Sand Mining: रात्री 12 नंतर रेतीउपसा, रुंदावलेले नदी पात्र; तेरेखल, म्हादई नद्यांवरून Ground Report

Tiracol Mhadei River Sand Mining: नदीतून रेती काढण्यास बंदी असतानाही पेडणे तालुक्‍यातील उगवे, तोरसे, पोरस्कडे, न्‍हयबाग भागात तेरेखोल नदीतून बेकायदेशीर रेती काढण्‍यात येत असल्‍यामुळे नदीचे पात्र रुंदावत चालले आहे.
Illegal Sand Mining
Illegal Sand MiningDainik Gomantak
Published on
Updated on

Tiracol Mhadei River Bed Sand Extraction Illegal Mining

पेडणे : नदीतून रेती काढण्यास बंदी असतानाही पेडणे तालुक्‍यातील उगवे, तोरसे, पोरस्कडे, न्‍हयबाग भागात तेरेखोल नदीतून मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रेती काढण्‍यात येत असल्‍यामुळे नदीचे पात्र रुंदावत चालले आहे. शेती व बागायती नष्ट होत चालली आहे. गेल्‍या कित्‍येक वर्षांपासून हा प्रकार सुरू असूनही सरकारचे त्‍याकडे अक्षम्‍य दुर्लक्ष झाले आहे.

खाण व व्यवसाय खाते, पेडणे मामलेदार, उपजिल्हाधिकारी, किनारी पोलिस दल या सर्वांकडे तक्रारी करूनसुद्धा नदीतून बेकायदेशीर रेती काढण्याचे प्रकार सुरुच राहिल्याने शेवटी उगवे येथील उदय महाले व इतर शेतकऱ्यांनी २०२३ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली. त्‍यानंतर न्यायालयाने नदीतून रेती काढण्यावर बंदी घातली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर काही दिवस संबंधित खात्यांनी धडक कारवाई केली, पण नंतर काही महिन्यांतच ही मोहीम थंडावली.

न्यायालयाच्या आदेशानंतरही रात्रीच्या वेळी रेती काढण्याचे प्रकार सुरूच राहिल्याने उगवे गावाच्या वतीने १० डिसेंबर २०२४ रोजी शेतकऱ्यांच्या वतीने राघोबा महाले, उदय महाले व विनायक महाले यांनी तेरेखोल किनारी पोलिस ठाणे तसेच मोपा, पेडणे पोलिस ठाण्यात पुन्‍हा लेखी तक्रार केली आहे.

चोर-शिपाई खेळ सुरूच

रात्री १२ नंतर नदीच्या पात्रातून अनेक होड्या रेती काढतात. पहाटे ३ ते ४ वाजेपर्यंत हा प्रकार सुरू असतो. यासंबंधी किनारी पोलिसांना फोनवरून कळविले तर यांत्रिक बोट घेऊन ते येतात, पण त्यापूर्वीच होड्या पळालेल्‍या असतात. यामुळे किनारी पोलिस व या रेतीमाफियांचे साटेलोटे असल्याचे सिद्ध होते, असा आरोप उदय महाले यांनी केला. त्याचप्रमाणे काही राजकारण्यांशीही या रेतीमाफियांचे संबंध असल्याने या बेकायदेशीर रेती उत्खननाला संरक्षण मिळते. पहाटे रेती काढून झाल्यावर लगेच टेम्‍पो, ट्रकमधून ती नेली जाते. सकाळी किनाऱ्यावर त्याचा मागमूसही जाणवत नाही. जर रेती काढणे बंद आहे तर किनाऱ्यांवर रेती काढणाऱ्या होड्या का? तसेच रेती काढणारे मजूर या परिसरात का राहतात? असे प्रश्‍‍नही महाले यांनी उपस्‍थित केले.

सत्तरीत म्हादई नदीच्‍या अस्‍तित्‍वावरच घाला

सत्तरी तालुक्यात म्हादई व उपनद्यांमध्ये बेकायदेशीरपणे रेतीउपसा बिनदिक्कतपणे सुरू आहे. गेल्याच महिन्यात सावर्डे-सत्तरीत अशाच प्रकारे बेकायदेशीर रेतीउपसा ठिकाणी काम करताना म्हादई नदीत बुडून एका महिलेचा मृत्‍यू होण्‍याची घटना घडली होती. नदीच्या पात्रात रेती काढण्यासाठी गेली असता बोट उलटून ही दुर्घटना घडली होती.

Illegal Sand Mining
Sand Mining: गोव्यात रेतीचा तुटवडा! पर्यावरण दाखल्यांमुळे परवान्यांना विलंब; बांधकाम उद्योगावर नकारात्मक परिणाम

वास्तविक सरकारी यंत्रणेने अशा बेकायदेशीर व्यवसायांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. बेकायदेशीर रेतीउपसा रोखणे सरकारी यंत्रणेला एक आव्हानच बनले आहे. नदीच्या पात्रातून रेती काढून ती नदी किनारी भागात चाळली जाते. त्‍यानंतर तिची विक्री केली जाते. सावर्डेच्या घटनेनंतर काही प्रमाणात व्यवसाय मंदावला आहे. पण काही ठिकाणी रेतीउपसा सुरूच आहे.

सत्तरी तालुक्यात म्हादई आणि उपनद्यांच्या पात्रांतील रेती, दगड यांचे उत्खनन केले जाते. त्याचे गंभीर व दूरगामी दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. नदीतील मत्स्यसंपदेबरोबरच काठांवर सुरक्षाकवच असणारे शेरनी आणि अन्य वृक्ष, वनस्पती उन्मळून पडत असल्याने नद्या आपला प्रवाह बदलत आहे. सोनाळ, सावर्डे, नानोडा, वेळगे, कुडशे, ठाणे आदी सत्तरीच्या भागातील गावात बेकायदेशीर रेतीव्यवसाय निर्विघ्नपणे दिवसाढवळ्या सुरू आहे.

Illegal Sand Mining
Sand Mining: गोव्यात घर बांधणे 'का' बनतेय दिवास्वप्न? 'वाळू'प्रश्नाविषयी विशेष लेख वाचा

यासंदर्भात खाण-खाते, वन विभाग मामलेदार, जलस्रोत खाते आदी सरकारी यंत्रणेने पाहणी करून कारवाईची गरज आहे. म्हादई नदीच्या अस्तित्वावर बेकायदेशीर रेतीव्यवसायाने घाला घातला आहे. असे व्यवसाय करत असताना आता मानवाच्या जीवाला देखील धोका वाढला आहे. या म्हादई नदीच्या पात्रात मोठमोठे डोह असून माणूस एकदा बुडाला की त्याचा शोध घेणे कठीण होऊन जाते. बेकायदेशीर व्यवसायामुळे पर्यावरणावरील परिणामांबरोबरच आता माणसाच्‍या देखील जीवावर बेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com