पणजी: पणजी शहर जलमय होण्याचे प्रकार टाळणे अशक्य असल्याचे दिसते. कारण पोर्तुगीजकालीन असलेली गटार योजना आणि त्यातून पावसाळ्याच्या दिवसात वाहून येणाऱ्या पाण्याचा ओघ पाहता तो अधिक आहे. त्याशिवाय गटारांतून आडव्या गेलेल्या विविध सुविधांच्या वाहिन्या पाहता त्याठिकाणी अडकणारा कचरा पाण्याच्या प्रवाहांना अडथळा बनत आहे.
(High tide responsible for water on roads in Panaji)
मांडवी नदीची पाण्याची पातळी समुद्र भरतीच्यावेळी वाढते आणि त्याचवेळी पडलेल्या पावसाचे पाणी समुद्रात जाऊ शकत नसल्याने ते पाणी पणजीत भरते, असे महापालिका मुख्य अभियंता विवेक पार्सेकर यांनी सांगितले.
पणजी शहराचा विस्तार किंवा विकास लहानपणापासून पाहणारे तथा शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कामत म्हणतात की, सौंदर्यीकरणाच्या नावाखाली पणजी शहरातील मातीचे किंवा गवताचे आच्छादन नष्ट होत आहे. ज्या इमारतींना परवानग्या दिल्या आहेत, त्या इमारतीचा परिसर सिमेंटच्या ब्लॉक किंवा टाईल्सनी आच्छादला जात आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. पाणी जिरवण्यासाठी आवश्यक असणारा भू-भाग जर अशा पद्धतीने काँक्रिटने झाकून टाकला, तर पाणी साचूनच राहणार आहे. आल्तिनोवरील टेकडीवरून पाणी शहराच्या खालील भागात येते, तेथून ते नदीच्या पात्रात जाते. परंतु समुद्राला भरती आल्यानंतर पाण्याची पातळी शहराच्या जमीन पातळीवबरोबर येते, त्यावेळी पावसाचे पाणी जाणार कुठे हा प्रश्न आहे? याचा विचार कोण करतो.
पणजीत महावीर उद्यान, गार्सीया उद्यान, पोलिस मुख्यालयातील फुटबॉल मैदान, आझाद मैदान आणि नॅशनल थिएटरमागील मैदान, कांपाल येथील काही बंगल्याभोवतालचा मोकळा परिसर अशा मोकळ्या ठिकाणी पावसाचे पाणी जमिनीत मुरले जाते. त्यामुळे उर्वरित काँक्रिटच दिसते, त्यामुळे पावसाचे पाणी मुरले जात नाही, त्या-त्या परिसरात ते साचून राहते. साधारण अर्धा इंच पाऊस शहरात एक तासभर पडला तर शहराची दाणादाण उडते, हे आपण डोळ्यांनी पाहिले आहे आणि अनुभवलेही आहे. पोर्तुगीज काळात अनेक ठिकाणी मोकळ्या जागा होत्या, पण आता त्या जागांवर इमारती उभारल्या गेल्या आहेत, असे डॉ. कामत सांगतात.
पणजी शहराच्या उत्तरेच्या बाजूला मांडवी नदीत शहरातील गटारांतून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पंधरा ठिकाणे आहेत. त्यामुळे शहराचा विकास झाला असला, तरी त्या पटीने भुयारी गटारांची यंत्रणा सुधारलेली नाही. या गटारांच्या प्रवाहांना अनेक ठिकाणी जलवाहिन्या, इंटरनेटसारख्या विविध सेवा सुविधा देणाऱ्या कंपन्यांच्या केबल्स आडव्या गेल्या आहेत. त्यांचा गटारातून वाहून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा करतात. त्याशिवाय प्लास्टिक पिशव्या किंवा बाटल्या, इतर कचरा अडकून पडतो, अशा ठिकाणी एकवेळा साफसफाई केली तरी पुन्हा पाणी साचण्याचे प्रकार घडतात, असे महापालिकेचे माजी माहापौर उदय मडकईकर यांनी सांगितले.
आल्तिनोवरून वाहून येणाऱ्या पाण्याला घ्यावे लागते वळण
सरस्वती इमारतीसमोरील चेंबरमध्ये दाब वाढल्यास पाणी रस्त्यावर
कचरा वाहून येण्याचे व अडथळा बनण्याचे प्रमाण वाढले
समुद्र भरतीमुळे मांडवी नदीची पातळी रस्त्याच्या समप्रमाणात आल्यानंतर पाणी तुंबण्याचे प्रकार
सध्याच्या गटार यंत्रणेद्वारे पाणी तुंबणे टाळणे अशक्य
आपत्तीतील मॉक ड्रिल आवश्यक
पणजी शहरातील काही ठिकाणी मातीच्या इमारती आहेत, त्याशिवाय आल्तिनोच्या टेकडीभोवती इमारतींचा वेढा पडलेला आहे. जर अपेक्षापेक्षा पाऊस कोसळला तर टेकडीला धोका निर्माण होऊ शकतो. पणजीत रात्रीचा पाऊस जास्त पडला आणि काही घटना घडली, तर आपत्तीकाळात अग्निशमन दल किंवा आपत्ती व्यवस्थापन कशा पद्धतीने काम करणार आहे. त्यामुळे आपत्तीकाळातील उपाययोजनेविषीय मॉक ड्रिल करणे आवश्यक आहे. ते भविष्यासाठी निश्चित उपयोगी पडू शकते, असेही डॉ. कामत यांनी सूचित केले.
आल्तिनो टेकडी धोकादायक!
आल्तिनो टेकडीवरील अनेक बंगले किंवा इमारतींना मलनिस्सारण वाहिनींची सुविधा नाही. अनेक इमारतींची किंवा बंगल्यांतून मलनिस्सारणाच्या टाक्या आहेत. त्यामुळे त्याचे पाणी जमिनीत मुरले जाते. हे पाणी घट पकडून ठेवणाऱ्या मातीतील चिकटपणा नाहीसा करते, त्यामुळे झाडांची मुळेसुद्धा त्या पाण्यामुळे उघडी पडतात. टेकडीवर पडलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्थिरित्या योजना नाही, त्यामुळे या परिसरात पाणी मुरत जाते. काही ठिकाणी हळूहळू माती कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत ही धोक्याचीच सूचना आहे, असे डॉ. कामत सांगतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.