Mahadayi Water Dispute: म्हादईच्या रक्षणासाठी शासन निद्रिस्त असून सर्वाधिक म्हादईवर अवलंबून असलेले सत्तरी, डिचोलीवासीय म्हादईबाबत मूग गिळून गप्पगार झाले आहेत. सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे जाहीरपणे कोणीही बोलत नाहीत किंवा जागृतीसाठी पुढे येत नाहीत. त्याउलट सासष्टी, पेडणे-मांद्रे, फोंड्यात मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण झाली आहे.
मांद्रेत सर्वपक्षीयांतर्फे 5 हजारहून अधिक घरात म्हादई नदीतील जलाचे कलशपूजन होणार आहे. तसेच म्हादई बचावच्या सासष्टी विभागाने रविवारी घरोघरी अंगणात पणती, मेणबत्ती लावण्याचे आवाहन केले आहे आणि हीच ‘ज्योत’ म्हादई वाचविण्यासाठी नवी दिशा देईल, असा म्हादईप्रेमींना विश्वास आहे.
सत्तरी आणि डिचोली तालुका म्हादईच्या पाण्यावर अवलंबून असून पाणी कमी झाले, तर या दोन्ही तालुक्यांतील शेती, बागायती आणि जलस्रोतांवर मोठे संकट येणार आहे, याची जाणीव या भागातील ग्रामस्थांना आहे. परंतु राजकारण्यांच्या भीतीने, दबावामुळे कोणीही पुढे येत नाही. विर्डीतील सभेला या दोन्ही तालुक्यांतील अवघेच ग्रामस्थ बिनधास्त बैठकीला उपस्थित होते.
पण इतर अनेकजण मनात इच्छा असूनही म्हादई बचावासाठी पुढे आले नाहीत. बैठकांनाही उपस्थित राहात नाहीत. प्रत्येकाला आपली बदली होईल, नोकरी मिळण्यात अडचण येईल, अशी भीती वाटते. त्यामुळे खासगीत म्हादई बचाव चळवळीला पाठिंबा व्यक्त करणारे जाहीर बैठका किंवा इतर ठिकाणी उपस्थित राहत नाहीत.
स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणतात, सरकार योग्य प्रकारे प्रश्न हाताळत आहे, वेगळ्या लढ्याची गरज नाही, असाच सूरच मतदारांपर्यंत ते पोचवत आहेत. त्यामुळेही कदाचित सत्तरी-डिचोलीतील ग्रामस्थ गप्प असावेत.
काही स्थानिक पंचायत, नगरपालिका, जिल्हा पंचायत पातळीवरील नेतेमंडळीसुद्धा म्हादईबाबत कुठेही आक्रमक होताना दिसत नाही. त्यामुळे सगळीकडे शांतता दिसत आहे.
कदाचित कळसा-भांडुरांचे काम सुरू झाल्यानंतर हे लोक जागे होतील, असे मत पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत.
...सर्वांनी एकत्र येण्याची गरज
म्हादईच्या रक्षणासाठी म्हादई बचाव मंचच्या सासष्टी विभागातर्फे रविवार, 12 रोजी घरोघरी पणती, मेणबत्ती प्रज्वलित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निद्रिस्त सरकारला जाग आणण्यासाठी हा उपक्रम असल्याचे आयोजकांचे मत आहे.
त्यामुळे सत्तरी, डिचोलीवासीयांनीही यातून बोध घेऊन कृती करायला हवी, राजकारण्याचा दबाव थोडा दूर करून सर्वांनी म्हादईसाठी एकत्र येण्याची गरज आहे, अशी अपेक्षा म्हादई बचावच्या कार्यकर्त्यांची आहे.
पण लक्षात कोण घेतो?
म्हादई अभयारण्यात व्याघ्र क्षेत्र अमलात येणे गरजेचे आहे. 60 टक्के क्षेत्र वाघांसाठी संरक्षित झाले तर म्हादईवरील संकट दूर होण्यास मदत होईल. पण काही गावांना फटका बसेल अशी भीती निर्माण केली गेली आहे. आमदारांनीही या प्रकल्पाला विरोध केला आहे. या प्रकारामुळेम्हादईवरील संकट गडद होत आहे.
वन्यजीवांचे संरक्षण झाले, तरच सत्तरीचेही संरक्षण होणार आहे, हेच पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर व इतरांनी अनेक वेळा स्पष्ट केले आहे. पण हा मुद्दा ‘पण लक्षात कोण घेतो’, अशी स्थिती अद्याप कायम आहे.
मांद्रेवासीय सक्रिय: म्हादईच्या रक्षणासाठी मांद्रे मतदारसंघात ‘सेव्ह म्हादई, गोवा मुव्हमेंट’तर्फे सर्वपक्षीयांनी एकजूट दाखवली असून रविवारी 5 हजारहून अधिक घरांमध्ये म्हादईच्या जलासह कलशपूजन करण्यात येणार आहे. शिवाय आमदार जीत आरोलकरांनाही भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भूमिका स्पष्ट केली नाही, तर त्यांना मतदारसंघातर्फे जाब विचारण्याचाही निर्धार मांद्रेवासीयांनी केला आहे. असा धाडसी निर्णय सत्तरी, डिचोलीवासीयांनीही घ्यायला हवा. सत्तरी, डिचोलीवासीय मात्र गप्पच आहेत. म्हादईसाठी राजकीय दबावाला बळी न पडता विरोध, निषेध करण्याचे धाडस सत्तरीवासीयांनी दाखवावे, अशी ‘सेव्ह म्हादई, गोवा मुव्हमेंटची भूमिका आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.