North Goa : उत्तर गोव्यात भाजपची प्रचारात आघाडी; मोदी शहांच्या सभांना गर्दी

North Goa : कॉंग्रेसचा व्यक्तिगत संपर्कावर भर; स्टार प्रचारकांची पाठ
North Goa
North GoaDainik Gomantak
Published on
Updated on

अवित बगळे

North Goa :

गेले पंधरा लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे मात्र हा प्रचार सुरू आहे, असे कोणाला जाणवत नाही. ज्या ठिकाणी प्रचार सुरू आहे, त्याच ठिकाणी केवळ सभा, बैठका, पदयात्रा, घरोघरी भेटी हे सारे सुरू असते.

मतदारसंघाच्या इतर भागात मात्र तशी सामसूमच असल्याचे दिसते. या प्रचारामध्ये केंद्र आणि राज्य पातळीवरील सत्ताधारी भाजप पक्षाने आघाडी घेतल्याचे दिसून येते. त्यांनी उमेदवारी जाहीर होण्याआधी पासूनच उत्तर गोव्यात प्रचार सुरू केला होता. भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या सभाही गर्दीमुळे गाजल्या. तर कॉंग्रेसच्या गोटात स्टार प्रचारकांनी पाठ फिरवल्याचेच एकंदर चित्र आहे.

North Goa
Goa Congress: भाजप सर्व आघाड्यांवर अपयशी, खलपांना लोकसभेत पाठवा; इंडिया आघाडी

भाजपने श्रीपाद नाईक यांचे नाव उमेदवारीच्या पहिल्याच यादी जाहीर केल्याने भाजपला आपला प्रचार नेटाने पुढे नेणे शक्य झाले. ‘आरजी’चे मनोज परब यांनी आपला प्रचार त्याआधीही सुरू केला होता. मात्र, संघटनात्मक पातळीवर फारशी मोठी बांधणी नसल्याने त्यांचा प्रचार मर्यादित राहिला होता.

काँग्रेस या प्रमुख विरोधी पक्षाने आपला उमेदवार जाहीर करण्यासाठी फारच वेळ घेतला. नेते आज उमेदवार जाहीर करू, उद्या उमेदवार जाहीर करू असे सांगत  वेळ मारून नेत होते. अखेर त्यांनी  माजी केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)  ॲड. रमाकांत खलप यांना उमेदवारी दिली.  त्यांची उमेदवारी निश्चित करताना विरोधी पक्ष नेते युरी  आलेमाव आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात येते. किंबहुना त्यांनीच ही नावे निश्चित करून नंतर केंद्रीय पातळीवर शिक्कामोर्तब केले, ही वस्तुस्थिती आहे. 

North Goa
Goa Today's News Wrap: शशी थरूर, पवन खेरा गोव्यात, शहांची शुक्रवारी सभा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

भाजपचे बळकट संघटन

भाजपने श्रीपाद नाईक यांनाच  उमेदवारी मिळेल असे गृहीत धरून प्रचाराची रणनीती आखणे सुरुवातीपासून सुरू केले. मतदान केंद्र पातळीवर असलेल्या समित्या तसेच शक्ती केंद्राच्या समित्या सक्रिय करून त्यानी प्रत्येक मतदारापर्यंत भाजपचे किमान तीन कार्यकर्ते मतदानापूर्वी पोहोचतील असे नियोजन केले. समाज माध्यमे विभाग, महिला मोर्चा, युवा मोर्चा, किसान मोर्चा, अनुसूचित जाती जमाती विभाग अशा विविध शाखांच्या माध्यमातून भाजपने प्रचार मतदार पर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांची एक साखळीच उभी केलेली आहे. 

कॉंग्रेसमधील रूसवे फुगवे भाजप प्रमाणेच होते. फरक एवढाच की भाजपने श्रीपाद नाईक यांना उमेदवारी दिल्यानंतर उमेदवारीसाठीचे अन्य दावेदार श्रीपाद यांच्यासाठी प्रचाराचे काम करू लागले. काँग्रेसमध्ये मात्र तसे झाल्याचे दिसून आले नाही.

मुख्यमंत्र्यांची धावपळ

दक्षिण गोव्यातील निवडणूक प्रचाराची आघाडी सांभाळतानाच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उत्तर गोव्याकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांनी सुरुवातीला पंचायत सदस्य सरपंच उपसरपंच नगरसेवक नगराध्यक्ष यांची संमेलने घेणे सुरू केले. त्यानंतर त्यांनी विविध समाज घटकांशी छोट्या छोट्या बैठकांचे आयोजन करत संवाद साधला. सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना पुन्हा एकदा केंद्रात भाजपचे सरकार का आवश्यक आहे, हे पटवून देण्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे दिसते. 

व्यक्तिगत संपर्कावर भर

ॲड रमाकांत खलप यांनी उमेदवारी जाहीर झाल्याच्या क्षणापासून व्यक्तिगत संपर्कावर भर दिला आहे. त्यांनी उत्तर गोव्यातील आपल्या हितचिंतक व स्नेही यांना उमेदवारी मिळाल्याच्या तासाभरात दूरध्वनीवर संपर्क साधला. यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळपासून म्हणजे कॉंग्रेसकडून अधिकृतपणे प्रचाराची सुरवात होण्याआधीच कासारवर्णे भागात खलप यांचा प्रचार सुरु झाला होता. खलप यांचे व्यक्तिगत संबंध इतर पक्षांंच्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी आहेत.

ते समाजकारणात सक्रीय असल्याने ते सुपरिचित आहेत. त्याचा वापर करत त्यांनी परस्पर प्रचार सुरू होईल, अशी व्यवस्था केली. पक्ष संघटना खिळखिळी असतानाही खलप यांच्या प्रचाराचे नियोजन या व्यक्तिगत यंत्रणेमुळे शक्य झाले. याच आधारे दोन आठवडे खलप प्रचार करत आहेत.

भाजपची भिस्त आमदारांवर

हळदोणे व सांतआंद्रे वगळता इतर सर्व १८ विधानसभा मतदारसंघात भाजप व मगोचे आमदार आहेत. यामुळे भाजपने स्थानिक प्रचाराची जबाबदारी आमदारांकडे सोपवली आहे. आमदारांचे कार्यकर्ते सध्या घरोघर फिरून सरकारने १० वर्षात काय केले याची पुस्तिका वाटणे सुरु केले आहे. म्हापसा येथील सभेला उत्तर गोव्याच्या प्रत्येक मतदारसंघातून मतदार येतील याची काळजी भाजपच्या या यंत्रणेने घेतली होती.

समाजाची मते निर्णायक

ॲड. रमाकांत खलप यांच्यामागे मराठा समाज उभा राहिल्याचे चित्र हळूहळू निर्माण झाले. त्यानंतर भंडारी समाजाला जाग आली. त्यांनी सुरवातीला श्रीपाद नाईक यांना पाठिंबा द्यावा की नाही याबाबत काही ठरवले नव्हते. आता भंडारी समाजाचे नेते श्रीपाद यांना मते द्या असे सांगत फिरू लागले आहेत. यामुळे तशी ही राजकीय चढाओढ दोन समाजामध्ये असल्याचे दिसते.

खासदार निधीच्या वापरावर भर

भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी प्रचाराचा भर केलेल्या कामांवर दिला आहे. विकासकामांची यादीच पुस्तिकेतून त्यांनी प्रकाशित केली. त्यामुळे २५ वर्षात भाऊंनी काय केले,हा मुद्दा आपसूक मागे पडला. आपण मंत्रिपदी असल्याने खासदारांसारखे संसदेत प्रश्न विचारू शकत नाही, हे त्यांनी मतदारांना पटवून देणे सुरू केले. त्यातून विरोधकांची टीका बोथट केली.

कॉंग्रेसकडून स्थानिक प्रश्नांची चर्चा

कॉंग्रेसचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी प्रचारात स्थानिक प्रश्नांची चर्चा करणे सुरू केले आहे. आपण कायदा मंत्री असताना काय काय काम केले हे ते सुरवातीला सांगत. त्यात जनतेला रस नाही, हे लक्षात येण्यास थोडा वेळ लागला. त्यानंतर राज्याला भेडसावणारे प्रश्न संसदेत कसे मांडणार, हे सांगणे सुरू केले. ते फर्डे वक्ते असल्याने ते कोणाशीही संवाद साधू शकतात. चहापानासाठी हॉटेलात गेले तर तिथेही ते आपल्याला मतदान करणे कसे योग्य हे पटवून देतात. आमदार कार्लुस फेरेरा त्यांना सावलीसारखी साथ देत आहेत.

खलप यांच्या चुका

काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांनी सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये पाठिंबासाठी भाजपच्या काही नेत्यांना फोनाफोनी केली. त्याची खिल्ली भाजपच्या नेत्यांनी आपल्या बैठकांत उडवणे सुरू केले. खलप यांना निवडून येण्यासाठी भाजपच्या नेत्यांची गरज भासणार, असे चित्र या निमित्ताने भाजपने आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत यशस्वीपणे पोचवले. भाजपच्या या प्रचाराचा फटका खलप यांना सुरुवातीच्या  टप्प्यातच बसला आहे.

बॅंकेचा विषय गाजला

म्हापसा अर्बन बॅंक केव्हाचीच बुडाली. खातेधारकांचे पैसे मिळू लागले, कर्ज थकवलेल्यांवर कारवाई सुरू झाली. अवसायकाने बॅंकेची मालमत्ता विक्रीस काढली तरी आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तो विषय ताजा झाला.

म्हापसा अर्बनची फाईल उघडली जाऊ शकते, असे सांगत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या विषयाचे गांभीर्य वाढवले होते. अखेर तो एक छोटा विषय आहे, असे मुख्यमंत्र्यांना सांगावे लागले आणि राष्ट्रीय मुद्यांच्‍या आधारे लोकसभेची निवडणूक लढवणे अपेक्षित आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com