Mapusa
MapusaDainik Gomantak

Mapusa: ग्रीन पार्क जंक्शनवरील 'इंटरचेंज' वाहनचालकांसाठी धोकादायक! अपघातानंतरच सरकारला जाग येणार का?

Mapusa Green Park Interchange: गिरी-म्हापसा येथे ग्रीन पार्क जंक्शनवरील उड्डाण पूलाच्या जवळ भीषण अपघातात सचिवालयातील कायदा विभागाचे अवर सचिव नारायण अभ्यंकर (५१, रा. कोलवाळ) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
Published on

म्हापसा: गिरी-म्हापसा येथे ग्रीन पार्क जंक्शनवरील उड्डाण पूलाच्या जवळ खासगी प्रवासी बस व स्कूटरमध्ये झालेल्या भीषण अपघातात सचिवालयातील कायदा विभागाचे अवर सचिव नारायण अभ्यंकर (५१, रा. कोलवाळ) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे या महामार्गाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ग्रीन पार्क जंक्शनवरुन म्हापशाच्या दिशेने सर्व्हिस रस्त्यावरुन येणारी वाहने नंतर पुढे बगलमहामार्गाला जोडली जातात. त्यावेळी सर्व्हिस रस्ता व महामार्ग या ‘इंटरचेंज’ बिंदूवर वाहनांची गती ही अपघाताचे मुख्य कारण ठरत आहे. याठिकाणी वाहतूक पोलिसांकडून ठोस उपाययोजना राबविण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांनी सांगितले.

ग्रीन पार्क जंक्शनवरील सर्व्हिस रस्त्याच्या बाजूला शेतजमिनीत मातीचा भराव टाकला जात आहे. येथे वीज टॉवर उभे करायचे असल्याने येथे भराव टाकून तिथे जाण्यासाठी मार्ग केला जात आहे. त्यामुळे ट्रक तसेच इतर अवजड वाहनांची मोठी वर्दळ या सर्व्हिस रस्त्यावरुन सुरु असते.

हे ट्रक माती घेऊन येत असल्याने सर्व्हिस रस्ता व महामार्ग जोडतो त्या संगमावरुन पुढे पणजीच्या दिशेने काही अंतरापर्यंत डाव्या बाजूला माती सांडते. पावसात रस्त्यावर चिखलही होते. रस्ता निसरडा बनतो त्यामुळे अपघातांची शक्यता वाढते.

या जंक्शनवर उड्डाणपूल असल्याने करासवाडाच्या बाजूने पणजीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांचा वेग उतरणीमुळे थोडा जास्त असतो. त्यातच बस किंवा अवजड वाहनचालक सर्व्हिस रस्त्यावरुन गाडी काढताना ती वेगाने हाकतात. त्यामुळे सर्व्हिस रस्ता जिथे महामार्गाला जोडतो, त्या ‘इंटरचेंज’पूर्वी सर्व्हिस रस्त्यावर गतिरोधक उभारण्याची आवश्यकता आहे.

मंगळवारी (ता.८) सकाळी ग्रीनपार्क उड्डाणपूल ओलांडून काही अंतरावर गेल्यानंतर सर्व्हिस रस्त्यावरुन महामार्गावर येणाऱ्या प्रवासी बसने नारायण अभ्यंकरांच्या स्कूटरला धडक दिली होती. या अपघातात अभ्यंकरांचे स्कूटरवरील नियंत्रण सुटले आणि ते डाव्याबाजूला बसखाली आले. या अपघातात त्यांना दुर्दैवी मरण आले होते. त्याचप्रमाणे, ग्रीनपार्क जंक्शनकडून पणजीच्या दिशेने जाणारा सर्व्हिस रस्ता हा अर्धवट स्थिती आहेत. तो पूर्ण करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com