसार झाल्या.
संशयित महिला आरोपींकडून लूटमार व खंडणी वसूल करण्याचे आंतरराज्य रॅकेट चालविले जाते. एस्कॉर्ट मुली असल्याचे भासवून त्या पुरुष पर्यटकांसमवेत हॉटेलमध्ये जातात. हॉटेलच्या खोलीवर गेल्यावर तेथे बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन किंवा मारहाण करून पर्यटकांकडून पैसे उकळतात. संशयितांची पोलिसांनी ओळख पटवली असून शोध सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.