bjp
bjp Dainik Gomantak

Ponda News : फोंडा ठरेल भाजपसाठी हुकमी एक्का; राजकीय विश्‍लेषकांचा अंदाज

Ponda News : २२ हजारांची आघाडी मिळण्याचा नेत्यांकडून दावा

मिलिंद म्हाडगुत

Ponda News :

फोंडा, दक्षिण गोवा मतदारसंघात सध्या फोंडा तालुक्याला अतिशय महत्त्व प्राप्त झाले असून या तालुक्यातील आघाडीवर भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांचे यशापयश अवलंबून असणार आहे.

सासष्टीतील आठ मतदारसंघांपैकी किमान सहा मतदारसंघात तरी काँग्रेसला आघाडी मिळणार हे भाजप नेत्यांनी गृहीत धरलेले आहे. त्यामुळे ही आघाडी भरून काढण्याकरिता फोंडा तालुक्यातील ३ मतदारसंघांची मदत लागेल याची जाणीव या नेत्यांना आहे. याकरिता फोंडा शिरोडा व मडकई या तीन मतदारसंघात भाजपला किती आघाडी मिळेल यावर सध्या खल सुरू आहे.काहीजण ‘सायलेंट व्होटर्स’कडे बोट दाखविताना दिसत आहेत.

गेल्या खेपेला या तीन मतदारसंघातून ११ हजाराच्या आसपास आघाडी मिळाल्यामुळे भाजप उमेदवार नरेंद्र सावईकर यांचा पराभव झाला होता असे म्हटले जात होते. त्यावेळी सुभाष शिरोडकर वगळता फोंड्यातील इतर कोणताही मतदारसंघ भाजपच्या दिमतीला नव्हता आणि शिरोडकरही तेव्हा पोटनिवडणुकीत गुंतल्यामुळे लोकसभेकरिता ते पूर्णवेळ देऊ शकले नव्हते.

पण यंदा समीकरणे भाजपच्या बाजूने दिसत आहेत. म्हणूनच हे तीन मतदारसंघ भाजपला हुकमी एक्के ठरणार आहेत. भाजपला २० ते २२ हजारांची आघाडी मिळू शकते, अशी अपेक्षा भाजप नेत्यांची आहे.

मडकईवरही भाजपची मदार

मगो पक्ष सरकारचा घटक असल्यामुळे यावेळी मडकई मतदारसंघातून भाजपला १० ते १२ हजार मतांची आघाडी मिळू शकते असा होरा व्यक्त होत आहे आणि अशी अपेक्षा मगो चे सर्वेसर्वा तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनीही व्यक्त केली आहे.

जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर हेही मताधिक्याबद्दल अतिशय आशावादी आहेत. पल्लवी धेंपे यांचा विजय गृहीत धरून त्यांनी कार्यकर्त्यांना विजयोत्सवाची तयारी सुरू करायला सांगितली आहे. आता यावेळी शिरोड्यातून भाजपला किती आघाडी मिळते हे बघावे लागेल.

गणिते मांडण्यात नेते व्यग्र

सुभाष शिरोडकर यांनी विजयोत्सवाची केलेली तयारी हाही चर्चेचा विषय बनला असून ती तयारी प्रत्यक्षात येते की नाही यावर अनेक मते वर्तविली जात आहेत. कृषिमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनीही भाजपला फोंड्यातून मोठी आघाडी मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

एकंदरीत फोंडा तालुक्यातील तीन मतदारसंघ हे भाजपच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मतमोजणीवेळी या मतदारसंघावर भाजप नेत्यांचे लक्ष लागून राहणार आहे यात शंकाच नाही. सासष्टीतील पिछाडी हे तीन मतदारसंघ किती प्रमाणात भरून काढतात याचा हिशेब करण्यात सध्या भाजप नेते व्यस्त असलेले दिसत आहेत.

चर्चा आणि पैजांना ऊत

लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालावर मंत्र्यांचे भवितव्य ठरणार असल्यामुळे काही मंत्री देवाला पाण्यात ठेवून बसलेले असून आपल्या मतदारसंघातून दक्षिण गोव्याच्या उमेदवाराला जास्तीत जास्त आघाडी मिळावी अशी प्रार्थना करताना बघायला मिळत आहे. आता किती मंत्र्यांना देव पावतो आणि किती जणांचे तारू किनाऱ्यावर लागते याचे उत्तर ४ जूनला दुपारी १२ पर्यंत मिळणार आहे, पण निकाल होण्यापूर्वीच चर्चांना व पैजांना ऊत आला असून त्यामुळे फोंडा तालुक्यातील तीन मतदारसंघातील वातावरण सध्या ‘निकालमय’ झाल्याचे दिसत आहे एवढे मात्र खरे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com