
लीन बार्रेटो
वाढत्या वयात वर्तमानपत्र हाती आल्यानंतर मी थेट क्रीडाविषयक पान पहिले वाचायचो. क्रिकेट तेव्हाही या पानावर वर्चस्व गाजवत असे मात्र गोव्याच्या स्थानिक खेळाबद्दलच्या काही छोट्या छोट्या बातम्याही तिथे असत. त्यातील सायकल शर्यतीचा निकाल मी उत्सुकतेने वाचायचो आणि विशेष म्हणजे बहुतेक वेळा त्यातील विजेत्याचे नाव पीटर रॉड्रीग्ज असे.
पीटर माझ्या घरापासून अगदी जवळच राहत होता हे कळल्यावर मला अधिकच रोमांचक वाटले होते. गेल्या आठवड्यात साजरा झालेल्या जागतिक सायकलिंग दिनानिमित्त मी पीटरच्या घरी जाऊन त्याचा प्रवास प्रत्यक्ष जाणून घेण्याची संधी घेतली.
पूर्व आफ्रिकेतील टान्झानियामध्ये 1953 साली जन्मलेल्या पीटरला वयाच्या पाचव्या वर्षी शाळेत जाण्यासाठी गोव्यात पाठवण्यात आले. पण लहानपणी झाडावरून पडल्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याच्या अभ्यासात व्यत्यय येऊ लागला आणि शेवटी त्याला शाळा सोडावी लागली. मात्र शैक्षणिक क्षेत्रात त्याने जे गमावले ते त्यांनी क्रीडा क्षेत्रात भरून काढले. फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि इतर खेळांमध्ये त्याने आपली पूर्ण ऊर्जा ओतली आणि उत्कृष्ट कामगिरीही केली.
पंधराव्या वर्षी पीटरने स्पर्धात्मक सायकलिंगमध्ये प्रवेश केला. अँथनी नावाच्या एका जेष्ठ सायकलपटूने त्याची क्षमता ओळखून त्याला प्रशिक्षण दिले आणि शर्यतीत उतरण्यासाठी स्वतःची सायकलही दिली. सायकल शर्यतीमध्ये पीटर त्यानंतर सातत्यपूर्ण विजय मिळवू लागला. प्रत्येक विजयासह त्याचा आत्मविश्वास वाढत गेला आणि लवकरच तो अनुभवी सायकल स्वारांसाठी आव्हान बनला आणि त्यांना पराभूत करू लागला.
त्याच काळात भारताचा दौरा करणाऱ्या एका फ्रेंच सायकल स्वाराकडून त्याने ॲल्युमिनियम बांधणीची फ्युजॉट रेसिंग सायकल 70,000 रुपयांना विकत घेतली. त्या काळात ही रक्कम फार मोठी असली तरी पीटरची ही एक अमूल्य गुंतवणूक ठरली. या सायकलने बहुतेक शर्यती जिंकण्यात त्याला मदत केली. सायकल क्षेत्रात नवीन काही शिकण्यासाठी उत्सुक असलेला पीटर परदेशी सायकल स्वरांशी बोलून त्यांची उपकरणे आणि प्रशिक्षण पद्धती याबद्दल माहिती घेत असे. आपली सायकल चालवण्याची गती समजून घेण्यासाठी मुंबईतील मेट्रो सिनेमा जवळील एका दुकानातून त्याने विदेशी स्पीडोमीटरही खरेदी केला होता.
दरवर्षी एक जानेवारी रोजी आयोजित होणाऱ्या गिर्डोली क्लब सायकल शर्यतीत सलग अठरा वर्षे भाग घेऊन त्याने वारंवार विजय मिळवला. या शर्यतीच्या पोडियमवर दरवेळी विजेता म्हणून उभा राहणारा पीटर एक आख्यायिका बनला होता. या क्लबच्या 2024 मध्ये झालेल्या पन्नासाव्या वार्षिक शर्यतीच्या वेळी क्लबने पीटरचा विशेष सन्मान केला. आपल्या जवळपास दोन दशकांच्या स्पर्धात्मक कारकिर्दीत पीटरने गोवा आणि इतर ठिकाणच्या सायकलिंग सर्किटमध्ये स्वतःचे नाव कोरले होते.
त्याने मला अभिमानाने प्रमाणपत्रांचा एक संच दाखवला- प्रत्येक प्रमाणपत्र तो पहिल्या तीनात आल्याचा दाखला देत होते. दुर्दैवाने त्याची सारी पदके आणि ट्रॉफी त्याच्या घरातून चोरीला गेली होती.
पीटर रॉड्रीग्जचे जीवन खेळाच्या शुद्ध आनंदाचा एक पुरावा आहे. त्याची कथा केवळ शर्यती जिंकण्याबद्दल नाही तर एका खेळाडूचीi चिकाटी, नम्रता आणि समर्पित वृत्ती बद्दलची आहे. आज पीटर पाच मुलांचा बाप आहे आणि त्याच्या सत्तरीतही तो दररोज सायकल चालवत असतो. तो म्हणतो, 'माझ्या नातवंडांसोबत वेळ घालवणे हा माझा सध्या सर्वात मोठा आनंद बनला आहे.
जानेवारी 1989 मध्ये आयोजित करण्यात आलेली 680 किलोमीटर अंतराची मुंबई ते गोवा ही शर्यत त्याच्या सर्वात कठीण आव्हानांपैकी एक होती. ही शर्यत पाच दिवस चालली होती. या शर्यतीत राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गोवा सरकारने चार सायकल स्वार निवडले होते, त्यापैकी एक पीटर होता. पीटरने या शर्यतीत प्रथम 30 सायकल स्वारांमध्ये स्थान मिळवले. हे स्थान देखील कौतुकास्पद होते कारण या शर्यतीतील स्पर्धक हे उच्च श्रेणीतील सायकल चालवणारे प्रायोजित खेळाडू होते.
त्यानंतर झालेला पारितोषिक वितरण समारंभात गोव्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सायकलस्वारांचा सत्कार करण्यात आला होता. पीटरला यावेळी सरकारी मदतीचे आश्वासन देखील देण्यात आले होते, जे कधीच पूर्ण झाले नाही. त्याच्या शब्दात सांगायचे झाल्यास, 'क्रीडा विभागातील एका भ्रष्ट अधिकाऱ्याने मला फसवले अशीच माझी भावना झाली आहे.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.