
कला अभिव्यक्ती आणि वारसा यांचा दाखला असलेली कला अकादमीची वास्तू, गोव्याच्या हृदयस्थळी एक सांस्कृतिक दिवा बनून उभी होती. प्रख्यात वास्तुविशारद चार्ल्स कुरैया यांनी रचलेली ही वास्तू कलाकार आणि सर्जनशीलता यांचे पोषण करणारी संस्था होती. मात्र या संस्थेचे गैरव्यवस्थापन आणि तिचा संरचनात्मक क्षय यातून ही वास्तु अलीकडील काळात विवादात अडकली आहे आणि त्यातूनच तिच्या रक्षणासाठी एक अनोखी चळवळ उभी राहत आहे- सुपारी आंदोलन!
'सुपारी घेणे' हा वाक्प्रयोग अशुभ अर्थाने एरवी वापरला जातो मात्र सुपारी या शब्दाची पुनर्व्याख्या करणारी ही मोहीम प्रतिकार आणि सांस्कृतिक रक्षणाची प्रतीक आहे. एकेकाळी गोव्याच्या सांस्कृतिक ओळखीची खूण असणारी कला अकादमी, नूतनीकरणाच्या काळातील चुकीचे व्यवस्थापन आणि ढासळलेल्या तिच्या पायाभूत सुविधा यामुळे कलाकार, नागरिक आणि कार्यकर्ते यांच्या चिंतेचा विषय बनून राहिली आहे.
दुरुस्ती काळातील तिच्या निकृष्ट कामाच्या दर्जामुळे सर्वत्र नाराजी पसरली आहे. कला अकादमीकडे होणाऱ्या सरकारच्या दुर्लक्षामुळे कला अकादमीचा मौल्यवान वारसा नष्ट होण्याचा धोका ओळखूनच या ‘सुपारी आंदोलना’चा जन्म झालेला दिसतो.
भारतीय बोलचालीत ‘सुपारी’ या शब्दाला गडद अर्थ आहे; हत्या किंवा बेकायदेशीर कृत्यासाठी होणारा करार म्हणजे 'सुपारी'!
मात्र 'सुपारी आंदोलन' या शब्दातील 'सुपारी'ने तिच्या वाईट अर्थाला कलात्मकतेने मोडीत काढले आहे आणि कला अकादमीला धोक्यात आणणाऱ्या भ्रष्टाचारी शक्तींना नामशेष करण्यासाठी ती सामूहिक शक्तीमध्ये रूपांतरित झाली आहे. हा बदल एका खरेतर वेगळ्या आणि सखोल विश्लेषणाला आमंत्रित करणारा आहे. व्यवस्थेतील विरोधाभासांना आव्हान देणारा हा दृष्टिकोन, भाषा आणि संस्कृतीतील सुप्त अर्थही कलात्मकपणे उघड करतो.
पारंपारिकपणे, ‘सुपारी देणे’ ही मूळ अंडरवर्ल्डची अपभाषा असली तरी व्यवस्थेच्या अपयशावर बोट ठेवण्यासाठी आणि सार्वजनिक समर्थन मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी केलेला ‘सुपारी’चा वापर ही हुशारीने केलेली एक व्यंगात्मक चाल आहे. चळवळीसाठी केला गेलेला या शब्दाचा वापर एका सांस्कृतिक(कला अकादमीच्या वास्तूच्या) हत्येची आठवण करून देतो आणि त्याचवेळी लोकांकडून एका धाडसी प्रतिसादाची अपेक्षाही करतो.
‘सुपारी आंदोलन’ या शब्दातील ‘सुपारी’ विश्वासघाताचे रूपक म्हणून येते. सुपारी आंदोलन हा फक्त निषेध नाही तर सांस्कृतिक स्थानांवर आपला हक्क साबित करू पाहणाऱ्या कलाकारांचे ते एक मिशन आहे. त्यातील ‘सुपारी’ या प्रक्षोभक शब्दाचा वापर कला अकादमीच्या दुर्दशेची गंभीरता विडंबनाच्या मार्गाने लोकांच्या लक्षात आणून देणारा आहे आणि त्याचवेळी कला अकादमीच्या कामात गरजेच्या असलेल्या पारदर्शकतेची आणि तिच्या पुनरुद्धाराची असणारी निकडही ती सुनिश्चित करणारा आहे.
संस्थात्मक गैरव्यवहारांसमोर नागरिक असहाय्य आहेत ही धारणा ही ‘सुपारी’ नाकारते आणि सामूहिक प्रयत्नांना बळ देते. सांस्कृतिक संस्थानी आर्थिक दबावापुढे झुकले पाहिजे हा समज फेटाळून प्रतिकाराला जागा असली पाहिजे असेच ही चळवळ सांगत आहे. ‘सुपारी’ची पुनर्व्याख्या करून ही चळवळ सुपारीच्या ‘हिंसाचारी’ या अर्थाचे रूपांतर ‘सशक्तिकरण’ या अर्थात फार चांगल्या प्रकारे करते हे महत्त्वाचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.