Mapusa Market: म्‍हापसा मार्केट अस्‍वच्‍छतेचे आगर! धोकादायक छत, घाणीचे साम्राज्य; चणेभट्टी इमारतीत चालतात अनैतिक कृत्‍ये

Mapusa market sanitary issue: या इमारतीच्या जिन्यांची तर कधी स्वच्छताच होत नाही. त्यामुळे जिन्यांवर घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसते. बाजूच्या भिंती पिचकाऱ्या मारल्‍याने रंगविल्या गेल्‍या आहेत.
Mapusa Market
Mapusa Market Dainik Gomantak
Published on
Updated on

म्‍हापसा: स्वच्छतेच्या बाबतीत तर म्‍हापसा मार्केटची अधोगतीच झालेली आहे. मासळी व मांस प्रकल्पातील स्टॉल्सधारकांकडे आरोग्य खात्‍याची ‘एनओसी’ नाही. तसेच अनेक स्वच्छतेच्या निकषांची पूर्तता करण्यास ते अपयशी ठरले आहेत. अनेक स्टॉल्सधारकांकडे गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, अन्न आणि औषध प्रशासन, आरोग्य विभागाचे अनिवार्य परवाने नाहीत. हे वेळोवेळी आरोग्य यंत्रणांच्या तपासणीतून समोर आले आहे. परंतु यावर सर्व बाजूंनी चुप्‍पी साधली जाते किंबहुना नाममात्र कारवाई केली जाते.

मासळी-मांस मार्केट परिसराला तर ओंगळवाणे स्वरूप आले आहे. अतिक्रमण केलेले पदपथ, पान-तंबाखू खाऊन रंगवलेल्या मासळी-मांस प्रकल्‍प इमारतींच्‍या भिंती पालिका कर्मचाऱ्यांनी कधी स्‍वच्‍छ केल्‍या आहेत, हे आठवतही नाही. सगळीकडे अस्‍वच्‍छताच दिसून येते. पालिका कामगार देखील सुस्‍तावले आहेत. त्‍यांनीही स्वच्छतेकडे डोळेझाकच केली आहे. पालिकेने या मासळी-मांस प्रकल्पाच्या स्वच्छतेसाठी कामगारांची नियुक्ती केलेली आहे. तरीही इमारतीच्या तळ व पहिल्या मजल्याची सर्वत्र घाण दिसून येते.

या इमारतीच्या जिन्यांची तर कधी स्वच्छताच होत नाही. त्यामुळे जिन्यांवर घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसते. बाजूच्या भिंती पान-तंबाखूजन्य पदार्थ खाऊन पिचकाऱ्या मारल्‍याने रंगविल्या गेल्‍या आहेत. त्यामुळे पालिकेतर्फे शहरवासीयांना करण्‍यात येणारे स्वच्छता राखण्याचे आवाहन तकलादू वाटते. कारण त्यांच्याच घरात स्वच्छतेची वानवा आहे.

मासळी मार्केटच्या बाहेर राशीने कचरा टाकला जातो. त्यामुळे घाण पसरते. वेळीच या कचऱ्याची उकल होत नाही. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांना नाक मुठीत धरून जावे लागते. मार्केटची साफसफाई, नादुरुस्त विद्युत उपकरणे तसेच एकंदरीत डागडुजीवर पालिका अधिकारी, नगराध्यक्षांचे आम्ही लक्ष वेधले आहे. मात्र, पालिका प्रशासनाकडून याची अपेक्षित दखल घेतली जात नाही, असे मासळीविक्रेत्यांनी सांगितले.

४० केएलडी सांडपाणी प्रकल्प मंजुरीच्‍या प्रतीक्षेत

मासळी मार्केटमधून तयार होणाऱ्या सांडपाण्‍यावर प्रक्रिया करण्‍यासाठी आवश्यक ४० केएलडी प्रकल्पाला गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. परिणामी, मासळी मार्केट परवानगीशिवाय व बेकायदा सुरू आहे. या सांडपाणी प्रकल्पामुळे म्हापसा मासळी व मांस मार्केट संकुलातून प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडण्याच्या दीर्घकालीन समस्येचे निराकरण होण्याची अपेक्षा आहे. सध्या या मासळी प्रकल्पातील सांडपाणी हे सार्वजनिक नाल्यांमध्ये सोडले जात आहे, जे अखेर म्हापसा तार नदीत वाहून जाते. परिणामी, प्रदूषणात भर पडते. मासळी प्रकल्‍पाची इमारत तीन मजली असून, जवळपास अडीचशेपेक्षा अधिक विक्रेते व्यवसाय करतात. तर, पहिल्या मजल्यावर चिकन तसेच मटणविक्रीची दुकाने आहेत.

चणेभट्टी इमारतीत अंधारात चालतात अनैतिक कृत्‍ये

मासळी आणि मांस या दोन्‍ही प्रकल्‍पांप्रमाणेच चणेभट्टी असलेल्या इमारतींची तीच दशा आहे. येथील तळमजल्यावरील भिंतीही अनेकांनी पान-तंबाखूच्‍या पिचकाऱ्यांनी रंगवलेल्या आहेत. या इमारतीला अलीकडच्या काळात कधी साधी रंगरंगोटी किंवा चुना काढलेला नाही. शिवाय या ठिकाणरात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन काही अनैतिक प्रकारही घडतात, अशा वाढत्‍या तक्रारी आहेत.

छताचे तुकडे कपाळावर पडण्‍याची भीती

म्हापसा पालिका बाजारपेठेमधील पॅसेज भागातील छताच्या काँक्रीटचे तुकडे अधूनमधून पडतात. यावरून, या मार्केटची दुर्दशा लक्षात येते. येथील काही व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकानांमध्‍ये डागडुजी करून, ती सांभाळली आहेत. मात्र इतरत्र, जिथे पालिका प्रशासनाला लक्ष घालण्याची व दुरुस्तीची गरज आहे, तेथे पालिका विशेष प्रयत्न करताना दिसत नाही. सर्वांत जास्त प्रभावित भाग म्हणजे म्‍हापसा बाजारपेठ प्रवेशद्वाराच्या बाजूचा परिसर. येथील सिलिंगचे काँक्रीट कमकुवत झाल्याने, वारंवार हे सिमेंटचे तुकडे कोसळत असतात. पावसाळ्यात तर खूप मोठा धोका संभवतो.

मार्केट परिसरात स्वच्छतेचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. तो मग रस्त्याच्या बाजूला असो किंवा दुकानांच्या पाठीमागील बाजूला असो. लोक मिळेल तिथे कचरा फेकत असल्याने परिसराला गलिच्छ स्वरूप प्राप्‍त झाले आहे. पावसाळ्यात डासांची पैदाशीसाठी म्‍हापसा बाजारपेठ योग्य ठिकाण बनले आहे. विशेष म्हणजे, पालिकेने मार्केटमधील गटारांवर दुकाने थाटून मसाले तसेच फळांची विक्री करण्‍यास अनुमती दिली आहे. साहजिकच आरोग्याच्या दृष्टिकोनातून पालिकेने कोणतीच खबरदारी घेतलेली दिसत नाही.

सांडपाणी सोडले जाते थेट नाल्‍यांत

मासळी मार्केटजवळ आरोग्य खात्याचे ना-हरकत प्रमाणपत्र नाही. कारण मार्केटमधून निर्मिती होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी म्हापसा पालिका मंडळाने आवश्यक खबरदारी घेतलेली नाही. या इमारतींचे सांडपाणी सर्रासपणे उघड्या नाल्यांत सोडले जात आहे. नंतर हेच पाणी पुढे म्हापसा नदीत (तारीकडे) जाऊन मिसळते. त्यामुळे एकंदरीत प्रशासनातील खात्यांमध्‍ये समन्वयाचा अभाव दिसतो. यातून म्हापसा पालिका शहरातील साफसफाई, स्वच्छतेसाठी किती गंभीर आहे, हे अधोरेखित होते.

या ६० वर्षीय जुन्या म्हापसा बाजारपेठेला मोठा पोर्तुगीजकालीन वारसा आहे. सुयोग्‍य रचना व शिस्तबद्ध नियोजन ही या मार्केटची वैशिष्‍ट्यपूर्ण खासियत. परंतु, कालांतराने मार्केटमध्ये वाढलेली विक्रेत्यांची संख्या, व्यवसायीकरण तसेच कृती धोरणांच्या अभावामुळे येथील मार्केटच्या पारंपरिकतेला अन् वैभवाला गालबोट लागले आहे. प्रशस्त अशा या मार्केटमधील रस्ते व पदपथ विक्रेत्यांनी अतिक्रमण करून अडविले आहे. भरमसाठ विक्रेत्यांचा भरणा करून त्यांना एक प्रकारे जागा विकणे, रस्त्यांवर गाळेवजा दुकाने थाटणे, अडविलेल्या पदपथांवर मालाचे प्रदर्शन करण्यास मुभा देणे, दुकानदारांच्या अतिक्रमणाला अप्रत्यक्ष पाठबळ देणे, मॉडिफिकेशनच्या नावाखाली दुकानांच्या मूळ रचनेत बदल करण्यास प्रोत्साहन देणे अशा अवैध गोष्टींना अप्रत्यक्षपणे म्हापसा पालिकेकडून वेळोवेळी वाव मिळत गेला.

रस्‍त्‍यांवरील कोट्यवधींचा खर्च पाण्‍यात गेला वाहून

समस्‍या या म्हापसा शहराच्‍या पाचवीलाच पुजलेल्या आहेत. लोकप्रतिनिधी आश्‍‍वासनांवर आश्‍‍वासने देतात, पण ती कधी पूर्ण करत नाहीत. त्‍यामुळे उत्तर गोव्‍यातील ही सर्वांत मोठी बाजारपेठ विकासापासून वंचित राहिली आहे.

म्हापसा शहराला एक मोठा इतिहास आहे व तो म्हणजे ज्‍या वस्‍तू कोठे मिळत नाहीत त्‍या या बाजारपेठेत मिळतात. म्हणूनच म्हापसा शहराला ‘उत्तर गोव्याची राजधानी’ असे म्‍हटले जाते. परंतु राजकीय नेत्यांच्या हलगर्जीपणामुळे हे शहर विकासाच्‍याबाबतीत खूपच मागे राहिलेले आहे.

लाखो लिटर पाण्‍याची नासाडी

म्हापसा शहरातील गटारांची दुरुस्ती, रस्‍ते आणि अन्‍य काही कामे पावसाळ्‍यापूर्वी सुरू सुरू करण्यात आली होती. त्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याचे खोदकाम करताना जलवाहिनी अनेक ठिकाणी फोडली गेली. पण काही ठिकाणी ती दुरुस्‍त करण्‍यात आलीच नाही. त्‍यामुळे पाण्याचे व्हॉल निकामी झाले. तेव्‍हापासून आत्तापर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले आहे आणि जात आहे. पण सार्वजनिक बांधकाम खात्‍याच्‍या पाणीपुरवठा विभागाने त्‍याकडे कधीच लक्ष दिले नाही. कार्व्हालो पेट्रोलपंप ते श्री बोडगेश्‍‍वर मंदिरापर्यंतच्या म्हापसा-कळंगुट मार्गावरील रस्त्याच्या बाजूच्या गटाराचे काम करताना जेसीबीचा धक्का लागून मोठी जलवाहिनी फुटली.

पावसाळ्‍यातही नळ कोरडे

राज्‍यात मुबलक पाऊस पडत असूनही म्‍हापशातील विशेषत: बार्देश तालुक्‍यातील लोकांना दररोज तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. राज्यात सर्वांत दाट लोकवस्ती असलेल्या आणि वेगाने वाढणाऱ्या तालुक्यांपैकी एक असलेल्या या तालुक्यात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याबद्दल गोवा प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष डॉ. प्रतीक्षा खलप यांनी संताप व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com