Canacona News: मराठी शाळांवर आलीय संक्रांत ! स्‍थिती बिकट ; शिक्षण खाते उदासीन

या परिस्थितीत सुधारणा करणे आवश्यक आहे. अन्यथा आगामी शैक्षणिक वर्षात काणकोण तालुक्यातील प्राथमिक शाळांची संख्या आणखी घटण्याची शक्यता शैक्षणिक क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
Marathi School
Marathi School Dainik Gomantak
Published on
Updated on

Canacona News: काणकोण तालुक्यात मराठी शाळांची संख्या दरवर्षी घटत आहे. या तालुक्यात प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण क्षेत्राकडे शिक्षण खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. त्‍यामुळेच हे वाईट दिवस आले आहेत.

गोवा मुक्तिनंतर पहिले मुख्‍यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा पोचविताना वाड्यावाड्यावर प्राथमिक शाळा सुरू केल्या होत्या.

परंतु राज्‍यातील आतापर्यंतच्या सरकारी अनास्थेमुळे दरवर्षी सर्वसाधारणपणे एक-दोन शाळा बंद पडायला लागल्या आहेत. यंदाच्या शालेय वर्षात धवळखाजन, मलोरे, ईडदर आणि मुठाळ अशा चार प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांची संख्या घटल्यामुळे बंद पडल्या आहेत.

तालुक्यातील भागशिक्षणाधिकारी कार्यालयात चार भागशिक्षणाधिकाऱ्यांची गरज असताना काणकोणात मात्र दोनच अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यातील एक अधिकारी तीन दिवस सांगे व तीन दिवस काणकोण असे काम सांभाळत होता.

गंमत म्हणजे आता तर तो अधिकारी सेवानिवृत्त झाला आहे. त्यामुळे आजपासून फक्त एकाच भागशिक्षणाधिकाऱ्यावर येथील शिक्षणाचा कारभार आहे. त्यामुळे त्‍याला भरपूर धावपळ करावी लागणार आहे.

काणकोण भागशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे चालक व‌ वाहन‌ आहे. मात्र कामाचा वाढता ताण यामुळे नियमित शालेय तपासणी करणे भागशिक्षणाधिकाऱ्यांना शक्य नाही होत. तरी देखील गेल्या काही महिन्यांत या अधिकाऱ्यांनी बऱ्यापैकी तपासणी केलेली आहे.

सध्या काणकोण तालुक्यातील ५८ शाळांमध्ये मिळून ७३ सरकारी प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. शिवाय खास इंग्रजीसाठी १९ शिक्षक नियुक्त आहेत. त्‍यांच्‍यावर दोन-दोन शाळांची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.

शिवाय ५ पॅरा शिक्षक तर ८ शिक्षक कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत. हे शिक्षकसुद्धा एकाच वेळी दोन ते तीन शाळा सांभाळत आहेत.

स्‍पर्धेत टिकून राहणे गरजेचे

या परिस्थितीत सुधारणा करणे आवश्यक आहे. अन्यथा आगामी शैक्षणिक वर्षात काणकोण तालुक्यातील प्राथमिक शाळांची संख्या आणखी घटण्याची शक्यता शैक्षणिक क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

शाळा टिकविण्यासाठी खासगी संस्थांकडून जसे बालरथ व अन्य प्रकारच्या सुविधा पुरविल्‍या जातात, तसे प्रयत्‍न सरकारी शाळांकडून होताना असल्याचे दिसून येत नाही. याचाच परिणाम म्हणून मराठी प्राथमिक शाळा कठीण परिस्थितितून जात आहेत. सरकारच्याच चुकांचा परिणाम मराठी शाळांना भोगावा लागत आहे.

Marathi School
Monsoon in Goa - चोडण फेरी धक्का गेला पाण्याखाली | Gomantak TV

७६ प्राथमिक शाळांची संख्‍या आली ५८ वर

गाव सोडून शहरात धावण्याची हौस, त्याहीपेक्षा पुढे जाऊन एक किलोमीटर अंतरावर खासगी संस्थांना प्राथमिक शाळा सुरू करण्‍यासाठी शिक्षण खात्याने परवानगी देण्याचा घेतलेला आत्मघाती निर्णय, यामुळे आजची स्थिती ओढवली आहे.

पाच वर्षांपूर्वी या तालुक्यात ७६ प्राथमिक शाळा सुरू होत्या. आता या शाळांची संख्या कमी होऊन ५८ वर आली आहे. आता काही शाळा जवळच्या प्राथमिक शाळेला जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मागच्या जूनपर्यंत या तालुक्यातील १३ शिक्षक सेवानिवृत्त झाले. काही शाळा दोन ते तीन शिक्षकी आहेत. त्यामुळे अजून शिक्षकांची गरज आहे. काणकोणात सहा माध्यमिक शाळा आहेत. मुख्याध्यापकांवरही दोन-दोन शाळांची जबाबदारी आहे.

माध्यमिक व एकमेव सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात तासिका तत्वावर शिक्षक कार्यरत आहेत. कायमस्‍वरूपी शिक्षकांची भरती केली नसल्यामुळे शिकवणीवर परिणाम होत आहे.

त्‍यामुळे शिक्षण खात्याचे काणकोण तालुक्यातील समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या प्रतिक्रिया पालकवर्गांकडून व्यक्त होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com