Goa Fishermen: पावसाळा संपल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात मासळी मिळू लागली आहे. पारंपरिक मच्छीमार होड्या घेऊन समुद्रात जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून बांगडे, तारले, पेडवे तसेच अन्य मासळी त्यांच्या जाळ्यात मिळत आहे.
परंतु नेमक्या याच दिवसांत नगरपालिका, एसजीपीडीएने उच्च न्यायालयाचा आदेश पाळताना घाऊक मासळी मार्केटमधील मासळीविक्रेत्यांना तेथून हटविले. त्याचा मोठा फटका पारंपरिक मच्छीमारांना बसला आहे.
यासंदर्भात बोलताना बाणावली येथील पारंपरिक मच्छीमार पेले यांनी सांगितले की, परराज्यांतून येणाऱ्या बांगड्यांची टोपली दोन ते अडीच हजार रुपयांना विकली जाते. आम्हाला आता 500 ते 800 रुपयांना टोपली विकावी लागते. त्यातच मासळी विक्रीसाठी मार्केटही उपलब्ध नाही. माझ्याकडे 90 टोपल्या मासळी होती, पण काल साडेदहानंतर घाऊक मासळीविक्री करू दिली नसल्याने केवळ 40 टोपल्या मासळी विकली गेली व 50 टोपल्या शिल्लक राहिली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
बिगरगोमंतकीय मासळी विकतात, ती बाहेरील राज्यांतून आणली जाते. ते आमच्याकडून मासळी विकत घेत नाहीत. त्यामुळे गोमंतकीयांना ताजी मासळी खाण्यापासून हे सरकार अडवत असल्याचा आरोप पेले यांनी केला. घाऊक मासळी मार्केटमध्ये स्वच्छता पाळा, असा आदेश उच्च न्यायालयाने नगरपालिका व एसजीपीडीएला दिलेला आहे. स्वच्छता राखण्याचे काम त्यांचे आहे. पारंपरिक गोमंतकीय मासळीविक्रेत्यांना हटवा असे म्हटलेले नाही, असा युक्तिवादही पेले यांनी केला.
एसजीपीडीए, पालिका आंधळी आहे का?
मासळीविक्रीचा प्रश्र्न आता पारंपरिक गोमंतकीय मच्छीमार व बिगरगोमंतकीय यांच्यात तापला आहे. अशा परिस्थितीत मडगाव नगरपालिका व एसजीपीडीए एक मोहीम हाती घेऊन बिगरगोमंतकीय कोण व पारंपरिक गोमंतकीय मासळीविक्रेते कोण, हे शोधून काढणार आहे. पण प्रश्र्न असा आहे की एसजीपीडीए व पालिकेचे अधिकारी हे गोमंतकीय कोण व बिगरगोमंतकीय कोण हे ओळखू शकत नाहीत का? हे अधिकारी व कर्मचारी नव्यानेच गोव्यात स्थायिक झालेले आहेत का?
मासेमारी, रेंदेर हे काही व्यवसाय अजूनही गोमंतकीयांकडे आहेत. तेसुद्धा सरकार आमच्याकडून हिरावून घेऊ पाहत आहे. आम्हाला या संकटातून कुणी तरी बाहेर काढावे.
- पेले फर्नांडिस, मच्छीमार (बाणावली)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.