पणजी: धुण्या-पुसण्याचे काम म्हणजे कोणाच्याही डोक्यांना आठ्या पडाव्यात. आणि कोणी असा व्यवसाय करत असेल तर क्वचितच काहीजण नाकही मुरडण्यास कमी करत नाहीत. मात्र या साऱ्यांचा विचार न करता हेरंब मळकर्णी याने आमरालबांध - ताळगाव येथे वॉशिंग सेंटर सुरू केले आहे.
स्टार्टअपच्या माध्यमातून व्यवसायाची मुहूर्तमेढ त्याने रोवली. हेरंब हा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे. दुबईतील पॅनासॉनिक कंपनीतही त्याने काम केलेले आहे. महिना ३ ते ४ लाख रुपये पगाराची नोकरी त्याने काही वर्ष केली. नोकरी ही त्याला गुलामगिरीसारखी वाटू लागल्यामुळे त्याने स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याच्या उद्देशाने व्यवसायात त्याने पदार्पण केल्याचे सांगितले. कुठलाही अनुभव, प्रशिक्षण नसताना उद्योग सुरू करणे ही फार मोठी ‘रिस्क’ असते. उद्योग सुरू करून मग अनुभव घेणे हे खर्चिक व कधीकधी तापदायकसुद्धा ठरू शकते. हेरंबसाठी हि ‘रिस्क’ फायदेशीर ठरली. अभ्यासूवृत्ती, जिज्ञासा व कठोर परिश्रम करण्याची इच्छा असेल तर या जगात काहीही अशक्य नाही. असे तो सांगतो.
गोव्यात शिक्षण सुरू असतानाच तो मित्रांचे, शेजाऱ्यांचे, ऐनवेळी अडलेल्या नडलेल्यांचे संगणक दुरुस्त करून चार पैसे मिळवायचा. त्याच्या खोलीत फावड्यापासून स्क्रू ड्रायव्हरपर्यंत सर्व साहित्य आहे. कुठलेही काम अडू नये, असे त्याचे म्हणणे आहे.
उद्योग सुरू करताना आलेल्या समस्यांबाबत तो म्हणाला, मुद्रालोन योजनेंतर्गत मी साडेतीन लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्या शिवाय स्वतःची काही गुंतवणूक करून पूर्णतः व्यावसायिक पद्धतीने व्यवसायाची उभारणी केली. जागा कुठे मिळत नव्हती. ज्या ठिकाणी जागा पाहिली तेथील महिन्याचे भाडेही परवडण्यासारखे नव्हते.
त्यामुळे घरासमोरच हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. याला काही प्रमाणात घरातून विरोध झाला. घरासमोरच पत्र्याची शेड बांधली जाणार असल्यामुळे घराचे सौंदर्य झाकले जाणार होते. त्यातूनही कॉम्प्रेसरचा येणारा आवाज घरातील ज्येष्ठांना त्रासदायक ठरणारा होता. त्यातूनही मार्ग काढत व्यवसाय करण्याचा ठाम निर्धार केला. यामुळे घरच्यांनीही नमते घेतले. त्यातल्या त्यात सरकारी खात्यातील ना हरकत दाखल्यांसाठी वारंवार संबंधित कार्यालयात हेलपाटे घालावे लागले.
सावध तो सुखी!
कोणी जर नविन व्यवसाय सुरू करत असेल तर सावध राहून करावा. कारण व्यवसायाच्या माध्यमातूनही फसवणूक करणारेही तुम्हाला भेटू शकतात, असे हेरंब म्हणाला. जेव्हा हायड्रोलिक जॅक खरेदी करायचा होता. त्यावेळी आपल्याला वाईट अनुभव आले. सुदैवाने माझी फसवणूक टळली. आश्वासने देणारे अनेकजण तुम्हाला भेटतील, फोन करतील. मात्र कायदेशीर पद्धतीने कुठलाही व्यवहार केला पाहिजे. आर्थिक व्यवहार करताना प्रत्यक्ष भेटूनच करावेत, असे त्याने सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.