कुंकळ्ळी
यंदा कोरोना महामारीची धास्ती असली, तरी राज्यात अनेक ठिकाणी घरोघरी थोडेच दिवस, पण मोठ्या उत्साहाने गणेशमूर्तींचे पूजन करण्याचे सर्वांनीच ठरविले आहे. यंदा कोरोना महामारीमुळे अनेक ठिकाणच्या भटजींनी घरोघरी गणेशपूजेसाठी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेकांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. परंतु याला अपवाद आहे तो कुंकळ्ळीतील मराठ्यांचा. कुंकळ्ळीतील मराठे दरवर्षी आपण पूजलेल्या गणेशाची आपणच पूजा करतात. त्यामुळे त्यांना भटजींवर अवलंबून रहावे लागत नाही. आता कोरोनामुळे कुंकळ्ळीतील मराठ्यांनीच का सर्वांनीच स्वतः गणेश पूजन करण्याचा विषय पुढे आला आहे.
गणेशचतुर्थी हा गोमंतकीय हिंदूंचा मोठा सण. या उत्सवाला गोव्यात उधाण येत असते. श्रीमंतच नव्हे, तर गरीब भाविकही गणेशोत्सवात हातचे न राखता खर्च करून आनंदोत्सव साजरा करीत आले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवात करोडो रुपायांची उलाढाल होत होती. हे सर्व ठप्प झाले आहे. काही मत्र्यांनी तर गणेशोत्सव फेब्रुवारीत करण्याचाही सल्ला दिला आहे. सार्वजनिक तसे घरी पुजणाऱ्या गणपती उत्सवावर सरकारने अनेक बंधने लादली आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केवळ दीड दिवस साधेपणाने गणपती साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना महामारी आपल्यावर भारी पडली आहे हे सत्य आहे. मात्र, सनातनी धर्माला छेद देणे, ज्या भावना आहात, जे रितीरिवाज आहेत व परंपरा आहेत, त्या तोडणे शक्य आहे का? एकदा गणपती पूजन केले म्हणजे त्यात खंड पडल्यास कोप होतो अशी भावना लोकांत आहे, त्यामुळे ५, ७, ११ दिवसांऐवजी दीड दिवस का असेना पण चतुर्थी सण उत्साहात साजरा करण्याचे सर्वांनीच मनोभावे ठरविले आहे.
या सर्वात महत्वाचे म्हणजे धार्मिक उत्सवात व पुजेला भटजी अनिवार्य असतो. मात्र, भटजींनी यंदा लोकांच्या घरी पुजेसाठी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. काही जणांनी ऑनलाईन पुजेचा पर्याय खुला ठेवला आहे. मात्र, ज्यांची देव धर्मावर श्रद्धा आहे, जे सनातनी विचाराचे आहेत, त्यांना पूजा ऑनलाईन करणे मान्य नाही. भटजींनीच गणपती पुजला पाहिजे असा हट्ट अनेकांनी धरला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी भेटजीच गणपती पुजेला लावतात. याला अपवाद आहे कुंकळ्ळीतील क्षत्रिय मराठा समाजाचे भाविक. कुंकळ्ळीतील मराठे गणपती पूजनाला भटजींवर निर्भर राहत नाहीत. स्वतःच्या घरच्या गणपतीला स्वतःच पुजेला लावतात व स्वतःच संपूर्ण देव कार्य करतात. हे कार्य शास्त्रशुद्ध नसल्याचा दावा करणारेही आहेत. जर कोरोनाच्या काळात आपण आपल्या गणपतीची पूजा स्वतःच करणार असेल तर हे कोरोना महामारी नसताना का शक्य नाही. कुंकळ्ळीत मराठे ज्याप्रमाणे गणपतीची पूजा करतात तशी पूजा इतरांनी करणे गैर आहे का?
कुंकळ्ळीतील पत्रीच्या गणपतीची दंत कथा
कुंकळ्ळीतील काही मराठ्यांच्या घरी गणपती पुजला जात नाही. कुंकळ्ळीतील बांदेकर घराण्यातील मराठे गणेशचतुर्थीला गणपती पूजन करीत नाहीत. गणपती पुजण्याचा अधिकार बांदेकर घराण्यातील लोकांना नाही. गणेशचतुर्थीला घरात नारळसुद्धा फोडणे गैर असल्याचे हे बांदेकर बांधव मानतात. या मराठ्यांच्या घरी गणपती का पूजला जात नाही यावर एक दंतकथा प्रचलित आहे. ती अशी -
गणेश चतुर्थीला गणेश पूजनाच्या वेळी गणेशाला रानात मिळणारी पत्री नावाच्या वनस्पतीची पाने अर्पण करण्याची पद्धत आहे. पांढऱ्या रंगाची पत्रीची पाने गणपतीला अर्पण करावी असा दंडक आहे. या दंतकथेप्रमाणे पुष्कळ वर्षापूर्वी बांदेकर घराण्याचे पूर्वज पत्री आणण्यास रानात गेले होते. एकूण बाराजण रानात पत्री आणण्यास गेले होते. पत्री व इतर माटोळीचे साहित्य गोळा करून रानातून माघारी परतताना त्या बाराच्या प्रमुखाने रानात आलेल्यांची गणती सुरू केल्यास त्याला अकराच मिळाले, एकजण कमी झाल्याचे त्याला वाटले. गणित चुकले असे समजून दुसऱ्याने, तिसऱ्याने, चौथ्याने करीत सर्वांनी रानात असलेल्यांची गणती केली असता त्यांना आपल्यातील एकजण कमी आढळला. त्यांना वाटले की आपल्यापैकी एकाला रानात वाघाने खाल्ले असावे असे समजून त्यांनी घरी गणपती पूजन केलेच नाही व ती परंपरा स्वीकारली नाही. तेव्हापासून या घराण्यातील लोक गणेपती पुजत नाहीत. खरे म्हणजे कोणालाही वाघाणे खाल्ले नव्हते. किंवा कोणी गायबही झाला नव्हता. ते बारापैकी बाराच होते. मात्र, प्रत्येकजण मोजताना आपल्याला सोडून मोजत होता. म्हणून अकरा मिळत होते. या दंतकथेला शास्त्रीय आधार नसला तरी ही परंपरा आहे.
संपादन - यशवंत पाटील
|