पणजी
थकीत वीज बिले भरण्यासाठीच्या एकरकमी विना व्याज बिल फेड योजनेस म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. येत्या ३१ डिसेंबरला ही योजना बंद होणार आहे. १ डिसेंबर रोजी सुरु करण्यात आलेल्या या योजनेस गेल्या २६ दिवसांत १०-१२ टक्के ग्राहकांनीच प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे थकीत वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांवर यापूर्वी जाहीर केल्यानुसार कारवाई करण्याची वेळ सरकारवर नव्या वर्षाच्या सुरवातीलाच येणार आहे.
राज्याच्या वीज खात्याला वीज ग्राहकांकडून चारशे कोटी रुपयांवर बील येणे आहे. त्यावरील विलंब आकारच ९१ कोटी रुपये आहे. त्यासंदर्भातील खटले खात्याने दाखल केले असून महसुली न्यायालयात ते सुरु झाले आहेत. काही ग्राहकांनी एकाच्या नावावर वीज जोड तोडला गेल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेचा ना हरकत दाखला मिळवून दुसरा वीज जोड मिळवला आहे. त्यांनी या खटल्यांकडे गांभीर्याने पाहणे बंद केले आहे. ते थकीत वीज बिल भरत नाहीत याउलट त्यांच्या इमारतीला वीज पुरवठा सुरळीत सुरु आहे असे चित्र आहे.
त्यामुळे थकीत वीज बिले वसूल करण्यासाठी खात्याने १ डिसेंबरपासून एक रकमी फेड योजना सुरु केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्या उपस्थितीत या योजनेची सुरवात करण्यात आली. थकीत वीज बिलापोटी रक्कम कोणतेही कारण न विचारता स्वीकारली जाईल असे सरकारने जाहीर केले होते. वीज बिल फेडीच्या पद्धतीवर आधारीत विलंब आकारावरही सुट जाहीर केली होती. मात्र ग्राहकांनी त्याला म्हणावा तसा प्रतिसाद दिलेला नाही. वीज पुरवठा सुरळीत असल्याने त्यांनी ही योजना मनावर घेतल्याचे दिसत नाही.
कोणत्याही इमारतीचा वा घराचा वीज पुरवठा थकीत वीज बिलामुळे तोडला गेला असेल आणि तो पुरवठा दुसऱ्या ग्राहकाच्या नावाने सुरळीत केला असेल तर असे वीज जोड तोडण्यात येतील असा इशारा सरकारने दिला आहे. कार्यकारी अभियंत्यांनी अशा इमारतींचे सर्वेक्षण करून तयार रहावे असा आदेश यापूर्वीच जारी करण्यात आला आहे. त्यामुळे एकरकमी थकीत वीज बिल योजनेचा लाभ न घेणाऱ्यांविरोधात वीज खाते कारवाई करणार हे आता ठरून गेलेले आहे. येत्या नववर्षात त्याची सुरवात होऊ शकते.
वीज खात्यात ही योजना लागू करून त्याच्या प्रतिसादाचा अभ्यास सरकार करणार होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या आरोग्य अभियांत्रिकी विभागात (पाण्याची थकीत वीज बिले वसूल करण्यासाठी) आणि नंतर जलसंपदा खात्यात ही योजना लागू करण्याची सरकारची योजना होती. मात्र वीज खात्यातच ही योजना यशस्वी होण्याची चिन्हे दिसत नसल्याने पुढील योजना धोक्यात आली आल्याचे दिसते.
या योजनेनुसार थकीत वीज बिलावर विलंब आकार कोणत्या पद्धतीने वीज बिल भरले जाणार त्यानुसार माफ केला जाणार आहे. थकीत वीज बिल १-२ हप्त्यांत भरले तर पूर्ण विलंब आकार माफ केला जाणार आहे. ३, ४, ५, ६ महिन्यांत हे वीज बिल फेडले जाणार असल्यास अनुक्रमे ८० टक्के, ६० टक्के, ४० टक्के आणि २० टक्के विलंब आकार माफ केला जाणार आहे. २३ ऑक्टोबर २०२० पूर्वीचे थकीत बिल या योजनेतून भरता येते. अधिक माहितीसाठी १९१२ and ७३५०६२२०००या क्रमांकावर संपर्क साधता येईल किंवा cee-elec.goa@nic.in येथे ईमेल पाठवता येईल.
या योजनेस अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही हे खरे आहे. जनतेच्या सोयीसाठी ही योजना जारी केली आहे. थकीत वीज बिलाच्या खटल्यांत खेपा मारणे वाचावे हा हेतू यामागे आहे. अजूनही तीन दिवस शिल्लक असल्याने ग्राहकांनी थकीत वीज भरण्यासाठी पुढे यावे.
नीलेश काब्राल, वीजमंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.