Pitrupaksha 2024: श्राद्ध आणि महालय यात फरक आहे का? सर्वपित्री अमावस्या म्हणजे काय?

Pitrupaksha in Goa: हिंदू संस्कृतीत पितरांच्या पूजनासाठी किंवा त्यांचे स्मरण ठेवण्यासाठी दिलेले स्वतंत्र हे पंधरा दिवस म्हणजेच पितृपक्ष.
Pitrupaksha 2024
Pitrupaksha 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Pitrupaksha 2024 in Goa: गोवा, महाराष्ट्रात सध्या पितृपक्ष सुरू आहे. आपल्या पूर्वजांचे म्हणजे पितरांचे स्मरण करण्याचा हा काळ. १८ सप्टेंबर २०२४ रोजी पितृपंधरवडा सुरू झाला असून २ ऑक्टोबर २०२४ रोजी सर्वपित्री अमावस्या आहे. पितृपक्ष म्हणजे काय, महालय म्हणजे काय, श्राद्धाचे जेवण काय असे असंख्य प्रश्न सर्वसामान्यांना पडतात. ‘गोमन्तक डिजिटल’ने या प्रश्नाची उत्तरं जाणून घेतलीये सारंग चिक्षे यांच्याकडून...

Q

पितृपक्ष म्हणजे काय?

A

गणेशचतुर्थी संपली आणि नवरात्राची लगबग सुरु होण्याआधी मधला काही काळ हा पितृपक्ष किंवा महालय पक्ष म्हणून ओळखला जातो. पितृ म्हणजे पूर्वज तर पक्ष म्हणजे पंधरा दिवसांचा कालावधी. पितरांच्या पूजनासाठी किंवा त्यांचे स्मरण ठेवण्यासाठी दिलेले स्वतंत्र हे पंधरा दिवस म्हणजेच पितृपक्ष. पावसाळ्यात माणसाची पचनशक्ती मंदावते, जास्ती आहार सेवन केल्याने पोटाचे विकार उद्भवू शकतात म्हणूनच पावसाळ्याच्या दिवसांत अधिक उपासतापास केले जातात किंवा याकाळात शेतीची कामं मोठ्या प्रमाणात चालतात म्हणून हलका आहार घ्यावा असे अपेक्षित असते.

Q

पितृपक्षाचे महत्त्व काय?

A

आषाढी एकादशी किंवा गणेशचतुर्थी हा देवाने केलेल्या मदतीसाठी त्याचे आभार मानण्याचा सोहळा आणि जर का आपण देवाचे आभार मनात असू तर आपल्यासाठी कष्ट घेतलेल्या पितरांचे किंवा पूर्वजांचे आभार का मनू नये? पूर्वजांची आठवण ठेवावी, त्याच्याप्रती कृतज्ञता असावी म्हणून पितृपक्ष आखून दिलेला आहे.

Q

श्राद्ध किंवा महालय का करावा?

A

आज आपण पितरांची आठवण म्हणून एखाद्या संस्थेला दान देतो, पण श्रद्धाचा किंवा महालयाचा विधी पाहिलात तर शास्त्रोक्त पद्धत सुद्धा हेच सांगते. पूर्वी ब्राह्मणांचीही आर्थिक स्थिती काहीशी चांगली नसायची. श्राद्ध किंवा महालायच्या विधीत सर्व पितरांची नावं घेतली जातात आणि त्यानंतर ब्राह्मण भोजन असतं याचाच अर्थ आपण काय करतो तर सर्व पितरांचं स्मरण करून गरजू लोकांना दान देतो.

आजच्या काळात परिस्थिती बदलली असली तरीही पिढीजात पायंडा घालून दिलेली ही परंपरा कायम आहे. शास्त्राच्या आधारानुसार श्राद्ध-म्हाळ करून पितरांच्या अतृप्त इच्छा पूर्ण होतात.

Q

श्राद्ध करतोच मग महालय का?

A

ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांपैकी ऋग्वेदमधे पाच प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहे आणि त्यातील एक हा पितृयज्ञ ज्यामधे श्राद्धविषय येतो आणि म्हणूनच श्राद्ध किंवा महालय ही परंपरा नसून वेदांमध्ये त्यांचा उल्लेख आढळतो. आता तुम्हाला असाही प्रश्न पडू शकतो की पितरांची आठवण ठेवण्यासाठी श्राद्ध केलं जातं मग महालय का?

पितरांसाठी नियमित वार्षिक श्राद्ध तर आहेतच परंतु पक्षाच्या महालयाचे विशेष महत्त्व असतं, ज्याप्रमाणे आपण दिवाळी साजरी करतो त्याचप्रमाणे हा पक्ष किंवा पंधरा दिवस म्हणजे पितरांचा उत्सव, त्यामुळे त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता या दिवसात महालय केला जातो. महालय हा श्राद्धाचाच एक प्रकार आहे फरक तो हाच की महालय केवळ या भाद्रपद महिन्यातील पितृपक्षात केला जातो व श्राद्ध हे वर्षाप्रमाणे पितरांचा मृत्यू ज्या तिथिला झाला आहे त्याच तिथीनुसार केले जातो. हे दोन्ही श्रद्धाचे प्रकार असले तरीही दोन्ही पद्धतींमध्ये काहीसा फरक आहे. पितृपक्ष अमावस्येपर्यंत असतो आणि अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो.श्राद्ध किंवा महालयात पिंडदान केलं जातं.

Q

पिंडदान म्हणजे काय, ते का करावं?

A

पिंडदान म्हणजे श्राद्धातील एक भाग आहे. भाताचे विशिष्ट गोळे करून पितरांना अर्पण केले जातात यालाच पिंडदान असं म्हणतात. पिंडदानशिवाय श्राद्ध तथा महलयात काळ्या तिळाचं महत्त्व आहे, प्रत्येक देवतेचे एक विशेष आवडतं द्रव्य असतं त्याचप्रमाणे पितरांना काळे तीळ प्रिय आहेत आणि म्हणून काळ्या तिळाने तर्पण केले असता पितर संतुष्ट होतात, तर्पण करणं म्हणजे एखादी गोष्ट अर्पण करणं. शिवाय मृत्यू, श्राद्ध किंवा महालय म्हटलं की एक पिंडाला शिवणारा काळा कावळा आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो.

लक्षात घ्या कावळा आणि मृत्यूचा संबंध नाही तर कावळा आणि पिंडाचा संबंध आहे. पौराणिक आधारानुसार कावळ्याला देवतांकडून वरदान प्राप्त आहे की जोपर्यंत कावळा पिंडाला शिवणार नाही तोपर्यंत आत्म्याला मुक्ती नाही, त्यामुळे पिंडाला कावळा शिवणे अनिवार्य असल्याचे सांगितले जाते.

Q

सर्वपित्री अमावस्या म्हणजे काय?

A

हिंदू महिन्यांमध्ये प्रत्येक मराठी महिन्यांचा शेवट हा अमावास्येने होतो मग याच अमावास्येला आपण सर्वपित्री अमावस्या म्हणतो का? याचं उत्तर नावातच आहे, सर्वपित्री अमावस्या म्हणजे सर्व पितराचा दिवस.

बऱ्याच जणांना पितर गेल्याची तिथी माहिती नसते किंवा ती लक्षात नसते तर अशा लोकांनी अमावास्येला महालय केल्याने ते विधी परिपूर्ण होतो आणि म्हणूच या अमावस्येला सर्वपित्री अमावास्या असे म्हणतात.

Q

श्राद्धचं जेवण जेवतो का?

A

नक्कीच जेवावे. आपल्या पितरांचा नैवेद्य असं त्याला महत्त्व प्राप्त आहे. नियमानुसार श्राद्धाचे जेवण करून 1008 इष्टदेवतेचा जप केल्याने जेवणारा परिणाममुक्त होतो असं म्हणतात. जर श्राद्धाचं जेवण वर्ज्य नाही तर याकाळात नवीन वस्तू का घेऊ नये असा प्रश्न पडला ना?

धर्मशास्त्राचा आधार घेऊन जाणार असाल तर वेदांमध्ये या काळात कोणत्या गोष्टी घेऊ नये अशी नोंद नाही. पितृपक्षात पितरांची कामे करणे चांगले हे निश्चित परंतु चांगल्या वस्तू घेऊच नये ही एखाद्याचे वैयक्तिक आस्थेचा विषय असू शकतो. त्यामुळे शास्त्रोक्त दृष्ट्या याकाळात नवीन वस्तू घेऊच नये असे नाही. जर आवश्यक असेल तर नवीन वस्तू विकत घ्यायला हरकत नाही. अर्थात तो दोष नाही, आपल्या आस्थेनुसार कर्म करावे मनात शंका ठेऊ नये.

काही गोष्टींचा धर्मात उल्लेख आढळतो तर काही माणसाने स्वतःच्या सोयीने किंवा विचारसरणीनुसार बनवलेल्या आहेत. तूर्तास आजच्या जगात आपण पितरांची आठवण म्हणून हा विधी नक्कीच करू शकतो.

(शब्दांकन – अक्षता )

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com