अनवट इतिहास : सुरतेवर छापा

छत्रपती शिवाजी महाराजांचा सुरतेवर छापा व सुरत लुटण्याचा इतिहास म्हणजे आपल्यासाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही.
Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji MaharajGoogle

सर्वेश बोरकर

छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 जानेवारी १६६४ रोजी सुरत लुटले हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण त्यांनी दुसर्‍यांदा सुरतेवर छापा टाकून सुरतेला लुटले हे फार कमी जण जाणतात. ३ ऑक्टोबर १६७० रोजी महाराजांनी दुसर्‍यांदा सुरत शहर लुटून मुघल साम्राज्याला जबरदस्त धक्का दिला होता.

छत्रपती शिवाजी महाराजाचे युद्धकौशल्य, त्यांचे राजकारण, गनिमी कावा तंत्र हे जगभरातल्या इतिहास अभ्यासकांच्या कुतूहलाचे विषय. सुरत शहर मुघलांचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र, शहरात सोने-नाणे, हिरे-माणके खच्चून भरलेली. पहिल्या लुटीच्या वेळी या सुरत शहराला मराठा सैन्याने साफ केले होते आणि स्वराज्याचा खजिना भरला होता.

स्वराज्याच्या उभारणीसाठी त्या लुटीची मोलाची मदत झाली. पण अर्थातच यामुळे मुघल बादशाह औरंगजेब खवळला होता. त्याने मिर्झा राजे जयसिंगाला मराठ्यांवर हल्ला करण्यासाठी पाठवले. मिर्झा राजे जयसिंगाने आपल्या प्रचंड सेनेच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्याशी तह करणे भाग पडले होते. हाच तो सुप्रसिद्ध पुरंदरचा तह, या तहात महाराजांना आपले २३ किल्ले आणि चार लक्ष रुपयांवर पाणी सोडावे लागले.

नंतर आग्र्याला मुघल बादशाह औरंगजेबाच्या भेटीला जावे लागले आणि तिथे अपमान झाल्यावर नजरकैदेत राहावे लागले. मग त्यांनी तिथून कशी सुटका करून घेतली, याचा इतिहास प्रत्येकालाच माहीत आहे. परत रायगडी आल्यावर महाराज काही दिवस शांत होते.

स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढण्याची तळमळ त्यांना लागली होती. मुघलांना धडा शिकवण्याची ते वाटच बघत होते. रयतेवर झालेल्या अत्याचाराचा बदला त्यांना घ्यायचा होता आणि राज्याची विस्कटलेली आर्थिक घडीसुद्धा परत बसवायची होती. सुरत शहराला परत एकदा जबरदस्त धक्का देण्याचा त्यांचा मनसुबा होता.

२ ऑक्टोबर १६७० या तारखेला सुरतमध्ये बातमी धडकली की, मागच्यापेक्षा अधिक शक्तिशाली सैन्य घेऊन छत्रपती शिवाजी महाराज निघाले आहेत. ते पंधरा हजारांच्या जवळपास पायदळ आणि घोडदळाचे आपले सैन्य घेऊन शहराच्या सीमेवर आले आहेत. हे ऐकताच संपूर्ण सुरत शहरात एकच पळापळ सुरू झाली. मुघलांचे सर्व अधिकारी तोफा सज्ज करण्यासाठी धावपळ करू लागले.

तारीख ३ ऑक्टोबर १६७० रोजी मराठ्यांचे सैन्य सुरतच्या तटबंदीला धडकले. पहिल्या लुटीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून मुघल बादशाह औरंगजेबाने ही तटबंदी बांधून घेतली होती. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पंधरा हजार संख्येच्या सैन्यापुढे तीनशे लोक कसे टिकणार? अखेर मराठा सैन्याने शहरात प्रवेश केलाच.

३ तारखेपासून ५ तारखेपर्यंत ३ दिवस मराठा फौज सुरत शहराची लूट करत होती. पैसा, सोने नाणे, जड-जवाहीर सगळे ताब्यात घेतले गेले. मात्र असे म्हणतात की, तांब्याच्या वस्तू आणि मूल्यवान कपड्यांना हात लावला नाही. ही लूट करत असताना मराठा सैन्याने सामान्य प्रजेला अजिबात त्रास दिला नाही. फक्त मोठे मोठे व्यापारी, धनिक, श्रीमंत यांना लक्ष्य केले गेले. त्यातही धार्मिक प्रवृत्तीच्या चांगल्या लोकांना या लुटीतून वगळले गेले..

पहिल्या लुटीत ८० लक्ष मिळाले होते, तर या लुटीत तब्बल ६६ लक्ष रुपयांचा खजिना मराठ्यांच्या हाती लागला. त्यात सोने, रूपे, हिरे, माणके, मोती, पाचू, पोवळे, मोहरा, पुतळ्या, अशर्रफया, होन, नाणे अशी मूल्यवान सामग्री सामील होती. सुरतवरून परत येताना छत्रपती शिवाजी महाराजांवर मुघल सैन्याने चिडून हल्ले केले.

सुरतेहून छत्रपती शिवाजी महाराज पेठ-बागलाणमार्गे मुल्हेरकडे निघाले (नाशिक जिल्हा), साल्हेर- मुल्हेर गडावरून चांदगडास येऊन कंचननमंचन घाटाने कोकणात उतरले, असे मराठ्यांच्या हालचालींवरून दिसते. पंधरा हजारांच्या फौजेनिशी महाराज चांदवडनजिक आले. मुघल सेनापती दाऊदखान कुरेशी याने मराठ्यांच्या सैन्याला गाठले आणी १७ ऑक्टोबर १६७० रोजी घनघोर युद्ध होऊन त्यात तीन हजार मुघल मारले गेले व मुघलांचा पराभव झाला. ही लढाई ‘वणी-दिंडोरीची लढाई’ म्हणून प्रसिद्ध आहे.

त्या भागातील अलंग, कुलंग, त्रिंगलवाडी हे गडही स्वराज्यात दाखल झाले. विजयी छत्रपती शिवाजी राजे नाशिकमार्गे सहीसलामत हरिश्चंद्रगड जवळील कुजरगडावर येऊन पोहोचले आणि यानंतर ऑक्टोबरअखेरीस रायगडावर पोहोचले.

या लुटीबाबत आणखी एक आख्यायिका अशी सांगितली जाते की, मुघल सैन्यापासून जपून सुरक्षितपणे हा खजिना स्वराज्यात यावा यासाठी या खजिन्याचे दोन भाग पाडले गेले. अर्धा खजिना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यासोबत आणला गेला आणि अर्धा खजिना नाशिक भागात अज्ञात ठिकाणी दडवला गेला.

असे म्हणतात की अजूनही तो खजिना त्या भागात असून काहीजण त्याचा शोध घेत फिरत असतात. दुसर्‍यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा सुरतेवर छापा व सुरत लुटण्याचा इतिहास म्हणजे आपल्यासाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com