आईची आशा ठरवेल गाेव्याची दिशा

आभाळाशी मैत्री करताना मातीला मात्र विसरू नये!
जनमन उत्सव
जनमन उत्सवDainik Gomantak
Published on
Updated on

समाज घडवण्यासाठी स्त्रियांचे योगदान हे अतिशय महत्त्वाचे असते. तेव्हाच त्या-त्या संस्कृतीत एक समतोल साधला जाऊ शकतो. भारतीय संस्कृतीच्या जडणघडणीतही स्त्रियांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्यापासून माणसाच्या उत्क्रांतीचा एक अविरत प्रवास सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो. जगाच्या पाठीवर कुठेही गेल्यावर आपल्याला संस्कृतीच्या उगमात, वहनात आणि जतनात स्त्रियांचा मोठा वाटा दिसतो. आजीने नातीला, आईने मुलीला, गोष्टी सांगून संस्कृतीचे जतन केलेले आहे.

संस्कृती जतनासाठी कार्य

गोमंतकाच्या संदर्भात विचार करता स्त्रियांनी संस्कृती जतनासाठी युगानुयुगे कार्य केलेले दिसते. फुगडी, धालो, माळेगान, रणमाले (रामलीला), जागर सारख्या लोकनृत्य, लोकगीतांतून स्त्रियांनी गोमंतकीय संस्कृतीचे जतन केलेले आहे आणि आजही अनेक सांस्कृतिक मंडळे ही परंपरा पुढे नेत आहेत. लोकोत्सव, युवा महोत्सव यांसारख्या स्पर्धांमधून नव्या पिढीला स्वत:च्या संस्कृतीचा परिचय होत आहे. स्त्रियांनी केवळ लोकसंस्कृती टिकवली नाही, तर लेखन-वाचनातून त्यांनी गोमंतकाची सांस्कृतिक पार्श्वभूमी अधिकाधिक उन्नत करण्याचा प्रयत्न केला आहे.

शिक्षणात आघाडी

वर्ष 2021च्या जनगणनेनुसार गोव्यातील महिला साक्षरता दर 84.66 टक्के असून इतर प्रगत राज्यांच्या तुलनेत शिक्षण क्षेत्रातही महिलांनी आघाडी मारलेली आपल्याला दिसते. आज एकूण ग्रामीण व शहरी भागातली परिस्थिती पाहता मुली मुलांपेक्षा चांगल्या शिकत आहेत असे ढोबळमानाने आपण म्हणू शकतो. मात्र केवळ चांगले मार्क घेतले म्हणजे खरंच महिला साक्षर झाल्या का? एवढेच आपले कुंपण आहे का? ग्रामीण भागात २५ वर्षांच्या आत मुलींची लग्ने लावून दिली जातात. अशाने त्यांच्या शिक्षणात, नोकरीत खंड पडतो. मातृत्व, कुटुंबाची जबाबदारी इत्यादी गोष्टींमुळे लग्नानंतर त्या शिक्षण पूर्ण करत नाहीत. मग अशा अभ्यासू मुलींच्या बुद्धिमत्तेचा काय सदुपयोग झाला? आपल्या समाजाला, देशाला त्याचा काय फायदा झाला? याचाही विचार आपण केला पाहिजे.

हवे पोषक वातावरण

केवळ चांगले मार्क घेऊन भागत नाही. आपल्या मुलींच्या बुद्धिमत्तेला वाव मिळावा म्हणून आपण किती पोषक वातावरण तयार करत आहोत आणि त्या मुली चाकोरीबाहेर येऊन किती विचार करत आहेत किंवा आपण त्यांना ते स्वातंत्र्य कितपत देत आहोत, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. ‘मुली म्हणजे परक्याचं धन असतात’ अशी पळपुटी कारणे देऊन आपल्या मुलींच्या विकासाभोवती आपणच कुंपणे बांधणे चुकीचे आहे. गोमंतकीयांनी हा विचार स्वत:च्या मनी-मानसी रुजवायलाच हवा.

बौद्धिक विकास महत्त्वाचा

कमावत्या स्त्रियांनीही एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. आपण कमावत्या आहोत म्हणजे आपला विकास होत आहे असे मुळीच नाही. आपण आपल्या बौद्धिक विकासाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. कोणत्याही अलंकारापेक्षा बौद्धिक आहार हा सर्वश्रेष्ठ दागिना असतो. त्यामुळे भौतिक गोष्टींमध्ये गुंतून न पडता आपण वैचारिक प्रगल्भतेकडे लक्ष दिले पाहिजे. तेव्हाच माणूस म्हणून आपला विकास होत असतो.

समानता कागदावर नको

राजकारण हे एक असे क्षेत्र आहे ज्यात महिलांसाठी राखीव जागा असूनही या क्षेत्रात समानता दिसत नाही. आज ज्या स्त्रिया निवडणुकीसाठी उभ्या राहतात त्यातील बहुतेक स्त्रिया केवळ ती जागा महिलांसाठी राखीव आहे आणि स्वत:च्या पतीला निवडणूक लढवता येत नाही म्हणून उभ्या राहतात. स्वतःला हवे म्हणून राहत नाहीत; आणि हे अत्यंत चुकीचे आहे. पतीच्या शिवायही स्त्री लढू शकते आणि जिंकूही शकते. राजकारणात असलेल्या सर्व पुरुषांनीही आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. या षड्‍यंत्रात न पडता सर्व स्त्रियांनी स्वतःचा व आपल्या समाजाचा, उपेक्षित वर्गाचा विचार करूनच राजकारणात उतरले पाहिजे. शशिकलाताई काकोडकर यांच्यासारख्यांचा आदर्श आपल्यासमोर आहेच. त्यामुळे आपण आपले सुप्त गुण ओळखून या क्षेत्रात आपले पाय रोवले पाहिजेत. आपण स्वतंत्र आहोत. आपले विचार स्वतंत्र आहेत हा आत्मविश्वास मनी बाळगून सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केला पाहिजे.

स्वावलंबनासाठी...

व्यवसायक्षेत्रांत आज महिला खूप पुढे आलेल्या आहेत. महिला मंडळांमधून बहुतांश महिलांना व्यवसायात चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. मात्र यातून सर्व महिलांचा आर्थिक विकास होत आहे का, तेही पाहिले पाहिजे. बऱ्याच वेळा अशा मंडळांमध्ये आंतरिक राजकारण होत असल्यामुळे सर्व महिलांना समान संधी मिळत नाही. दुसरी गोष्ट, बहुतेक सर्वच महिला मंडळे स्वत: निर्मित केलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी पारंपरिक मार्गांचा अवलंब करतात. म्हणजेच दुकानातून ग्राहक थेट येऊन हे पदार्थ घेतात. मात्र अशा महिलांना अॅमेझोन, मीशो सारख्या ऑनलाइन खरेदी विक्री माध्यमांवरून आपले पदार्थ अजून लोकांपर्यंत कसे पोहोचवता येतील याचे प्रशिक्षण दिले पाहिजे. तसेच उत्पादनांच्या विक्रीसाठी कमी पैशांत जाहिरातबाजी करण्याकडेही लक्ष दिले पाहिजे.

सर्वच क्षेत्रात आघाडी

आज गोव्यात प्रत्येक क्षेत्रात महिलांचे नाव झळकताना दिसते. अगदी डीलिव्हरी एजेंट, ड्रायव्हर, माडावर चढण्यापासून ते वरिष्ठ आधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसण्याचा मान महिलांनी मिळवलेला आहे. आणि हा आकडा अधिकाधिक मोठा होत जाईल अशी आशा आहे.

स्वत:साठी जगू या

कवी किरण येले यांच्या ‘बाईच्या कविता’ या काव्यसंग्रहात कवीने स्त्रीवादाचा अतिशय सूक्ष्मपणे वेध घेतलेला आहे. त्यात कवी एका कवितेत म्हणतात ‘‘...जिद्धीने उठलीस, माजघरातनं बाहेर आलीस, त्यांनीही साथ दिली तुला. मंचावरल्या प्रकाशझोतात सादर केले तुला, त्यांना हवे तसे... बये, सांभाळ. पुन्हा स्वतःवर लुब्ध होऊ नको. तुला पुन्हा आतल्या खोलीत नेण्याचा त्यांचा हा नवा मार्ग असू शकतो.’’ या ओळी सर्व स्त्रियांनी आपल्या मनावर कोरून ठेवल्या पाहिजेत. आपल्या पंखांमधले सगळे बळ एकवटून आपण स्वतःसाठी जगू या! आपल्या राज्याला आणि देशाला स्त्रीतत्त्वाने घडवू या! परंतु, आभाळाशी मैत्री करताना मातीला मात्र विसरू याचे भान गोमंतकीय महिलांनी ठेवायलाच हवे.

शुभलक्ष्मी नाईक-गावकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com