Konkani Drama Competition : ‘तो आनी दोन पिशे’ अनोखा आविष्कार; प्रगल्भ संहितेचे प्रभावी सादरीकरण

Konkani Drama Competition : जीवनातला संघर्ष अधोरेखित; या स्पर्धेतील हे सातवे पुष्प.''दो पागल और वो'' या हिंदी नाटकाचे अविनाश नायक यांनी कोकणीत रूपांतर केले असून त्याला गोमंतकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे.
Konkani Drama Competition
Konkani Drama CompetitionDainik Gomantak
Published on
Updated on

Konkani Drama Competition :

एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पडदा उघडलेल्या कला अकादमीच्या कोकणी नाट्य स्पर्धेला सियावर राम, पिळगाव या संस्थेने सादर केलेल्या 'तो आनी दोन पिशें' या नाटकाने चांगलीच गती मिळाली.

या स्पर्धेतील हे सातवे पुष्प.''दो पागल और वो'' या हिंदी नाटकाचे अविनाश नायक यांनी कोकणीत रूपांतर केले असून त्याला गोमंतकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे.

मूळ हिंदी संहिता वाचनात आली नसली तरी 'तो आनी दोन पिशे' पाहताना संहितेतील प्रगल्भता ठायी ठायी प्रतीत होते. मुळात या नाटकाला सलग अशी कथा नाही. यामुळे केवळ तीन पात्रे असलेले हे नाटक सादर करणे म्हणजे एक आव्हानच.

या तीन पात्रांपैकी रंगभूमीवर वावरताना दिसतात ती फक्त दोनच पात्रे. तिसरे पात्र ''तो'' याच्या तोंडी एकही संवाद नाही. असे असून सुद्धा सादरीकरण करताना 'बॅकग्राऊंड'वर असलेल्या या पात्राचे अस्तित्व जाणवल्याशिवाय राहत नाही. आता दोन-सव्वा दोन तास रंगमंचावर फक्त दोनच पात्रे वावरत असल्यामुळे अभिनय हा परवलीचा शब्द ठरतो.

या बाबतीत धिरू झालेले अविनाश नायक व पीरू झालेले संघर्ष वळवईकर यांनी बाजी मारली आहे यात शंकाच नाही. खरे तर एका दृष्टीने हे दोघे वेडेच. धिरू व पिरू ही यांची नावे नाहीच. ही नावे त्यांना व्हायोलिन वाजवताना सापडतात. हे नाटक कलात्मक असल्यामुळे या दोन पात्रांच्या व्यक्तीरेखांतून जीवनातला संघर्ष अधोरेखित करण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे.

नाटकाची सुरवात होते ती स्मशानातून. आणखी एक प्रेत सरणावर चढले या धिरूच्या वाक्याने. यातून नाटकात पुढे येणाऱ्या नाट्याची कल्पना यायला लागते. नंतर पिरूचे आगमन झाल्यावर नाटकातला संघर्ष फुलायला लागतो.

या नाट्यातून जीवनातले विविध संघर्ष आकारण्यात आले आहेत. ''तो'' म्हणजे मृत्यू. ''तो''ची मी वाट बघतो आहे असे म्हणत मृत्यू हे जीवनातले चिरंतन सत्य असल्याचे दाखवून दिले आहे. राजा बनण्याकरता होणारा संघर्ष दाखवून सध्याच्या राजकारणावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. यातील काही प्रसंग तर अंगावर काटे उभे केल्याशिवाय राहत नाही.

खास करून धिरू व पिरू यांच्यामध्ये झालेली लढाई, मध्यंतराच्या वेळी दाखवलेला मरणाचा प्रसंग, खुर्ची करता झालेला संघर्ष तसेच पिरूने प्रेक्षकांना उद्देशून केलेले भाषण व त्याच वेळी धिरूने त्याला मारलेली गोळी हे प्रसंग नाटकात थरार निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत.

या नाटकातील काही वाक्येही मनाची पकड घेऊन जातात.‘‘माती मातीतच मिळते, या खेळात मारूनच जिंकावे लागते, आणि शेवटी माणसे एकटीच राहतात, एकटा जातो दुसरा येतो, मरायचे आहे तर जगायचे कशाला’’सारखी या नाटकातील वाक्ये प्रेक्षकांना अंतर्मुख व्हायला भाग पाडतात. हे नाटक प्रतिकात्मक असल्यामुळे यातली प्रत्येक बाब ही कोणत्या ना कोणत्या वस्तूच्या स्वरूपात घेण्यात आली आहे.

माणूस मेल्यावर त्याच्या नावाने दगड विहिरीत फेकणे, वरून चेंडू येणे, नाटकाच्या शेवटी 'तो'ने येऊन सामान नेणे याद्वारे जीवनातील शाश्वत चित्रित करण्यात आले आहे. या प्रभावी संहितेला सजग दिग्दर्शनाची आवश्यकता होती. यात दिग्दर्शक आश्वेश गिमोणकर पूर्णपणे सफल ठरले यात शंकाच नाही. केवळ दोन पात्रे असल्यामुळे पात्रांच्या हालचालींना बरेच महत्त्व प्राप्त झाले होते. गिमोणकरांनी पात्रांना योग्य आणि प्रसंगानुरूप अशा हालचाली देऊन नाटकाला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली.

खास करून 007 इंडियाची कॉमेंट्री सांगत असताना संपूर्ण रंगमंचावर अंधार करून केवळ प्रकाश योजनेच्या सहाय्याने जो परिणाम साधला आहे, तो वाखाणण्यासारखाच. त्यांना योग्य साथ मिळाली ती प्रमुख कलाकारांची तसेच छायाचित्रण व पाश्वसंगीताची . स्वतः दिग्दर्शकच छायाचित्रकार असल्यामुळे प्रसंग जास्त उठावदार होऊ शकले.

Konkani Drama Competition
Goa Tourist : ‘रेन्ट अ बाईक’ पुन्हा चर्चेत पर्यटकांकडून नियम धाब्यावर

तीच गोष्ट पार्श्वसंगीताची. ओंकार नागेशकर यांच्या अनुरूप अशा पार्श्व संगीतामुळे प्रसंग परिणामकारक झाले. खास करून विंगेत बघून पिरू प्रजेकडे बोलतो तो प्रसंग थरारक... पार्श्वसंगीतामुळे अधिक बोलका झाला. स्मशानाचे नेपथ्यही नाटकाच्या जातकुळीला पूरक असेच होते.

पात्रांच्या वेशभूषा ही लक्षात राहण्यासारखे होत्या. नाटकात केवळ दोनच पात्रे असल्यामुळे नाटकावर बऱ्याच मर्यादा होत्या. पण नाटकाचे लेखक अविनाश नायक व संघर्ष वळवईकर यांनी मुद्राभिनय, देहबोली व संवाद फेक याचा मेळ साधीत धिरू व पिरूच्या भूमिका प्रभावीपणे साकार केल्यामुळे या मर्यादा जाणवल्या नाही. खास करून पिरू झालेले वळवईकर यांनी आवाजात चढ उतार करीत वेड्यासारखा वाटणाऱ्या पिरुची भूमिका तन्मयतेने वठविली. यात कमी भासली ती स्त्री पात्राची.

नाटकात स्त्री पात्राचा तसा उल्लेख आहे, पण संहितेत त्याचा समावेश झालेला नाही. स्पर्धेच्या दृष्टीनेही स्त्री पात्राचे वेगळे स्थान असते. नाटकाच्या यशापयाशाची गोळा बेरीज करण्यात या पात्राची नक्कीच मदत होत असते.

अर्थात ही त्रुटी संहितेची असल्यामुळे त्याला संचाला जबाबदार धरता येत नाही हेही तेवढेच खरे. एकंदरीत एका ऑफ बीट संहितेचा अनोखा आविष्कार सादर करून सियावर राम या संस्थेने स्पर्धेची रंगत वाढवली एवढे निश्चित.

कला मंदिर खालीच

कला अकादमीच्या कोकणी नाट्य स्पर्धेचे व गर्दीचे सूत काही जमत नाही. गर्दी अजूनही कला मंदिरापासून दूरच आहे. आज तर कलामंदिर निम्म्याहून अधिक खाली होते. त्यात परत हे नाटक बऱ्याच लोकांच्या डोक्यावरून गेल्यामुळे काहींनी मध्यंतरातच नाट्यगृहातून काढता पाय घेतला. मात्र नाटक जरी सामान्य रसिकांच्या पचनी पडणारे नसले तरी या नाटकाला स्पर्धात्मक मूल्ये आहेत यात शंकाच नाही. स्पर्धेच्या निकषावर हे नाटक नक्कीच तग धरू शकते.

विजय तेंडुलकर यांच्या नाटकाच्या आठवणी जागृत

पूर्वी मराठी नाट्यसृष्टीत नाट्य लेखक विजय तेंडुलकर हे रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग करत असे. त्यांची घाशीराम कोतवाल, बेबी, आक्रोश सारखी नाटके त्या काळात 'न्यू वेव्ह' नाटके म्हणून गणली जात असे. या नाटकांनी त्या काळात तेंडुलकरांना एक वेगळेच स्थान प्राप्त करून दिले होते. ''तो आणि दोन पिशे'' हे नाटक पाहताना तेंडुलकरांच्या त्या ''प्रयोगांची '' आठवण येत होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com