पणजी
खडतर अशा आरोग्यस्थितीतून जात असताना कोरोनाचा प्रभाव शरीरातपर्यंत मार्यदित नाही, तर त्याचा मनावर सुद्धा परिणाम होत आहे. एक म्हणजे पडलेल्या बंधनामुळे आपण अस्वस्थ आहोत व दुसरे म्हणजे 'भिती'. अशा अवस्थेत नकारात्मक भावनापासून मनही मुक्त राहणारे नाही. मात्र हा विषाणू आपल्या नियंत्रणात नसला, तरी काळजी घेणे आवश्क आहे. कोरोनासोबत आपल्याला पुढे जायचे असल्याने, शक्यता आणि खात्री, नियंत्रण, परिणाम व पर्याय, व्यक्ती अथवा वर्तन व समस्येवर मात ही पंचसूत्री भविष्यकालीन नियोजनासाठी महत्वाची आहे, असे मत महाराष्ट्रातील प्रथितयश मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी रविवारी व्यक्त केले.
अनघा वाचासुंदर प्रतिष्ठानतर्फे अकाली गेलेल्या अनघा या प्रतिभावान मुलीच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त ऑनलाइन पद्धतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. नाडकर्णी हे,'कोरोनाबरोबरची पुढील वाटचाल' या विषयावरील व्याखानात बोलत होते.
डॉ. नाडकर्णी म्हणाले, संपूर्ण देश गेले ४ महिने खडतर अशा स्थितीमधून जात आहे. नेहमीच्या भितीहून कोरोनाची भिती वेगळी आहे, कारण तिला जीवशास्त्रीय किनार आहे. ही भिती मानसिक, सामाजिक व अस्तित्वावर परिणाम करणारी आहे. भिती आणि चिंता याने माणूस ग्रासलेला आहे. सुखद भावनांची जबाबदारी आपण सहज घेतो. पण दुःखद भावना दुसऱ्यांवर टाकायची सवय असते. नकारात्मक भावनांची जबाबदारी घेणे तेवढेच महत्वाचे आहे. असह्य भावनांचे रूपांतर सुसह्य भवनात करता येत नाही ही समस्या असते,अशावेळी असह्य भावनांचे रूपांतर संयभावनेत प्रथम करणे गरजेचे आहे.
काळजी करणे याकडून काळजी घेणे व भितीकडून सावध चित्ताकडे आपल्याला यायला हवे, याची जाणीव देऊन डॉ. नाडकर्णी यांनी सांगितले, की नकारात्मक घडणाऱ्या गोष्टी शक्यतेच्या पातळीवर ठेवल्या पाहिजेत. कोरोना आपल्या नियंत्रणात नाही, पण त्याविषयी काळजी घेणे आपल्या हातात आहे.
परीक्षेचे कधी होईल, हे माहित नाही, परंतु माझ्या विषयाचा अभ्यास मी करीन, हे विद्यार्थी करू शकतात, याकडे लक्ष वेधून डॉ. नाडकर्णी म्हणाले, सद्यस्थितीचे संभाव्य परिणाम काय आहेत व त्यावर पर्याय कोणते काढता येतील याचा विचार व्हायला हवा. जेवढे पर्याय जास्त काढू तेवढे त्यातून चांगले पर्याय निघतील. व्यक्तींना लेबले न लावता वर्तनावर भर द्यायला हवा. अपेक्षित वर्तन नसेल तर दोषारोप करण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्याला आठवण करून दिली पाहिजे.
आज शिक्षणात जगभर उलथापालथ सुरू आहे, अशावेळी आपण पर्याय शोधायचे आहेत. तक्रारखोरपणाच जास्त आहे व तो या परिस्थितीत चालणारा नाही, असे स्पष्ट करून डॉ. नाडकर्णी म्हणाले, संकट पार केल्यावर संधी येत असते किंबहुना संकटात कोणत्या संधी लपलेल्या आहेत,त्याचे नियोजन कसे करता येईल हे पाहायला हवे. कोरोना मुक्तीनंतर येणाऱ्या अस्वस्थतेसाठी आतापासून नियोजन करणे गरजेचे आहे. संकटातून सुद्धा शिकण्यासारखे खुप असते. पुढे त्याचा उपयोग होतो.
प्रश्नोत्तरी सत्रात डॉ. नाडकर्णी यांनी तत्संबंधी प्रश्नावर सांगितले ,की सकारात्मक भावना आपल्याला आयत्या मिळणार नाहीत.त्या वैयक्तिक ,कौटुंबिक व सामाजिक पातळीवर तयार कराव्या लागतात. आपल्या कामातून मी सकारात्मक भावना, ऊर्जा निर्माण करू शकतो, हा विचार व्हायला हवा. अशी परिस्थिती जगण्याचे शिक्षण मिळवण्यासाठी संधी नाही का?या काळात नवीन ध्यास धरणे व तो न सोडणे अशा पद्धतीने आव्हान स्वीकारता येते कारण आव्हान स्वीकारणे हे सुद्धा शिक्षण आहे असे दुसऱ्या एका प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले.आता पर्यंतच्या पूर्वग्रहाना दैनंदिन जीवनात कमीत कमी करता येईल एवढे पाहिले तरी या काळात काही शिकल्याचे समाधान मिळेल.
प्रतिष्ठानच्या अध्यक्ष श्रेया वाचासुंदर म्हणाले, कोविड महामारीमुळे यंदाचा कार्यक्रम जाहीर स्वरूपात घेता आला नाही, स्पर्धा झाल्या नाहीत, तरी संस्थेचे उपक्रम सुरू असल्याचे सांगितले. कर्णबधिर मुलांसाठी स्वरनाद प्रकल्प, समुपदेशन, उद्बोधक पुस्तक प्रकाशन यासंबंधी त्यांनी माहिती दिली. संस्थेचे सल्लागार डॉ. अविनाश वाचासुंदर यांनी कर्णबधिर मुलांसाठीचा उपक्रम सरकारी अनुदानाशिवाय चालवला जात असल्याचे सांगून देणग्या देणाऱ्यांसाठी आयकर रिबेट असल्याचे स्पष्ट केले. प्रतिष्ठानचे संस्थापक आनंद वाचसुंदर यांनी डॉ., नाडकर्णी यांचा परिचय करून दिला.व्याख्यानाचा कार्यक्रम https:youtu.be/-zTPdJUBex8 या लिंक वर पहाता येईल.
संपादन ः संजय घुग्रेटकर
|