
बार्देश: म्हापसा पालिका बाजारपेठेला सध्या अनेक समस्या भेडसावत आहेत. अंतर्गत रस्त्यांवर पडलेले खड्डे, गटारावरील लाद्या फुटून गटारात पडल्या असल्याने रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी, तसेच ठिकठिकाणी साचलेला कचरा यामुळे या बाजारपेठेची रया गेली आहे. याचा प्रचंड त्रास बाजारपेठेतील विक्रेते व ग्राहकांना होत आहे. मात्र याकडे पालिकेने दुर्लक्ष चालवले आहे, त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
बाजारपेठेतील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. गटारावरील लाद्या गटारात पडलेल्या असल्याने सांडपाणी व कचरा रस्त्यांवरून वाहत आहे. मात्र याकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. ही बाजारपेठेत उत्तर गोव्यातील प्रमुख बाजारपेठ असून शेजारील राज्यातूनही लोक या बाजारात खरेदी तसेच विक्रीसाठी येतात.
शुक्रवारी भरणारा आठवडी बाजाराला तर मोठी गर्दी उसळते. मात्र सध्या या बाजारपेठेतील अंतर्गत सर्व रस्ते खड्ड्यांत हरवले आहेत. या खड्ड्यांतून चालणेही कठीण होत आहे. म्हापसा बाजारपेठेत गटारांची देखील गटारगंगा झालेली असून गटारावरील लाद्या तुटून गटारात पडलेल्या असल्याने सांडपाणी व कचरा रस्त्यांवरून वाहताना दिसत आहे.
अनेक ठिकाणी गटारे तर उघडीच आहेत. त्यात बहुतेक गटारे ही कचऱ्याने तुंबली आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा होत असून पाणी रस्त्यांवरून वाहताना दिसत आहे.
संगीत खुर्चीमुळे दुर्लक्ष !
म्हापसा पालिकेत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी संगीत खुर्चीचा खेळ असल्याने पालिकेला बाजारातील रस्त्यांकडे व गटारांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. पालिका मंडळाच्या बैठकीमध्ये विरोधी नगरसेवक याकडे लक्ष वेधतात पण सत्ताधारी मंडळ त्याकडे दुर्लक्ष करते, असा आरोप विरोधी गटाकडून केला जात आहे.
रस्ते, गटार, पार्किंग सुधारणा आवश्यक : राऊत
म्हापसा व्यापारी संघटनेचे सचिव सिद्धेश राऊत यांनी सांगितले की, गणेशचतुर्थी जवळ येऊन ठेपली आहे, त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी उसळणार आहे. त्यामुळे बाजारपेठेतील रस्ते, गटार व्यवस्थेत सुधारणा करणे आवश्यक आहे. तसेच पार्किंग व्यवस्था नवीन बसस्थानकाकडे करावी, माटोळीचे साहित्य विक्रेत्यांना एका रांगेत जागा द्यावी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.