Goa Drama : मानसिक गुंतागुंतीचा ‘नजराणा’; ‘द बर्थ ऑफ डेथ’; स्पर्धेची चुरस शिगेला

Goa Drama : दिग्दर्शन, अभिनयाच्या उत्कटतेचा अनोखा आविष्कार
Goa Drama
Goa DramaDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

Goa Drama :

अश्वमेध मीडिया प्रोडक्शन पंचवाडी या संस्थेने काल सादर केलेल्या ‘दोन फुल आनी शीतकडी’ या नाटकाने बेचव झालेली नाट्य स्पर्धा आजच्या ‘द बर्थ ऑफ डेथ’ या नाटकामुळे पुन्हा चवदार होऊ शकली. मुख्य म्हणजे या नाटकाने स्पर्धेची मूल्ये अबाधित राखण्याचे महत्त्वाचे कार्य केले.

दिग्दर्शन, अभिनयाची उत्कटता साधून कशी उत्तुंग कलाकृती सादर करता येते, याचे प्रात्यक्षिकही ‘एकदंत कला संघ, पंचवाडी’ या संस्थेने या नाटकाद्वारे दाखवून दिले.

एकीकडे वसंत सावंत सारखे बुजुर्ग लेखक सामान्य वकुबाच्या संहिता सादर करून नाट्य रसिकांचा हिरमोड करत असताना दुसऱ्या बाजूला दीपराज सातोर्डेकर सारखा नव्या दमाचा लेखक एक नवे ‘व्हिजन’ घेऊन वैशिष्ट्यपूर्ण संहिता सादर करतो यामुळे काल व आज मधला फरक अधोरेखित व्हायला लागला आहे.

प्रसिद्ध लेखक पुंडलिक नाईक यांच्या या स्पर्धेत सादर झालेल्या धनयां देवंचारा व दिश्‍ट दौलत या संहिताही अशाच कालबाह्य झाल्यासारख्या वाटत होत्या. म्हणूनच कोकणी नाट्य क्षेत्राला आज गरज आहे ती नवीन नवीन प्रयोग करू पाहणाऱ्या संहिताची. आणि याचे उत्कट उदाहरण म्हणून या ‘बर्थ ऑफ डेथ’ नाटकाकडे बोट दाखवावे लागेल.

Goa Drama
Pernem Goa: मोबाईल घरीच ठेवला, कार घेऊन गेला अन् परतलाच नाही; दोन दिवसांनी नदीत सापडला मृतदेह

या नाटकाची सुरुवातच मुळी एका वेगळ्या दृष्टिकोनातून होते नाटककार सृजन ‘द बर्थ ऑफ डेथ’ नाटकाचे शीर्षक असलेले पुठ्ठे सोफ्यावर ठेवतो आणि मागून नाटकाची नामावली सांगितली जाते. एक बेडरूम, एक लिहिण्याची जागा, मधला ड्रॉइंग रूम, बाहेर जाणारा दरवाजा,

किचन याचा आभास करणारे नेपथ्य आणि या सर्वांवर कहर म्हणजे वर काळे कपडे घालून बसलेला एक माणूस अशी सनसनाटी सुरुवात बघितल्यावर प्रेक्षकांना आता वैचारिक मेजवानी मिळणार,ही चाहूल लागते. प्रसंगागणिक मानसिक गुंतागुंत वाढलेली बघायला मिळते. ही गुंतागुंत हाच या नाटकाचा गाभा आहे. आणि ही गुंतागुंत दिग्दर्शकांनी खुलवली आहे.

लेखकच दिग्दर्शक असल्यामुळे त्याला मुक्त संचार करण्याची संधी मिळाली आहे. त्याने वेगवेगळ्या प्रयोगांचा आधार घेतला आहे. सृजन हा एक नाटककार. सृष्टीचा विधाता व नाटककार जग बदलू शकतो, या मताचा. समीक्षा ही त्याची बायको. ती नवऱ्याच्या नाटके लिहिण्याबाबत विशेष खूष नाही .‘संसार करून नाटक लिहिता येते, पण संसाराचे नाटक झाल्यास जगणे कठीण जाते, या आशयाचे तिचे वाक्य तिची मनस्थिती रेखाटून जाते.

नाटकातून विशेष उत्पन्न मिळत नसल्यामुळे सृजनही मानसिक गुंतागुंतीचा बळी ठरू लागला आहे. बायकोच्या जीवावर जगतो आहोत, या भावनेतून त्याचा मानसिक स्तर घसरला आहे. त्यातूनच मग रसिक प्रेक्षक, वाचिका वाचासुंदर, इन्स्पेक्टर हवालदार सारखी पात्रे रंगमंचावर येतात. बायकोकडून मनासारखे लैंगिक सुख मिळत नसल्यामुळे सृजन मनातल्या मनात तिलाच सॅम करून तिच्याशी मुक्त प्रणय उधळतो.

खरे तर हे सगळे मनाचे खेळ असतात. आणि हे खेळ लेखक दिग्दर्शकाने मोठ्या तन्मयतेने चित्रित केले आहेत. या नाटकात खरी दोनच पात्रे. सृजन व त्याची बायको समीक्षा. इतर पात्रे ही सृजनाच्या मनाच्या स्पंदनातून तयार झालेली असतात. आणि या पात्रातूनच दिग्दर्शकांनी प्रतिभेचा एक जबरदस्त नमुना पेश केला आहे.

रसिक प्रेक्षक व वाचिका वाचा सुंदर नाटककार सृजनला आरोपीच्या पिंजऱ्यात टाकतात व त्याची चौकशी करण्याकरता इन्स्पेक्टर, हवालदार येतात, हे प्रसंग सृजनचं मानसिक अस्थैर्य दाखवून जातात. इथे संघर्ष आहे तो सृजनाचा सृजनाशीच. आणि त्याला कंगोरा आहे तो त्याच्या बायकोच्या मानसिकतेचा.

यात जे वर लिहीत बसलेले पात्र दाखवले आहे ते सृजन च्या विचारांचा पडसाद दाखवणारे आहे. समीक्षा जे काही सृजन ला सांगते तेच वाक्य हे पात्र बोलते. त्यामुळे नाटकाला एक वेगळाच आयाम प्राप्त होऊ शकला. कलाकारांनी दिग्दर्शकाला योग्य साथ दिल्यामुळे उत्कटतेचा त्रिवेणी संगम बघायला मिळाला.

हर्षला पाटील यांनी समीक्षेच्या भूमिकेला न्याय दिला. विविध कंगोरे असल्यामुळे ती निभावणे म्हणजे एक आव्हानच होते. कधी नवऱ्याला वैतागलेली, कधी प्रणयिनी बनलेली, कधी दुभंगलेली, अशी समीक्षाची विविध रुपे हर्षलांनी समर्थपणे साकारली. तिची ‘बॉडी लँग्वेज’ विलोभनीय अशीच होती. खचलेला सृजन कुणाल बोरकर यांनी तेवढ्याच ताकदीने उभा केला . नाटकात जवळजवळ संपूर्ण वेळ रंगभूमीवर असल्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी मोठी होती.

जर कुठेही या भूमिकेचा तोल गेला असता तर संपूर्ण नाटक कोलमडले असते. पण बोरकर यांनी या भूमिकेचे बेअरिंग परिपूर्ण सांभाळून नाटकालाआकार दिला. इतर भूमिकांत लक्षात राहिले ते इन्स्पेक्टर हवालदार बनलेले सिद्धेश मराठे. मिस्टर नाटककार असे म्हणत सृजनला हाक मारणारी त्यांची स्टाईल प्रेक्षकांना अपील करून गेली.

रसिक प्रेक्षक झालेले नाटकाचे लेखक दिग्दर्शक दीपराज सातोर्डेकर यांनी ही आपली छोटीशी भूमिका बऱ्यापैकी रंगवली. त्यामानाने थोड्या कमी पडल्या त्या वाचिका वाचा सुंदर झालेल्या साईशा शिरोडकर.

त्या राजधानी एक्सप्रेसच्या स्पीडने बोलत असल्यामुळे थोडा रसभंग होत होता. अतिशय बोलके नेपथ्य खरोखर भाव खाऊन गेले. दीपक सातोर्डेकर यांचे पार्श्वसंगीतही परिणामकारक होते. साहिल बांदोडकर यांची प्रकाशयोजना ही प्रयोगाला पूरक होती. मात्र नाटकाची लांबी खटकली. पण नाटकाच्या ताळेबंदावर त्याचा विशेष परिणाम जाणवला नाही.

कलामंदिर फुल्ल

आतापर्यंतच्या नाटकांना गर्दीची उणीव भासत असताना या नाटकाला मात्र कलामंदिर जवळजवळ फुल्ल असल्याचे दिसले. आणि प्रेक्षकही तन्यमतेने या नाटकाचा आस्वाद घेताना दिसत होते. हे नाटक समजायला जरी थोडे अवघड असले तरी प्रत्येक प्रसंगाची संगत दुसऱ्या प्रसंगाला लावण्याचा प्रयत्न प्रेक्षक करताना दिसत होते.

यातले काही प्रणय प्रसंग गोमंतकीय रंगभूमीवरच्‍या प्रचलित नाटकांच्या चौकटीबाहेरचे असल्यामुळे काही प्रसंग प्रेक्षकांच्या भुवया उंचावणारे ठरले. पण तरी आपण काहीतरी नवीन अनूभुती घेत आहोत याची जाणीव प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर दिसत होती. या ‘ऑफ बिट’ प्रयोगाचा आनंद मात्र कला मंदिरातून बाहेर पडणाऱ्या बहुतेक प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

निकालाबाबत चर्चा

आता स्पर्धेत फक्त दोनच नाटके शिल्लक राहिली असल्यामुळे कलाकारांबरोबर प्रेक्षकांनाही निकालाची उत्सुकता लागलेली दिसत आहे. काहींनी तर आपल्यापरीने निकाल लावून टाकल्याचे बघायला मिळत होते.

त्यापैकी काही लोकांनी पहिले तीन व उत्तेजनार्थ दोन असे क्रमांक देऊन टाकले आहेत. दै. गोमन्तकचे परीक्षण वाचूनही काहींनी आपले मत बनविल्याचे काही लोक सांगत होते. तरीपण अजून दोन नाटके शिल्लक असल्यामुळे त्यापैकी एखादे नाटक वेगळ्याप्रकारचे असले तर हा क्रम बदलूही शकतो. पण आता या स्पर्धेची चुरस शिगेला पोहचल्याचे प्रत्ययाला येत आहे एवढे खरे

हौशी व स्पर्धात्मक रंगभूमीची सीमारेषा

‘दोन फुल आनी शीतकडी’ या नाटकामागोमाग हे ‘बर्थ ऑफ डेथ’ नाटक झाल्यामुळे या दोन नाटकातील विसंगती लोकांना जाणवल्याचे दिसत होते. त्यामुळे हौशी व स्पर्धात्मक रंगभूमीची सीमारेषा काय यावर मध्यांतरात काही ज्येष्ठरंगकर्मींची चर्चा सुरू होती.

त्याचबरोबर कन्यादान, कर्मभोग सारखी या स्पर्धेत सादर केलेल्या नाटकांनी लोकांची करमणूक करण्याबरोबर स्पर्धात्मक मूल्येही जोपासली. यात शंकाच नाही. पण अगदीच चीप संहिता स्पर्धात्मक रंगभूमीवर येऊ नये, अशी अपेक्षा या रंगकर्मींकडून व्यक्त होत होती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com