Fire in Goa: कारवाईचे पोकळ इशारे नको; प्रत्‍यक्ष कृती करा

आजघडीला राज्‍यात 18 ठिकाणी मोठा अग्‍निप्रकोप झालाय
Fire in Goa
Fire in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Fire in Goa: सलग सहाव्‍या दिवशी धुमसणारे म्‍हादई अभयारण्‍य विध्‍वंसक कृष्‍णकृत्‍याची परिणती आणि सरकारच्‍या संवेदनशून्यतेचा परिपाक आहे.

बुडाला धग लागल्‍यावर आणि धूर जाऊन नाक कोंडल्यावर कारवाईची भाषा करून काय उपयोग? एखादे प्रकरण डोईजड होताच धमकीवजा इशारे द्यायचे आणि ‘क्‍लायमॅक्‍स’ला गवसणी घालायचे प्रकार आता पुरे झाले.

आजघडीला राज्‍यात 18 ठिकाणी मोठा अग्‍निप्रकोप झालाय, पैकी सत्तरीच्‍या वनराईत 9 जागी जैवविविधता भस्‍मसात झालीय. मानवी स्‍वार्थाच्‍या ठिणगीतून उद्भवलेली विनाशकारी आपत्ती समाजाच्‍या श्वासोच्छ्वासाचा क्षय करणारी आहे.

वन खात्‍याचे काही विकाऊ अधिकारी आणि विनाशी प्रवृत्तींच्‍या संगनमतातून आग्‍निकांड घडतेय, हे उघड आहे.

दुर्दैवाने, प्रशासन आणि आगलाव्‍या मनोवृत्तींना अद्याप जंगलांचे महत्त्‍व कळलेले नाही. उत्तर गोव्‍यातील 78 टक्‍के वनक्षेत्र सत्तरीत आहे. ते सुरक्षित राहिले नाही तर म्‍हादईसाठी चाललेला लढाही शिल्‍लक राहणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने भानावर यावे, झारीतले शुक्राचार्य शोधून त्‍यांना जरब बसवावी.

गोव्‍याच्‍या इतिहासात एकाचवेळी चोहोबाजूंनी आगीने घेरल्‍याचे कधीही ऐकिवात नाही. हे आक्रीत म्‍हणजे मानवनिर्मित संकट आहे, असे वनमंत्रीही म्‍हणत आहेत. काजू बागायतींच्‍या विस्‍तारासाठी अतिक्रमणे करून आगी लावण्‍याचे प्रकार यापूर्वीही घडत होते.

संबंधितांवर कारवाई कधीच झाली नाही. वाघेरीच्‍या टोकावर जंगलतोड झाली तेव्‍हाही कारवाईची भाषा झाली; परंतु अंमलबजावणीचा पत्ता नाही.

बोटचेप्‍या धोरणामुळेच घातपाताची प्रवृत्ती बळावली. म्‍हादई खोऱ्याला 1999 साली अभयारण्‍याचा दर्जा लाभला आणि ‘मानव विरुद्ध निसर्ग’ द्वंद्वाला सुप्‍तावस्‍था लाभली. तत्‍पूर्वी 1960 ते 80 च्‍या दशकांत सुमारे 9 हजार हेक्‍टर जंगलतोड झाल्‍याचे निरीक्षण पर्यावरण अभ्यासक नोंदवतात.

विकासासाठी जंगले खुली व्‍हावीत म्‍हणून प्रयत्‍न सातत्‍याने सुरूच राहिले आहेत. त्‍याला सरकारचा छुपा पाठिंबा आहे, हे उघड सत्‍य आहे. ग्‍यानबाची मेख अशी की, म्‍हादई अभयारण्‍याची अंतिम अधिसूचना अद्याप येणे बाकी आहे.

शिवाय वनहक्‍क दावेही निकालात आलेले नाहीत. जंगली भागांत हक्‍क दाखवण्‍याच्‍या खटाटोपातून आग लावण्‍याच्‍या कृती घडत आहेत, अशा शक्‍यतेला बळकटी मिळत आहे.

म्‍हादई अभयारण्‍यातील आगीची व्‍याप्‍ती सर्वप्रथम ‘गोमन्‍तक’ने विषद केली; परंतु राज्‍य सरकारला उशिरा जाग आली. नौदल, वायुदलाची मदत यापूर्वीच घेतली असती तर निसर्गसंपदेची प्रचंड हानी टळली असती.

घटनेचे गांभीर्य कळले नाही की दुर्लक्ष केले हा मुद्दाही चिंतनीय आहे. राजसत्तेच्या बळावर जर कोणी विध्‍वंसक भस्‍मासुरांवर पांघरूण घालण्‍याचा प्रयत्‍न करत असेल तर ती स्वतःच्या पायावर मारलेली कुऱ्हाडच ठरेल, हे विसरू नये. गोव्‍यात सहा अभयारण्‍ये आहेत.

त्‍यापैकी सत्तरी वनपरिक्षेत्रात येणारे अधिकारी दीर्घकाळ टिकत नाहीत, त्‍यांच्‍या अवघ्‍या महिन्‍यांत बदल्‍या होतात, याचा अर्थ काय घ्‍यावा? वास्‍तव असे आहे की, जंगलतोड असो वा अन्‍य मार्गाने विध्‍वंस, वनखाते कारवाई करण्‍यात अपयशी ठरले आहे आणि सामान्‍य जनतेच्‍या नशिबी हताशपणे पाहणे एवढेच उरलेय.

जळणारी झाडे-वनराई ही भूजल संवर्धन, प्राणवायू निर्मितीवर प्रतिकूल परिणाम करते. साधुवत वृक्षवल्‍लींची हानी विनाशाची नांदी आहे. धक्‍कादायक म्‍हणजे, प्रतिशोध घेण्‍यासाठीही आग लावण्‍याच्‍या घटना घडत आहेत.

Fire in Goa
आई-बाबा ओरडतील म्हणून मुली गेल्या पळून! गोव्याकडे येत असताना... पुढे काय झालं एकदा वाचाच

विकासाच्‍या नावाखाली गोवा संपवायचा विडाच जणू उचलला आहे की काय, अशी स्‍थिती सध्‍या निर्माण झाली आहे. हजारो हेक्‍टर वनक्षेत्र खाक झाले आहेच. शिवाय किनारी संरक्षणाची ढाल ठरलेल्‍या ‘सीआरझेड’ला कमकुवत बनवण्‍याचे घाटत आहे.

हंगामी शॅक्‍स काँक्रीटच्या दिशेने वाटचाल करताहेत. पर्यावरणप्रेमींनी वणवे टाळण्‍यासाठी दिलेल्‍या आराखड्यांना केराची टोपली दाखवली जातेय. या स्‍थित्‍यंतराचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, ही काळ्या दगडावरची रेघ समजावी.

Fire in Goa
दिव्यांगाचा अपमान! 10 मिनिटे उशीर झाला म्हणून खासदार सार्दिन संतापले, गाडी न देताच धाडले माघारी

यापूर्वी झरमे, करंझोळ भागात भूस्‍खलन झाले, तेव्‍हाच आपण सावध व्‍हायला हवे होते. तीन वर्षापूर्वी दक्षिण ऑस्‍ट्रेलियात लागलेल्‍या भीषण वणव्‍याच्‍या झळा आजही तो देश सोसत आहे.

बदलत्या हवामानाच्या संकटाने त्रासलेल्‍या लोकांनी रस्‍त्‍यावर उतरून सरकारला वेळोवेळी घेरले आहे. पृथ्‍वीवर 20 टक्‍के प्राणवायू देणाऱ्या ॲमेझॉनच्‍या खोऱ्यात 9500 हून जास्त वणवे पेटले.

त्‍याचे जगाला परिणाम भोगावे लागत आहेत. महिन्याभरात राज्यात आगीच्या एकूण 1015 घटना घडल्‍या. वणव्‍याच्‍या मरणझळा रोखल्‍या नाहीत तर भविष्‍यात पावलापावलांवर संकटांचा सामना करावा लागेल. परिस्‍थितीचे गांभीर्य ओळखा. कारवाईच्‍या केवळ वल्‍गना करू नका, प्रत्‍यक्ष कृती करून दाखवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com