Bicholim IDC Theft
डिचोली: येथील औद्योगिक वसाहतीत (आयडीसी) भुरट्या चोऱ्या वाढल्या असून अज्ञात चोरट्यांकडून विविध आस्थापनांना लक्ष्य करण्यात येत आहे. काल (रविवारी) रात्रीही चोरांनी दणका देताना एका आस्थापनात चोरी करून केबल पळवण्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी डिचोली पोलिस स्थानकात तक्रार करण्यात आली आहे. भुरट्या चोऱ्या वाढल्याने आयडीसीमधील उद्योजकांमध्ये खळबळ माजली असून ते हैराण झाले आहेत. भुरट्या चोऱ्यांवर आळा घाला, अशी मागणी उद्योजकांनी पोलिसांकडे केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या जवळपास तीन वर्षांपासून ‘आयडीसी’त अधूनमधून चोऱ्या घडत आहेत. आयडीसीत पोलिस गस्त असतानाही चोऱ्या घडत असल्यामुळे उद्योजकांनी आश्चर्य आणि चिंता व्यक्त केली आहे.
आयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष दत्ताराम शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी डिचोली पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर यांची भेट घेतली. ‘आयडीसी’त वाढलेल्या चोऱ्यांबद्दल उद्योजकांनी खंत व्यक्त करून पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी केली. पोलिस निरीक्षकांनी आवश्यक ती पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन दिले. पोलिस निरीक्षकांना भेटलेल्या शिष्टमंडळात निखिल दीक्षित, सिद्धेश जिरगे, सुनील वेंगुर्लेकर, महेश नाईक आदींचा समावेश होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.