Bicholim Constituency : डिचोलीत आजी-माजी आमदार एकवटले; भाजपचा प्रचार जोरात

Bicholim Constituency : Bicholim Constituency : सध्या डिचोलीत लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू असून, आतापर्यंत तरी भाजप त्‍यात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
Bicholim Constituency
Bicholim Constituency Dainik Gomanta

Bicholim Constituency :

डिचोली विधानसभा मतदारसंघात यावेळी भाजपसाठी जमेची बाजू म्हणजे विद्यमान अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि भाजपचे माजी आमदार तथा माजी सभापती राजेश पाटणेकर हे भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या विजयासाठी एकवटले आहेत.

दोघेही हातात हात घालून भाजप उमेदवाराचा प्रचार करताना दिसून येत आहे. त्यामुळे यावेळी डिचोलीतून भाजप उमेदवाराला मोठी आघाडी मिळणार, असा भाजपला विश्वास आहे. मात्र ‘सायलंट’ मतदारांची भूमिका महत्वाची आणि निर्णायक ठरणार आहे, असा राजकीय अंदाज आहे.

सध्या डिचोलीत लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू असून, आतापर्यंत तरी भाजप त्‍यात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच लोकसभा निवडणुकांपासून भाजपच्या विजयात मोलाचे योगदान दिलेल्या डिचोली मतदारसंघात यावेळीही भाजपसाठी अनुकूल वातावरण आहे. जाहीर प्रचाराबाबतीत अजूनतरी काँग्रेस मागे असल्याचे दिसून येत असले तरी असंतुष्ट मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न जारी असल्याचे समजते.

२०२२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत डिचोली मतदारसंघातून भाजपची पीछेहाट होताना, अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांची सरशी झाली. मात्र निवडून येताच शेट्ये यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला.

निवडणुकीत जरी भाजप उमेदवाराचा पराभव झाला, तरी दुसऱ्या बाजूने अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यामुळे भाजपची पत टिकून राहिली. या निवडणुकीत डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना ९ हजार ६०८ मते मिळाली होती.

Bicholim Constituency
Goa Police: 238 वॉरंट, 41 शस्त्रे जमा; गोवा पोलिसांची लोकसभेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई

भाजपचे राजेश पाटणेकर यांची तिसऱ्या स्थानावर पीछेहाट होताना त्यांना केवळ ५ हजार १४१ मतांवर समाधान मानावे लागले. या दोघांची मते एकत्रित केल्यास तो आकडा १४ हजार ७४९ एवढा होत आहे.

डिचोली मतदारसंघात यावेळी महिला मतदार १४ हजार ५३४ आणि पुरुष मतदार १४ हजार ७५ मिळून एकूण २८ हजार ६०९ मतदार आहेत. म्हणजेच गेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाची सरासरी पाहता जवळपास ५० टक्के मते ही भाजपच्या बाजूने असल्याचे स्पष्ट होत आहे.

मगो कार्यकर्त्यांच्‍या भूमिकेकडे लक्ष

खाण अवलंबितांसह डिचोली मतदारसंघात यावेळी बरेच मतदार ‘सायलंट’ आहेत. हे मतदार उघडपणे आपली भूमिका स्पष्ट करीत नाहीत. त्यातच मगोचा सामूहिकरित्या राजीनामा दिलेले कार्यकर्तेही सध्या शांत आहेत. हे कार्यकर्ते कोणाच्या बाजूने राहतात, त्यावरच भाजपची आघाडी स्पष्ट होणार आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात येईल, असे माजी आमदार नरेश सावळ यांनी स्पष्ट केले आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत मगोतर्फे ९ हजार २९० मते मिळवून ते दुसऱ्या स्‍थानी राहिले होते. त्यामुळे पूर्वाश्रमीच्या मगो समर्थकांसह ‘सायलंट’ मतदार निर्णायक भूमिका बजावू शकतात. या मतदारांनी भाजपला पाठींबा दिला, तर भाजपची आघाडी निश्चितच वाढणार आहे. पण जर या मतदारांनी अन्य पर्याय निवडला तर भाजपच्या आघाडीवर त्याचा मोठा परिणाम होणार हे स्पष्ट आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com