गोमंतपुराण : दख्खनचे पशुपालक

गुरेढोरे यांच्या स्थलांतराचे व प्रसाराचे पुरावे हे केवळ त्यांच्याच स्थलांतराचे पुरावे नाहीत, तर दख्खनमध्ये गंगा-सिंधू मैदानातून इतरत्र गेलेल्या क्षत्रियांच्या स्थलांतराचेदेखील पुरावे देत आहेत.
Pastoralists of the Deccan
Pastoralists of the DeccanDainik Gomantak

(तेनसिंग रोद्गीगिश)

माझे बालपण ज्या गावात गेले त्या गावात आमच्यांपैकी बहुतेकांकडे शेळ्या होत्या. आमच्यांपैकी अनेकांनी गुरेही पाळली, घरच्या दुधाची तहान भागवण्यासाठी फक्त एक गाय असे. काहींच्याकडे नांगरणीसाठी बैल असे व दुग्ध व्यवसायासाठी काहींकडे मोठ्या प्रमाणावर म्हशीही होत्या.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही सर्वच्या सर्व पशुपालक कुटुंबे चाड्डी होती. गावातील कुणबी क्वचितच पशुपालनात होते; बहुधा काही सुदिर कुटुंबे प्राणी पाळत. परिस्थिती निव्वळ योगायोग असू शकते. ‘चाड्डी’ या शब्दाची व्युत्पत्ती या पशुपालनातून तर आली नसेल?

पशूंना चरायला नेणारे (चराडी - चाड्डी), चारा व कुरणे जिथे आहेत तिथे गायी, म्हशी, शेळ्या यांना कोकणीत ‘चराडी‘ (चरायला नेणारे) म्हणतात. त्याचाच अपभ्रंश होऊन चाड्डी हा शब्द तर तयार झाला नसेल (संदर्भ : वालावलीकर, १९२८ : गोंयकारांची गोयांभायली वसणूक, २५). चाड्डी म्हणजे पशुपालक; सामान्यत: हा शब्द गतिशीलतेच्या अर्थाने वापरतात - म्हणजे ताजे कुरण आणि पाण्याच्या शोधात भ्रमंती करणारे कळप.

विशेष म्हणजे गोव्याच्या लोकसंख्येच्या संदर्भात प्राचीन उपलब्ध स्रोत नेमके हेच सांगत आहेत. उदाहरणार्थ, घाटमाळातील धनगर त्यांच्या म्हशींसह पायीनघाटांवर धावून येतात याचे वर्णन क्रॉफर्डने केले आहे. (संदर्भ : क्रॉफर्ड, १९०९ : लेजन्ड्स ऑफ कोंकण, २५) आणि

आर्कमोनने रोममधील आपल्या वरिष्ठांना लिहिलेल्या पत्रात म्हटल्याप्रमाणे, राजा आणि राज्य यांचा परित्याग केलेले, भांडी आणि गुरेढोरे घेऊन बाहेर पडले व या द्वीपकल्पात खाली आले, जेणेकरून ते ते त्यांच्या उपजीविकेसाठी शेती करू शकतील.’ (संदर्भ : फर्नांडिस १९८१ : उमा दिस्क्रिसांव ई रिलासाओ दे द सासातान पेनिन्स्युला इन इंडिया स्टेट पान क्र. ९४) दख्खनच्या इतिहासात नोंदल्याप्रमाणे या पशुपालकांनी दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांचे पूर्वीचे प्रदेश सोडले असावेत.

दोन्ही संदर्भांत एक सूक्ष्म फरक आहे; क्रॉफर्ड ’म्हशी’ असा उल्लेख करतो, तर अर्कामोन ’गुरेढोरे’ असा उल्लेख करतो. गुरेढोरे असे म्हणण्यात म्हशींचा समावेश आहे की नाही किंवा त्याचा नेमका अर्थ काय आहे याबद्दल आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. म्हशी, शेळ्या आणि गुरे (गायी आणि बैल) भौगोलिकदृष्ट्या दख्खनच्या वेगवेगळ्या प्रदेशांशी संबंधित आहेत. अनुमानानुसार त्यांचे पालनकर्तेदेखील वेगवेगळ्या ठिकाणांहून स्थलांतरित झाले असतील.

ढोबळमानाने सह्याद्रीच्या पूर्वेकडील ओलसर पानझडीच्या जंगलाने झाकलेल्या उताराच्या खालच्या भागांत म्हशींचे प्राबल्य दिसून येते. भरपूर पाणचट दलदल, म्हशींचे निवासस्थान. या प्रदेशाच्या इतिहासात म्हशींचे प्राचीन संदर्भ आहेत. सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतारावर, तामिक्कामच्या सीमेजवळ, ‘एरुमाईनाड’ होते, ज्याचा शाब्दिक अर्थ म्हशींचा देश असा होतो (एरुमाई = म्हैस) असा होतो. या ठिकाणी राहणाऱ्या जमातीच्या प्रमुखाचा उल्लेख ‘इरुमाई’ म्हणून करतात.

(संदर्भ : अयंगार, १९२३ : कॉंट्रिब्यूशन ऑफ साउथ इंडिया टू इंडियन कल्चर, ४) म्हैसूरपासून सुमारे १०० किमी दक्षिणेला, पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील टोकाजवळ, निलगिरी पर्वतरांगांमध्ये तोडा राहतात. तोडा संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे पाणथळ म्हशींना देवतुल्य दर्जा देणे. (वॉकर, २०१२ : सेक्रेड डेअरीज, डेअरीमन अँड बफेलोज ऑफ निलगिरी माउंटन इन साउथ इंडिया, १८७) अनुवांशिक अभ्यासानुसार, कन्नूर म्हशीच्या एकलप्ररूपाचेे तोडा म्हशींच्या पूर्वजांच्या एकलप्ररूपाशी साधर्म्य असल्याचे आढळून आले आहे.

कन्नूर प्रदेशातून पश्चिम घाटाच्या बाजूने निलगिरीच्या दिशेने म्हशींचे स्थलांतर झाल्याच्या सिद्धांताला यामुळे बळ प्राप्त झाले आहे. तोडांचा त्यांच्या म्हशींशी असलेला जवळचा सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध लक्षात घेता, त्याचा अर्थ असा होऊ शकतो की तोडांनी स्वतः त्यांच्या म्हशींसह कन्नूर प्रदेशातून स्थलांतर केले असावे. (संदर्भ : काथिरावण, २०११ : पॉप्युलेशन स्ट्रक्चर अँड फिलोजिओग्राफी ऑफ तोडा बफेलो इन निलगिरीज, ३०४).

याच्या विरुद्ध पूर्वेकडील प्रदेशात शेळ्यांचे प्राबल्य दिसते, जे तुलनेने कोरडाप्रदेश होता आणि जिथे दीर्घकाळ दुष्काळ पडत असे. मध्य दख्खनमधील चॅकोलिथिक उत्खननाच्या अहवालांमध्ये शेळ्यांचे संदर्भ भरपूर आहेत.

उदाहरणार्थ, क्लटन-ब्रॉकचे निरीक्षण आहे की इनामगावमध्ये ईसापूर्व नवव्या शतकापर्यंत मेंढ्या आणि शेळ्यांच्या हाडांची संख्या गुरांच्या तुलनेत जास्त होती. ढवळीकरांचा असा अंदाज आहे की, ख्रिस्तपूर्व पहिल्या सहस्राब्दीच्या पूर्वार्धात उत्तर दख्खनमधील इतर खेडेगावे कदाचित मेंढ्या आणि शेळ्यांच्या पशुपालनाकडे वळल्या असतील. कारण, जमीन कमी पर्जन्यमानात त्यांची पिके तग धरू शकली नाहीत. वारंवार पडणार्या दुष्काळामुळे जमीन शुष्क व नापीक झाली. (संदर्भ : क्लटन-ब्रॉक, २०१२ : ऍनिमल ऍज डोमेस्टीकेट्स, ८९)

गुरे कदाचित दक्षिण द्वीपकल्पातील मुळीच नसावीत; परंतु किमान चॅकोलिथिक काळापासून तेथे त्यांचे वास्तव्य असावे. गुरे बहुधा गंगा-सिंधू मैदानातून आली असावीत. इतके मागे जाण्याची आवश्यकता नाही, पण बारकाईने परीक्षण केल्यास ते योग्य वाटते. ठळक वशिंड आणि गळ्याखाली असलेली मोठी पोळी ही लक्षणे असलेली झेबू गुरेढोरे गुजरात प्रदेशात उगम पावल्याचे म्हटले जाते.

झेबू बैल हा सिंधू-सरस्वती संस्कृतीच्या सर्वोत्कृष्ट ओळखल्या जाणाऱ्या प्रतिकांपैकी एक आहे. दख्खन आणि किनारपट्टीवर आढळणारी ही सर्वांत सामान्य जात आहे - गोव्यात दिसणारी विशिष्ट स्थानिक गुरेढोरे. प्रायद्वीपच्या दक्षिणेलाही हीच जात आढळते. जल्लीकट्टू या खेळातील बैलांच्या झुंजीप्रमाणेच चित्रण करणारा सिंधू-सरस्वती संस्कृतीचा शिक्का राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली येथे जतन करण्यात आला आहे. (संदर्भ : पारपोला, १९८७: द कॉर्पस ऑफ इंडस सील्स अँड इनस्क्रिप्शन्स, खंड १, सील क्र. एम३१२) गुरांच्या स्थलांतराची व जनुकीय प्रसाराची कथा खूपच मनोरंजक आहे.

काही इतिहासकारांच्या मते, प्राचीन पशुपालकांनी त्यांच्या गुरेढोरांचे तांडे लांब अंतरावर हलवले. (संदर्भ १ : पॉसेल, १९८० : अर्बन अँड पोस्ट अर्बन हडप्पन सेटलमेंट पॅटर्न्स इन गुजरात; संदर्भ २ : वलभी : अ स्टेशन ऑफ हडप्पन कॅटल ब्रीडर्स; संदर्भ ३ : भान, १९७३: द सीक्वेन्स अँड स्प्रेड ऑफ प्रीहिस्टोरिक कल्चर्स इन द अप्पर सरस्वती बेसिन; इत्यादी) या गुरांच्या ताफ्याने केवळ सिंधू-सरस्वती खोऱ्यातील गंतव्यस्थानेच नव्हे तर कोलार सोन्याच्या खाणी आणि कर्नाटकातील चॅकोलिथिक साइट्स यांसारख्या स्रोतांना जोडण्याचे काम केले.

(संदर्भ : अलचिन, १९८३ : द राइज ऑफ सिव्हिलायझेशन इन इंडिया अँड पाकिस्तान, १८९) हडप्पा हे पंजाबच्या मैदानाच्या मध्यभागी स्थित आहे; जवळपास कोणत्याही प्रकारची दगडी संसाधने नाहीत, फक्त वाळू आणि गाळ आहे; तरीही क्वार्टझाइट आणि चुनखडीपासून लॅपिस लाझुली आणि अगेटेअरपर्यंत खडक आणि खनिज प्रकारांची मोठी विविधता या ठिकाणी आढळते.

हे कुठून आले? (संदर्भ : लॉ, २००६ : द ट्रेस अँड ट्रान्स्फर ऑफ रॉक्स अँड मिनरल्स विदिन द ग्रेटर इंडस व्हॅली रीजन, ३०१) संगनकल्लू-कुपगल पुरातत्व संकुलात डोलेराइट कुर्‍हाडीचे उत्पादन करणारे ठिकाण सापडले आहे. (संदर्भ : रिश एट अल, २००९ : द प्रीहिस्टॉरिक एक्स फॅक्टरी ऍट संगनकल्लू-कुपगल, स्टोन ऍक्स स्टडीज ३, १८९) दख्खनमध्ये सापडलेल्या विट्रिफाइड राखेचे रहस्यमय ढिगारे पाहिल्यावर आपल्याला फिरस्त्या पशुपालनाचा आणखी पुरावा मिळू शकेल.

गुरेढोरे यांच्या स्थलांतराचे व प्रसाराचे पुरावे हे केवळ त्यांच्याच स्थलांतराचे पुरावे नाहीत, तर दख्खनमध्ये गंगा-सिंधू मैदानातून इतरत्र गेलेल्या क्षत्रियांच्या स्थलांतराचेदेखील पुरावे देत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com