

पणजी: अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी गोव्यात १२ वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या इवान मिगुएल फाल्काओ पॅट्रिसिओ या पोर्तुगीज नागरिकाला उर्वरित शिक्षा पूर्ण करण्यासाठी त्याच्या मायदेशी (पोर्तुगाल) पाठवण्यात आले आहे. एका आंतरराष्ट्रीय करारांतर्गत शिक्षा भोगत असलेल्या कैद्याचे हस्तांतरण होण्याची गोव्यातील ही पहिलीच घटना आहे.
इवान पॅट्रिसिओ याला ‘कौन्सिल ऑफ युरोपच्या कन्व्हेन्शन ऑन द ट्रान्सफर ऑफ सेंटेन्स्ड पर्सन्स’मधील तरतुदींनुसार पोर्तुगालमध्ये पाठवण्यात आले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या हस्तांतरणाला रितसर मंजुरी दिल्यानंतर ही प्रक्रिया पार पडली.
हस्तांतरणाची ही प्रक्रिया सुरुवातीला गोव्यात करण्याचे नियोजित होते. मात्र, गोव्यासाठी थेट विमान सेवा उपलब्ध नसल्याने पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी हा ताबा मुंबईत घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार, गोवा सरकारने समन्वय साधून दोन पोर्तुगीज पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पॅट्रिसिओला मुंबईत त्यांच्या स्वाधीन केले.
पॅट्रिसिओने कोलवाळ कारागृहात आतापर्यंत सुमारे ११ वर्षांची शिक्षा भोगली आहे. आता उर्वरित १ वर्षांची शिक्षा तो पोर्तुगालमधील कारागृहात पूर्ण करणार आहे. आंतरराष्ट्रीय करारांतर्गत एका महत्त्वपूर्ण निर्णयात, गोव्यात अंमलीपदार्थ प्रकरणात १२ वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या एका पोर्तुगीज नागरिकाला उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी त्याच्या मायदेशी पाठवण्यात आले आहे.
आश्वे येथील फुटबॉल मैदानावर अंमलीपदार्थांची डिलिव्हरी करताना पकडण्यात आलेल्या पोर्तुगीज नागरिक इव्हान मिगेल याच्याविरोधातील शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने कायम ठेवली होती. मात्र शिक्षेबाबत काही प्रमाणात दिलासा देत मुख्य गुन्ह्यातील शिक्षा १५ वर्षांवरून १२ वर्षांपर्यंत कमी करण्यात आली होती.
१४ जानेवारी २०१४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गोवा पोलिसांच्या अंमली पदार्थ पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, एक परदेशी नागरिक आश्वे येथील फुटबॉल मैदानावर अंमलीपदार्थांची डिलिव्हरी देण्यासाठी येणार आहे. त्यानुसार, तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक दिनेश गडेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला. संशयित वर्णनाशी जुळणाऱ्या इव्हान मिगेल याला अडवण्यात आले. त्याच्याकडे एक काळ्या रंगाची खांद्यावरची बॅग होती. त्यातून ७२ ग्रॅम एमडीएमए (एक्स्टसी), ५.५ ग्रॅम कोकेन, २.५ ग्रॅम एलएसडी आणि ७८५ ग्रॅम चरस (कॅनॅबिस रेजिन) जप्त करण्यात आले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.