सासष्टी: जेव्हा निवडणुक जाहीर झाली तेव्हा फातोर्डा मतदारसंघातील भाजपचे दामू नाईक आणि गोवा फॉरवर्डचे विद्यमान आमदार विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांच्यामधील लढत अटीतटीची होईल असे भाकीत सर्वांनीच केले होते. आणि अजुनही स्थिती तशीच आहे. तरी मध्यंतरी दामू नाईक (Damu Naik) यांनी गोवा फॉरवर्डच्या (Goa Forward Party) काही प्रमुख कार्यकर्त्यांना भाजपात आणले. प्रभाग पाचची नगरसेविका श्र्वेता लोटलीकरचा भाजप प्रवेश दामू नाईकसाठी वरदान ठरु शकतो असे म्हणले जाते.
तरी शेवटच्या दोन दिवसात विजय सरदेसाई यांनी प्रचारात मुसंडी मारली. याची प्रचिती त्यांनी शुक्रवारी फातोर्डात घेतलेल्या जाहीर सभेला जो प्रचंड जनसमुदाय जमला त्यावरुन दिली.
भारतीय जनता पक्षाने गोव्याला लुटले, भाजप हा जातीयवादी पक्ष आहे, अशी टिका सरदेसाई यानी केली. केवळ कॉंग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीचे सरकार गोव्यासाठी तारणहार ठरेल असेही सरदेसाई यानी सांगितले. त्यांच्या व सर्वच वक्त्यांना जनसमुदायाकडुन उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
कॉंग्रेस सोडून तृणमूल पक्षात प्रवेश केलेल्या लुईझीन फालेरोवरही त्यानी टिका केली. 2012मध्ये त्याने आपल्याला तिकीट नाकारले म्हणून गोवा फॉरवर्डचा उदय झाला. 2017 मध्ये सरकार स्थापनेची संधी स्वार्थापोटी गमावली, असेही सरदेसाई म्हणाले. दामू नाईक आणि विजय सरदेसाई यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. या निवडणुकीच्या निकालावर दोघांचेही राजकीय भवितव्य ठरणार आहे.
फातोर्डात काही प्रमाणात अल्पसंख्यांक दामू नाईकच्या बाजूने आहेत. त्यांचे नगरसेवकही निवडून आले आहेत. त्यामुळे दामू नाईक यांना विजयाची संधी आहे हे नाकारता येणार नाही. 2017 साली सरदेसाई यांनी भाजपच्या (BJP) सरकारात प्रवेश केला त्यामुळे फातोर्डातील कित्येक अल्पसंख्याक मतदार त्याच्या विरोधात गेले. पण त्यांनी टिकेला प्रत्युत्तर दिले नाही, तर त्या गोष्टीचा त्यांनी पश्र्चाताप केला, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यानी सांगितले.
सुधींद्र कुलकर्णी म्हणाले की, 'माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी सर्व समाजाचा आदर करायचे. पण सद्याचा भाजप पक्ष हा वाजपेयींच्या स्वप्नातला भाजप राहिलेला नाही.'
फातोर्डा मतदार संघात आम आदमी पक्षाचे संदेश तळेकर आणि तृणमूल कॉंग्रेसच्या अॅड. सेऊला वाझ उमेदवार आहेत; मात्र त्यांचा प्रभाव तेवढा दिसत नाही. त्यामुळे खरी लढत ही दामू नाईक आणि विजय सरदेसाई यांच्यातच होईल, असे म्हटले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.