No Busstand in Usgaon : तिस्क बाजारात असलेल्या सर्कल परिसरात सुसज्ज बसस्थानक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. लोकांना रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांचा आश्रय घ्यावा लागत आहे. बसस्थानक नसलेले राज्यातील तिस्क-उसगाव हे एकमेव ठिकाण असून सरकारने यासंबंधी गांभीर्याने विचार करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
तिस्क-उसगाव येथे अनेक खासगी, कदंब तसेच कर्नाटक राज्यातील बसेस दररोज ये-जा करतात. राज्यात अन्य ठिकाणी ये-जा करणाऱ्या बसेस रस्त्यावर थांबून प्रवाशांना घेतात. त्यामुळे सकाळी, दुपारी आणि सायंकाळी परिसरात वाहतूक कोंडी होते.
तिस्क-उसगाव परिसरात अत्याधुनिक पद्धतीचे बसस्थानक उभारण्याची आवश्यकता आहे. कारण या भागातून मोठ्या संख्येने लोक इतर राज्यांत ये-जा करतात. सरकारने यासंबंधी गांभीर्याने लक्ष देऊन प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यात पार्किंग व्यवस्थेवर नियंत्रण नसल्याने लोकांना जीव मुठीत घेऊन बाजारात फिरावे लागते.
पावसाळ्यात होतात हाल
तिस्क-उसगाव येथील बाजारात पाळी, गुळेली, उसगाव, साकोर्डा, धारबांदोडा, मोले व अन्य भागातील लोक खरेदीसाठी येतात. खरेदी केल्यानंतर साहित्य घेऊन लोकांना दुकानासमोर उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. पावसाळ्यात दुकानासमोर बसची प्रतीक्षा करीत असताना काही दुकानदारांकडून प्रवाशांना वाईट वागणूक मिळते. त्यामुळे काही वेळा बाचाबाची होण्याचे प्रकार पाहायला मिळतात.
पीडीए मार्केटची दुरुस्ती आवश्यक
तिस्क-उसगाव येथील बाजार सध्या विविध समस्येच्या गर्तेत सापडला आहे. दयनीय स्थितीत असलेल्या पीडीए मार्केटमध्ये दुकानदार तसेच ग्राहक नाराजी व्यक्त करतात. येथील पीडीए मार्केट केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत असल्याने त्याची दुरुस्तीही लवकरात करणे अत्यंत आवश्यक असल्याचे येथील व्यापारीवर्गाने सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.