Panaji : ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे विज्ञान शिक्षण घेण्यात अनेक अडथळे येतात. हे अडथळे दूर करण्यासाठी ‘विद्यार्थी विज्ञान ग्राम’ आयोजित करण्यात आले. ज्यामध्ये ग्रामीण भागात राहणाऱ्या 180 मुलांनी सहभाग घेतला. आठव्या भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सवात ‘विज्ञानाचा विचार निसर्गाचे आभार’ या विषयावर यावर आधारित ‘विद्यार्थी विज्ञान ग्राम’ हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांत विज्ञान क्षेत्रात करियर करण्याची आवड निर्माण केली आहे.
या कार्यक्रमात चरण देसाई यांचे ‘जैवविविधतेविषयी जागरूकता’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. याशिवाय डॉ. जयंत जोशी यांच्या सहाय्याने खेळणी तयार करणे तसेच विज्ञान उपक्रम आयोजित करण्यात आले होते. श्रीरंग जांभळे यांनी प्रात्यक्षिकांद्वारे मृदा विज्ञानविषयी माहिती दिली.
संपदा परब यांच्या समन्वयाने राज्य विज्ञान केंद्राचे विज्ञान प्रयोगांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. याशिवाय विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे या हेतूने साळगाव येथील घनकचरा प्रक्रिया केंद्र आणि जुने गोव्यातील आयकार-सेंट्रल कोस्टल ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट यासारख्या वैज्ञानिक संस्थांच्या सहलींचे आयोजन करण्यात आले होते.
‘साय-फी’ उपयुक्त मंच
विज्ञान क्षेत्रातील नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळाल्याबद्दल अनेक विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. ग्रामीण भागातील शाळेतील एका शिक्षकाने सांगितले, की विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करणे जास्त महत्त्वाचे आहे. विज्ञान क्षेत्रातील नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी; विशेषत: ग्रामीण शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी ‘साय-फी’ हा एक उपयुक्त मंच म्हणून विकसित झाला आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान हे आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा एक भाग असले तरी, त्यांना काहीवेळा शैक्षणिक उपक्रम म्हणून किंवा केवळ शाळांमध्येच अभ्यासले जाणारे विषय म्हणून पाहिले जाते. जनता आणि विज्ञान व शास्त्रज्ञ यांच्यातील दरी कमी करणे अत्यावश्यक आहे. विज्ञान हसत खेळत शिकता यावे यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.
-शुभदा शिरोडकर, कार्यक्रम समन्वयक.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.