जुने ते शहर दे माझे...

पाहता पाहता ताळगावचा एक भाग असलेली पणजी ‘शहर’ झाल्याला आज एकशे ऐंशी वर्षे झाली; झाली पण दिसली मात्र नाहीत. अनिर्बंध व अनियोजित विस्तारामुळे रया गेलेले हे शहर राजधानी म्हणून किती काळ मिरवू शकेल, हीसुद्धा एक शंकाच आहे. एकशे ऐंशी कोनात मागे वळून पाहताना जरतारीला जोडलेली ठिगळे आणि ‘स्मार्ट’ निर्बुद्धपणाशिवाय हाती काहीच लागत नाही.
Panaji City Completed 180 Years
Panaji City Completed 180 YearsDainik Gomantak
Published on
Updated on

अलेक्झांडर बार्बोझा

दि. 22 मार्च 1843 रोजी पणजीला शहराचा दर्जा प्राप्त झाला, त्याला आज 180 वर्षे पूर्ण होत आहेत याचा अभिमान वाटावा तितका कमीच आहे. सध्या येथील रस्ते खोदले गेल्यामुळे अरुंद झाले आहेत. रहदारी वारंवार ठप्प होत आहे, सर्वत्र धूळ उडत आहे आणि हा त्रास थांबेल, अशी चिन्हे दूरवर दिसत नाहीत.

१८० वर्षांनी पुन्हा १८० अंशात काटे फिरले आहेत. गाव असलेली पणजी, शहर झाली आणि पुन्हा आता गावाचीच कळा किंवा अवकळा तिला प्राप्त झाली आहे. त्यातही ‘राजधानी’ म्हणावे असे या शहरात आता काही उरले आहे, असे वाटत नाही. राजधानीचे शहर म्हणजे सरकार आणि प्रशासकीय केंद्रस्थान म्हणून परिभाषित केले जात असेल, तर पणजी त्या व्याख्येत आता बसत नाही.

सरकार पर्वरीत, विधानसभा संकुल पर्वरीत, राज्य सचिवालय पर्वरीत आणि अगदी उच्च न्यायालयही पर्वरीत आहे. पलीकडच्या तीरावर, उंच ठिकाणी असलेल्या पर्वरीकडे पाहण्याशिवाय पणजीच्या हाती काही फारसे उरले नाही. ते वैभव, तो मान आता फक्त कागदोपत्रीच उरला आहे.

जेव्हा पणजी नगरपालिकेची महानगरपालिका करण्यात आली, तेव्हा सीसीपीच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याचा प्रयत्न आला होता. नवीन भागातील रहिवाशांनी आक्षेप घेतला आणि हे पाऊल घाईघाईने मागे घेण्यात आले. राजधानी शहराचा समावेश असलेल्या क्षेत्राचा पुन्हा विचार करण्याची वेळ नक्कीच आली आहे. तीन समांतर पुलांमुळे पणजी आणि पर्वरी यांच्यातील दुरावा कमी झाला आहे. तिसवाडी आणि बार्देश हे तालुके म्हणून जरी वेगळे असले, तरी सरकारी आणि प्रशासकीय मुख्यालय असलेल्या पर्वरीचा भाग राजधानी पणजीच्या हद्दीत का आणला जाऊ नये?

पणजीने आपला शहराचा दर्जा राखणे, हा मुद्दा अद्याप तसा ऐरणीवर आलेला नाही. पणजी हे असे एक शहर होते जे आपल्या हातून निसटू नये असे पोर्तुगिजांना वाटत असे. युरोपमधील व्यापारी वर्चस्व पोर्तुगिजांनी आधीच गमावले होते.

Panaji City Completed 180 Years
Fire In Goa : खोर्जुवेत दोन वाहनांना आग; दीड लाखांचे नुकसान

पोर्तुगिजांनी युरोपमधील त्यांचे व्यापारी वर्चस्व फार पूर्वीच गमावले होते, ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार होत होता आणि व्हाइसरॉय आणि गव्हर्नर यांत वारंवार बदल करण्याशिवाय गोव्याला तसे फारसे महत्त्व उरले नव्हते. तरीही पोर्तुगिजांना पणजीत स्वारस्य होते.

आजही ज्यांची प्रशंसा केली जाते अशा, पोर्तुगीज वसाहतवादी शैलीतील काही वास्तू वगळता, शहर म्हणून नियोजन केल्याचे फारच थोडे अवशेष शिल्लक आहेत. शहरांतील रस्त्यांच्या कडेला एकमजली जुनी घरे आणि त्यांनाच खेटून उभ्या राहिलेल्या बहुमजली कॉंक्रीटच्या इमारती, असे काहीसे विसंगत दृश्य पणजीत जागोजागी दिसते.

गोवामुक्तीनंतर शहरी भागाच्या नियोजनाच्या क्षेत्रात फारसा बदल झाला नाही. त्यामुळे, स्मार्ट बनवण्याचा अनियंत्रित खटाटोप पणजीला निर्बुद्धपणाच्या खड्ड्यात अधिकाधिक ढकलत आहे.

तसे पाहू जाता, मुंबई व बेंगळुरूप्रमाणे पणजी हे स्वप्न साकार करणारे शहर कधीच नव्हते. पणजीपेक्षाही गोव्याच्या खाण आणि पर्यटन पट्ट्यांमध्ये कदाचित अधिक स्वप्ने साकार झाली आहेत. मोठी स्वप्ने पाहणाऱ्यांना पणजी शहराने आकृष्ट केले नाही. नाही म्हणायला उद्योजक येथे रमले. येथील प्रशासक, लोकप्रतिनिधी यांनी पणजीला प्रशासकीय शहराऐवजी स्वप्नपूर्तीचे शहर म्हणून कधीच पाहिले नाही.

Panaji City Completed 180 Years
Goa ST Reservation: ‘एसटी उमेदवारांसाठी राजकीय आरक्षण द्या’

शहरांच्या बाबतीत असे म्हटले जाते की, आपण जसे त्याचे नियोजन करू तसे शहर बनत जाते. वाहने आणि रहदारी या दृष्टिकोनातून नियोजन झाले तर त्यासाठी व तेवढ्यापुरते शहर मर्यादित होते. लोक आणि स्थळे या पद्धतीने शहर नियोजन झाले तर लोकांसाठी शहर निर्माण झाले असते. पणजीचे शहर म्हणून व्यवस्थित नियोजन झाले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

काही दशकांपूर्वी जिथे मांडवीतीरी लोक आयुष्यातली एक संध्याकाळ चिरस्मरणीय करत होते, तिथे आता कठोर चेहऱ्याच्या सुरक्षा रक्षकांची वर्दळ असते. मावळतीच्या सूर्यकिरणांनी चमकणाऱ्या सोनेरी लाटा होत्या, डॉल्फिन होते, तिथे आता कॅसिनोच्या जहाजात ने-आण करणाऱ्या लहान लहान बोटी तरंगत आहेत.

गोमंतकीय अस्मितेला प्रतिबिंबित करणारी राजधानी म्हणून पणजी शहराचे नावाजले जाणे इतक्या वर्षांत अपेक्षित होते. पण, दुर्दैवाने पणजी हे शहर भारताची कॅसिनोंची राजधानी म्हणून प्रसिद्ध झाले आहे. आपल्या शहराची अशी ओळख कुठल्याच नागरिकाला, पणजीतील रहिवाशाला पटणारी नाही. पण, हेच वास्तव आहे.

एकेकाळी इथे राहणाऱ्या प्रत्येकाला आपलेसे वाटणारे, पर्यटकांना भुरळ पाडणारे शहर आज केवळ हाय-रोलर्स आणि इन्स्टाग्रामर्सना भुरळ पाडते. केवळ या मातीत रुजलेली माणसेच नव्हे तर हे शहरही आज दु:खी आहे. वास्तविक राजकारण्यांकडून काही मागणे, तशी अपेक्षा करणेच चुकीचे आहे, तरीही;

तुला जर द्यायचे आहे, जुने ते शहर दे माझे..

असे मागावेसे वाटते. पण, ओरबाडणाऱ्यांजवळ देण्यासारखे काहीच नसते. बिनडोक ‘स्मार्ट’पणा आणि उजेड न पाडणारा झगमगाट, याशिवाय १८० वर्षांच्या पणजीच्या पदरी जपण्यासारखे अभावानेच आढळते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com