
फोंडा: बुधवारपेठ येथील पालिकेच्या जुन्या मासळी बाजार इमारतीतील पहिल्या मजल्यावरील दुकानदारांनी अखेर मंगळवारी स्थलांतरास प्रारंभ केला आहे. ही इमारत धोकादायक ठरल्यामुळे पालिकेने या इमारतीतील सर्व व्यापाऱ्यांना स्थलांतराची सूचना केली होती.
मात्र कपडे व्यापाऱ्यांना अजून दुकाने दिली नसल्याने त्यांचे स्थलांतर रखडले आहे. यासंबंधी फोंडा पालिकेकडून प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हे कपडे व्यापारी स्थलांतर करतील, असे या व्यापाऱ्यांनी सांगितले.
जुन्या जीर्ण झालेल्या मासळी मार्केटच्या जागी नवीन इमारत बांधण्याचे पालिकेने ठरवले असून त्यासंबंधी सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आले आहेत. त्यापूर्वी मासळी विक्रेत्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
फक्त किरकोळ वस्तू विकणाऱ्या तसेच कपडे व्यापाऱ्यांचे स्थलांतर अडून पडल्यामुळे या इमारत बांधकामाला सुरवात करण्यात आली नव्हती, मात्र आता व्यापाऱ्यांनी स्थलांतर करण्यास सुरवात केल्यामुळे येत्या काही दिवसांतच ही जुनी इमारत पाडून त्याजागी नवीन इमारत उभारण्यात येणार आहे.
चतुर्थीला चार दिवस शिल्लक असताना फोंडा पालिकेने या व्यापाऱ्यांना स्थलांतरासाठी तगादा लावला होता. मात्र जागा निश्चिती झाली नसल्याने दुकानदारांनी स्थलांतरास विरोध करताना चतुर्थीनंतरच स्थलांतर करू असे पालिकेला सांगितले होते. हे प्रकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व स्थानिक आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांच्यापर्यंत गेल्यानंतर मुख्यमंत्र्यानी पालिकेसोबत चर्चा करून ऐन चतुर्थीत स्थलांतर नको, मात्र २ सप्टेंबरला हे स्थलांतर करण्याचे निश्चित केले होते, त्यानुसार आता हे स्थलांतर होत आहे.
मासळी मार्केटची इमारत जीर्ण झाली असून गेली चार दशके उभी असलेल्या या इमारतीच्या स्लॅबचे तुकडे पडत होते, शिवाय इमारतीच्या पायाकडील सिमेंटही सुटत चालल्याने ही इमारत केव्हाही कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता, म्हणून नव्याने इमारत बांधून त्यात पालिका बाजार थाटण्याचे नियोजन पालिकेने मंत्री रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते, या नवीन इमारत बांधण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आले असून आता व्यापाऱ्यांनी स्थलांतर केल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.