Konkani Drama Competition : ‘मिशन आपालिपा’ एक दिशाहीन प्रवास; भरकटलेला प्रयोग

Konkani Drama Competition : स्पर्धेची रंगत घसरली, कला मंदिरात शुकशुकाट
Konkani Drama Competition 2024
Konkani Drama Competition 2024Dainik Gomantak

मिलिंद म्हाडगुत

Konkani Drama Competition :

काही नाट्यप्रयोगांवर लिहावे तेवढे थोडे असते, तर काही नाट्यप्रयोगांवर काय लिहावे हेच कळत नसते. श्री शांतादुर्गा कला केंद्र धारगळ-पेडणे या संस्थेने सादर केलेले ‘मिशन आपालिपा’ हे नाटक या दुसऱ्या प्रकारात मोडते.

दोन घटका करमणूक म्हणून वा जत्रा-काल्यातला प्रयोग म्हणून हे नाटक ठीक असू शकते. पण स्पर्धेच्या निकषात हे नाटक कोणत्याही अँगलने बसू शकत नाही. स्पर्धेच्या नाटकांना येताना प्रेक्षक एक वेगळा चष्मा लावून आलेले असतात. त्यातून अशा नाटकांकडे पाहिल्यास ‘हेचि फळ काय मम तपाला’ असे म्हणण्याची पाळी त्यांच्यावर येते. त्यामुळे ‘सैमाचो खेळ’ पाठोपाठ याही नाटकाने रसिकांचा हिरमोड केला.

Konkani Drama Competition 2024
Goa Daily News Wrap: गोव्यात दिवसभरात घडलेल्या ठळक आणि महत्वाच्या घडामोडींचा आढावा, एका क्लिकवर

गौरव कुबल यांची ही संहिता नेमके काय सांगू पाहते, हे शेवटपर्यंत कळू शकले नाही. बंटी व सनी हे दोन भाऊ आपांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत असतात. बऱ्याच महिन्यांचे भाडे तुंबले असल्यामुळे आपा त्यांच्याकडे भाडे देण्याचा तगादा लावतात. आणि भाडे न दिल्यास घराबाहेर काढण्याची धमकी देतात.

यातून सुटका व्हावी म्हणून बंटी व सनी त्यांची एक मैत्रीण पिंकी हिला भूतणी बनवतात. या भूतणीला घाबरून आपा त्यांना घराचे भाडे माफ करतातच त्याचबरोबर त्यांना फुकट जेवण देण्याचेही आश्वासन देतात. नंतर तिच्या प्रेमात पडलेला बंटी तिला आपाच्याच घरात राहायला जागा देतो.

तर सनी प्रिया नामक एका युवतीला दहा दिवसा करता आपाच्या घरात राहायला आणतो. नंतर कळते की, प्रिया ही क्राईम रिपोर्टर असून मुत्तू नावाच्या एका खुन्याला पकडण्याकरता मुंबईहून गोव्याला आली आहे. याच मुत्तूने ती व तिची बहीण लहान असताना त्यांना पळवून आणले होते.

नंतर पिंकी हीच प्रियाची हरवलेली बहीण असल्याचे स्पष्ट होते. शेवटी आपांच्या मदतीने मुत्तूला पकडण्यात सनी बंटी प्रिया व पिंकी कशी यशस्वी होतात, हा या नाटकाचा उत्तरार्ध. मुत्तूला बांधून घातल्यावर यांचे मिशन आपालीपा संपते व प्रेक्षागृहात मुठभर असलेले रसिक एकदाचा सुटकेचा श्वास सोडतात.

नाटकाचा हा दिशाहीन प्रवास प्रेक्षकांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहताना दिसत होता. सुरुवातीपासूनच हे नाटक भरकटल्यासारखे वाटत होते. सुरुवातीला या नाटकात पार्श्वभूमीवर गोलमाल चित्रपटातील ‘गोलमाल है’ हे गाणे पेरले आहे.

पण गोलमाल या चित्रपटात अमोल पालेकरने नोकरी करता ''तो ‘गोलमाल’ केला होता. पण इथे साध्या भाड्याकरता बनवाबनवी करताना दाखवली असून उत्तरार्धात तर या बनवाबनवीचे स्वरूपच बदलले आहे. अशी दिशाहीन संहिता असल्यावर कलाकार करणार तरी काय? त्यात परत लेखकच दिग्दर्शक असल्यामुळे कलाकारांची अधिकच गोची झाल्यासारखी वाटत होती.

त्यामुळे सर्व कलाकारांनी पाट्या टाकण्याचे आपले काम इमाने इतबारे निभावले. फास्ट बोलणे, इकडून तिकडे धावणे सारख्या अतिरंजीत प्रकारामुळे नाटकाची उरली-सुरली लयच बिघडून गेली.त्यात परत भूतणी झालेल्या पिंकीची फिल्मी गाण्यावर केलेली अंगावर येणारी नृत्ये तर करमणुकीपेक्षा बीभत्सच अधिक वाटत होती.

त्यातल्या त्यात आपा झालेले गौतम गावस यांनी विनोदाचे टायमिंग साधून प्रयोगात थोडीफार जान आणण्याचा प्रयत्न केला. बाकी सगळा आनंदी आनंदच होता. बॉक्स टाईप नेपथ्य बघून सुरुवातीलाच आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पना प्रेक्षकांना आली होती.

आणि घडलेही तसेच. काहीतरी हाताला लागेल, अशी अपेक्षा बाळगून शेवटापर्यंत बसणाऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. यामुळे ‘रंग खेव’ने उंचावलेला स्पर्धेचा आलेख ‘मिशन आपा लिपा’ने एकदम खाली नेऊन स्पर्धेतील रंगतही कमी करून टाकली.

‘ गर्दीचा नीचांक

प्रस्तुत नाट्यप्रयोगाला राजीव गांधी कला मंदिर अक्षरशः सुनेसुने वाटत होते. त्यात परत नाटकाचा दर्जा पाहून मध्यंतरानंतर काही लोकांनी काढता पाय घेतल्यामुळे कला मंदिर एकदमच रिकामे पडले. या नीचांकामुळे पुन्हा एकदा कमी गर्दीची व्यथा अधोरेखित झाली.

स्पर्धेचा बाज राखणे आवश्यक

या स्पर्धेतील आतापर्यंतची नाटके पाहिल्यास काही उच्च दर्जाच्या नाटकांबरोबरच स्पर्धेच्या शब्दकोषत न बसणारी नाटकेही पाहायला मिळाली. स्पर्धेत उतरण्यापूर्वी जी संहिता आपण प्रयोगा करता घेतो ती स्पर्धेला पूरक आहे की काय याचा संस्थांनी अभ्यास करायला हवा, तसेच योग्य सादरीकरणावरही भर द्यायला हवा.

बक्षीस कोणाला मिळतात यापेक्षा स्पर्धेचा बाज राखणे महत्त्वाचे असते. नाहीतर संपूर्ण प्रक्रिया स्पर्धेची थट्टा उडवणारी ठरू शकते. आणि असे अनुभव सध्या या स्पर्धेत घ्यायला मिळत आहे. यामुळे स्पर्धेची मजा तर किरकिरी होतेच पण मुद्दाम स्पर्धे करता आलेल्या रसिकांवरही तो अन्याय ठरतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com