Goa Drama : अंधश्रद्धेचा डंका वाजवणारे ‘धनयां देवंचारा’

Goa Drama : प्रयोग ठिकठाक पण प्रभाव पाडण्यात अपयश ः रसिकांच्या वाढलेल्या अपेक्षांचा फुगा फुटला
Konkani Drama Competition
Konkani Drama CompetitionDainik Gomantak

मिलिंद म्हाडगुत

Goa Drama :

हयवदन व द ट्रॅप या दोन नाटकांचे जबरदस्त प्रयोग झाल्यामुळे रसिकांच्या वाढलेल्या अपेक्षांचा फुगा ‘धनयां देवंचारा’ या पुंडलिक नाईक यांच्या नाटकाने थोडाफार खाली आणला.

कलाआविष्कार मासोडे - वाळपई या संस्थेने या नाटकाद्वारे स्पर्धेतील बारावे पुष्प गुंफले. पुंडलिक नाईक हे गोव्यातील एक अग्रगण्य नाट्य लेखक. पण तरीही '' धनयां देवंचारा '' हे नाटक त्यांच्या लौकिकाला शोभेलसे नाही.

नाईक म्हटले म्हणजे आठवतात ती ‘पिंपळ पेटला’, ‘शबै शबै बहुजन समाज’, ‘मरणोकट्टो’ सारखी बेमिसाल नाटके. पण त्यांचे प्रस्तुत नाटक ‘धनयां देवंचारा’ हे या साऱ्यांत बसत नाही. कथाच मुळी लुटुपुटूची वाटते.

Konkani Drama Competition
Goa Forward Party: राज्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ; गोवा फॉरवर्ड म्हणतेय CCTV बसवा, सुरक्षा आणि पर्यटन...

या कथेला एक अशी लय नाही. ही कथा कृष्णा कुट्टीकर व त्याच्या कुऱ्हाडी भोवती फिरते. त्या मागचा इतिहास तो आपल्या तीन मित्रांना सांगतो. त्याच्या आजोबाची कुऱ्हाड तळ्यात पडल्यावर देवंचार त्याला पहिल्यांदा सोन्याची व नंतर चांदीची कुऱ्हाड आणून देतात. पण या दोन्ही कुऱ्हाडी आपल्या नाहीत, असे सांगितल्यावर देवंचार त्याला त्याची स्वतःची कुऱ्हाड आणून देतातच. पण त्याच्या प्रामाणिकपणावर खुश होऊन सोन्या -चांदीच्या कुऱ्हाडीही त्याला बक्षीस म्हणून देतात बायको लोहिताशी पटत नसलेला कृष्णा हाच आपल्या आजोबाचा फॉर्मुला वापरायचं ठरवतो.

त्याप्रमाणे बायकोला तिच्या माहेरी घेऊन जाताना त्या तळ्याकडे जातो, व ठरल्याप्रमाणे तिला तळ्यात ढकलतो. नंतर त्याच्यावर प्रसन्न झालेल्या देवचाराला तोच पूर्वीचा आजोबाच्या वेळचा पॅटर्न वापरायला सांगतो. त्याप्रमाणे देवचार त्याला तळ्यातून चांदणी नावाची एक बाई आणतो.

तिला बघून खुश झालेला कृष्णा तिलाच बायको म्हणून घरी घेऊन जातो. नंतर तिला कंटाळल्यावर परत देवचाराकडे येऊन ती आपली बायको नसल्याचे सांगतो आणि तिलाही तळ्यात बुडवतो. देवचार त्याला दुसरी बायको देतो. ही बाई कृष्णाकडे आल्यावर कृष्णाच्या मित्राबरोबरच नाचायला लागते. त्या

मुळे तिलाही कालांतराने कृष्णा कंटाळतो व देवचाराने तिसऱ्या वेळी तळ्यातून आणलेल्या लोहितेला हीच आपली बायको म्हणत घरी घेऊन जातो. जाता जाता कृष्णा व त्याची बायको तळ्याकडची त्यांची जागा पर्यटनस्थळ करण्याचा तसेच देवचारा करता मंदिर बांधण्याचा संकल्प सोडतात. यात भूतयोनी प्राप्त झालेले मुंजा, खेत्री व निमो ही तीन पात्रे दाखवली आहे. त्यातला निमो हा लोहिताचा भाऊ दाखवून नाट्याला भावनिक टच देण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. पण संहिताच तकलादू असल्यामुळे ती कुठेही मनाला भिडत नाही. त्यामुळे सगळे प्रसंगच उपरे वाटतात.

विनय गावस यांचे दिग्दर्शन नीटनेटके असले तरी हे दिग्दर्शन संहितेची मर्यादा झाकू शकले नाही हेही तेवढेच खरे. तरीही भूत योनी प्राप्त झालेल्या तीन पात्रांना योग्य मुव्हमेंट देऊन तसेच त्यांच्या एन्ट्रीच्या वेळी पूरक असा आवाज देऊन त्यांनी दिग्दर्शनाची चुणूक दाखवून दिली. देवंचाराचे प्रसंगही लक्षणीय होते.

भूमिकात तशी खास अशी कोणाची नोंद करता येत नसली तरी कोणत्याही पात्राने रसभंग केला, असे झाले नाही. भूतयोनीतील निमो खेत्री व मुंजो झालेले अनुक्रमे गोपाल गावस, सर्वेश गावस व प्रथमेश गावस यांनी भूमिका चांगल्या निभावल्या.

कृष्णाचे मित्रांच्या भूमिकांत कुंदन गावस, रतीश गावस व विठोबा गावस ठीक वाटले. मुख्य कृष्णाची भूमिका संतोष गावस यांनी छान वठविली. देवचार झालेले आशिष गावस यांनी देवचाराचा रुबाब बरा प्रकट केला. लोहिता झालेल्या अनिशा गावस मात्र बऱ्याच कमी पडल्या.

‘गोमन्तक’मुळेच लोकांना स्पर्धेची माहिती

सध्या ‘गोमन्तक’ हे स्पर्धेचे परीक्षण करणारे एकमेव दैनिक असल्यामुळे या परीक्षणामुळेच लोकांना स्पर्धेची तसेच स्पर्धेतील नाटकांची माहिती कळू लागली आहे. तसे अनेक प्रेक्षकांनी बोलून दाखविले. आम्हाला ‘गोमन्तक’मधूनच ही नाट्यस्पर्धा फोंड्यात सुरू असल्याचे कळाले, असे अनेकांनी सांगितले. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या नाटकांत सर्वोत्तम नाटक कोणते यावरही प्रेक्षकांत चर्चा रंगताना दिसत होती. काही प्रेक्षकांनी तर आतापर्यंत झालेल्या नाटकांना क्रम द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे स्पर्धेत रंग भरत चालला असून प्रेक्षकांत उत्कंठा वाढताना दिसू लागली आहे.

संहिता थिटी; ठिगळे लावण्याचा प्रकार

या नाटकातला प्रमुख घटक म्हणजे नेपथ्याचा एका बाजूला कृष्णाच्या घराचे नेपथ्य तर दुसऱ्या बाजूला देवचाराच्या पेडाचे नेपथ्य अशा दोन प्रभागातून हे नाटक खेळत असल्यामुळे नेपथ्‍याची बाजू जास्त महत्त्वाची होती.

आणि नेपथ्यकार कुंदन च्यारी यांनी ही भूमिका चोखपणे बजावली. सागर गांवस यांचे पार्श्‍वसंगीत व गोरखनाथ राणे यांची प्रकाशयोजना प्रयोगाला पूरक असेच होते. पण संहिताच थिटी असल्यामुळे हा प्रयोग म्हणजे ‘आकाश फाटल्यावर ठिगळे लावण्याचा प्रकार’ वाटला. यामुळे नाटक प्रेक्षकांवर विशेष प्रभाव पाडू शकले नाही. एकंदरीत या नाटकामुळे रंगलेल्या स्पर्धेतील मजा थोडी किरकिरी झाल्यासारखी वाटली.

अजूनही गर्दी अपेक्षेहून कमीच

पहिल्या काही नाटकांपेक्षा आता कलामंदिरातील गर्दी वाढायला लागली असली तरी अजूनही कलामंदिरातील खुर्च्या पूर्णपणे भरलेल्या दिसत नाहीत.

वास्तविक आतापर्यंत झालेल्या बहुतेक नाटकांचा दर्जा पाहिल्यास या नाटकांना अजून गर्दी व्हायला हवी होती, असे राहून राहून वाटते. अशी नाटके पाहिल्यावर एका वेगळ्याच अनुभूतीचा प्रत्यय येतो. पण अजूनही प्रेक्षकांना याची जाणीव झालेली दिसत नाही. तरीही काही नियमित पणे येणाऱ्या प्रेक्षकांत आतापर्यंत झालेल्या नाटकांची आणि पुढे होणाऱ्या नाटकांबाबतची चर्चा रंगताना दिसत आहे, हेही नसे थोडके.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com