South Goa : दक्षिण गोव्यात कोण; भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच

South Goa : रमाकांत खलप यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना एक्झिट पोलचे निकाल आपल्याला मान्य नसल्याचे सांगितले. ‘जोपर्यंत प्रत्यक्ष निकाल येणार नाही, तोपर्यंत मी असल्या कोणत्याही भाकितांवर विश्‍वास ठेवणार नाही’, असे ते म्हणाले.
Loksabha Election Exit Poll 2024
Loksabha Election Exit Poll 2024 Dainik Gomantak

South Goa :

पणजी, संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू सतत दोनवेळा सत्तेत राहूनही ओसरलेली नाही, हे लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये दिसून आले असून भाजपच्या याच घोडदौडीवर गोवाही शिक्कामोर्तब करणार आहे.

गोव्यातील उत्तर आणि दक्षिण गोव्यातील भाजप उमेदवार विजयी होणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलनी वर्तविला आहे.

‘‘या निवडणुकीत काँग्रेस पक्ष संपूर्णत: असंघटित होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत खरी लढत संघटित भाजप आणि असंघटित लोकांमध्येच झाली. त्यामुळे भाजपला गोव्यातील दोन्ही जागांवर विजय मिळू शकतो यावर विश्‍वास बसू शकतो.’’ अशी प्रतिक्रिया राजकीय निरीक्षक ॲड. क्लिओफात कुतिन्हो आल्मेदा यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केली.

Loksabha Election Exit Poll 2024
Goa Smoking Addiction: गोव्यात मुलांपेक्षा मुलींमध्ये धूम्रपानाचे प्रमाण अधिक, ग्रामीण भागात युवक गुटख्याच्या आहारी

‘इंडिया टुडे’ च्या एक्झिट पोलमध्ये जरी दक्षिण गोव्यातील जागा कॉंग्रेसला जाणार असल्याचे म्हटले असले, तरी या चर्चेत सहभागी झालेले ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी आपल्याला येथे भाजपला विजय मिळणार असल्याचे संकेत मिळत असल्याचा दावा केला.

ते म्हणाले की, भाजपने या निवडणुकीत धेंपे उद्योग समूहातील तरुण पल्लवी धेंपे यांना उमेदवारी देताना महिलेला प्रतिनिधित्व दिले आहे. दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसने लोकांचा कल पाहून विरियातो फर्नांडिस यांच्यासारख्या कार्यकर्त्याला निवडणुकीत उतरविले. या उमेदवारामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले होते. शिवाय येथे कॉंग्रेस व ‘आप’ या घटक पक्षांनी अत्यंत जवळून काम केले. संपूर्ण देशात येथे त्यांच्यात एकोपा दिसला.

गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी मात्र आपला ‘एक्झिट पोल’वर विश्‍वास नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, एक्झिट पोलवर विश्‍वास ठेवण्यापेक्षा दोन दिवस वाट पाहून प्रत्यक्ष निकाल पाहणे अधिक संयुक्तिक ठरेल.

‘इंडिया टुडे’ एक्झिट पोलचे जनक प्रदीप गुप्ता यांनी आपल्या सर्वेक्षणाप्रमाणे दक्षिण गोव्याची जागा कॉंग्रेस जिंकणार असल्याचे मत मांडले. आपले सर्वेक्षण हेच मांडत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यावर राजदीप सरदेसाई यांनी मतभेद व्यक्त करीत आपल्याला वेगळी माहिती मिळत असल्याचे मत मांडले. विजय सरदेसाई यांच्या मते, निवडणूक तज्ज्ञांना गोव्यातील खाचखळगे समजून येणे शक्य नाही.

मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात देशात ६४. ५ टक्के मतदान झाले असता, गोव्यात ७५.२ टक्के मतदान झाले होते. २०१९ पेक्षा ही टक्केवारी ०.६ ने अधिक होती. त्यामुळे दोन्ही जागांपेक्षा दक्षिणेत काय होईल, याबद्दल बरेच कुतुहल निर्माण झाले आहे. सर्वेक्षणामध्ये उत्तर गोव्यात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे कॉंग्रेसचे रमाकांत खलप यांच्यावर मात करणार असल्याबद्दल बहुतेक एक्झिट पोलचे एकमत आहे.

रमाकांत खलप यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना एक्झिट पोलचे निकाल आपल्याला मान्य नसल्याचे सांगितले. ‘जोपर्यंत प्रत्यक्ष निकाल येणार नाही, तोपर्यंत मी असल्या कोणत्याही भाकितांवर विश्‍वास ठेवणार नाही’, असे ते म्हणाले.

एबीपी-सीव्होटरचे सर्वेक्षण म्हणते की, भाजपने पर्यटन, पायाभूत विकास, व कल्याणकारी योजनांचा मुद्दा बनविला होता. भाजपच्या विजयात पंतप्रधानांचे नेतृत्व व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे कार्य महत्त्वपूर्ण ठरते.

न्यूज १८ पोल हब या सर्वेक्षणातही गोव्यात भाजप व कॉंग्रेसला एक एक जागा मिळणार आहे.

विविध संस्थांच्या सर्वेक्षणात गोव्याबाबत परस्परविरोधी भाकिते

१५२ टक्के मतांची टक्केवारी मिळवून उत्तर गोव्यात भाजप विजयी होणार आहे, असे भाकित एक्सिस- इंडिया टुडेच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आले आहे. कॉंग्रेस पक्ष ४३ टक्के मते मिळवून दक्षिण गोव्याची जागा प्राप्त करणार आहे, असे हा सर्वे म्हणतो. ‘एक्सिस- इंडिया टुडे’ने आपल्या एक्झिट पोलसाठी संपूर्ण देशात ५ लाख ८ हजार मतदारांच्या मुलाखती घेतल्याचा दावा केला आहे. इंडिया टुटेच्या पोलमध्ये म्हटले आहे की, एनडीएला ५२ टक्के (एक जागा) तर इंडी आघाडीला ४३ टक्के मतदारांचा हिस्सा प्राप्त होणार आहे.

२ एबीपी न्यूज-सीव्होटर एक्झिट पोलमध्ये गोव्यात एनडीए व इंडी आघाडीला प्रत्येकी एक जागा मिळणार आहे, असे भाकित वर्तविण्यात आले आहे. एनडीएला ४५.२ टक्के मतदार हिस्सा प्राप्त होऊन त्यांना दोनपैकी एक जागा गमवावी लागेल, असे हा सर्वे म्हणतो. या सर्वेक्षणात इंडिया आघाडीला एनडीएपेक्षा एक टक्का मतदार हिस्सा जादा प्राप्त होणार आहे.

३एबीपी न्यूज-सीव्होटर एक्झिट पोलचा सर्वे वेगळा आहे. त्यात एनडीएपेक्षा इंडियाला मतदारांचा अधिक हिस्सा प्राप्त होणार असल्याचे भाकित वर्तविण्यात आले आहे. इंडिया आघाडीला ४६.१ टक्के (एक जागा) प्राप्त होणार आहे, तर एनडीएला ४५.२ टक्के हिस्सा प्राप्त होणार आहे.

दिल्लीत बसून एक्झिट पोल तयार करणे आणि प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन कानोसा घेणे यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. गोव्यातील दोन्ही जागा काँग्रेसच जिंकणार आहे. ज्या ठिकाणी काँग्रेसचा एकही खासदार नव्हता, त्या ठिकाणीही काँग्रेस खाते उघडणार आहे. कर्नाटकमध्ये सर्वच जागा भाजपला दाखविणे म्हणजे एक्झिट पोलच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍न निर्माण होतो. - माणिकराव ठाकरे, गोवा प्रभारी, काँग्रेस.

एक्झिट पोलवर मी कधीच विश्‍वास ठेवत नाही. गोव्यातील दोन्ही जागा भाजप जिंकणार, असे एक्झिट पोलमध्ये दाखविले असेल तर ते फारच चुकीचे आहे. गोव्यातील दोनपैकी काँग्रेस व भाजप एक-एक जागा जिंकणार ,असे म्हटले असते, तर थोडा विश्‍वास वाटला असता. श्रीपाद नाईक हे निवडून आलेच तर भाजपचे उमेदवार म्हणून नव्हे, तर ते श्रीपाद नाईक म्हणून निवडून येतील. अशा अंदाजाविषयी तुम्हीच कल्पना करू शकता.

- ॲड. अमित पालेकर, निमंत्रक, आप, गोवा.

दक्षिणेची जागाही आम्हालाच : तानावडे

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दक्षिणेतील जागाही आपल्याच पक्षाला मिळणार असल्याचा दावा केला आहे. ‘दक्षिणेतील जागा काँग्रेसला मिळणार असल्याचे भाकित आपल्याला मुळीच मान्य नाही. एक्झिट पोल काहीही सांगो,आम्ही दोन्ही जागा जिंकणार असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com