अनिल पाटील
पणजी: राज्यात मद्य सेवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे हिपॅटायटिस रोगाचे रुग्ण वाढत आहेत. यासाठी सध्यातरी कोणत्याही प्रकारची औषधप्रणाली उपलब्ध नसल्याने मद्य सेवनावर नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचे मत गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. रोहन बडवे यांनी व्यक्त केले आहे. 28 जुलै हा जागतिक हिपॅटायटिस दिन म्हणून पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर पणजीतील डॉ. बडवे दै. ‘गोमन्तक’शी बोलत होते.
(Hepatitis is increasing due to alcohol consumption in the goa state)
बडवे यांनी सांगितले, ‘‘प्रामुख्याने हिपॅटायटिस ए. ई. बी. आणि सी. हे चार प्रकार दिसून येत असले तरी ए आणि ई या रोगाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. असे होण्याचे कारण दूषित अन्न, पाणी व अवेळी खाण्याच्या सवयी हे आहे. यावर सध्या उपाय असून, हिपॅटायटिस बी विषाणू शरीरातून पूर्णपणे नष्ट करण्यासाठी सध्या कोणत्याच प्रकारची औषध उपलब्ध नाहीत. मात्र, त्याच्यावर नियंत्रण आणता येते. यावर सध्या लस उपलब्ध असून, नागरिकांनी ही लस घेणे गरजेचे आहे.’’ क्रोनिक हिपॅटायटिसमध्ये सलगच्या तोंडावाटे घेण्याच्या गोळ्या आज उपलब्ध झाल्याने यावरही नियंत्रण आणता येते.
...तर ही धोक्याची पहिली घंटा
पोटाची घेर, वजन मोठ्या प्रमाणात वाढले असेल आणि त्याच्या जोडीला मद्यपान असल्यास ही धोक्याची पहिली घंटा आहे, हे निश्चित! कारण, आता लगेच तुम्हाला काही होणार नाही. मात्र, पुढील पाच, दहा, पंधरा वर्षांमध्ये हिपॅटायटिसचा आजार होऊ शकतो. त्यामुळे ‘फॅटी लिव्हर’ काहीच नाही, म्हणून आज दुर्लक्ष करू नका, नाहीतर उद्या तुम्हाला काहीच करता येणार नाही, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
काय आणि कसे होते?
लठ्ठ असलेल्या बहुतांश रुग्णांना चयापचयाशी संबंधित आजार असण्याचा संभव असतो. तसेच, आपल्या देशातील नागरिकांमध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते. यकृतामध्ये चरबीचे प्रमाण वाढलेले असते. त्यातून यकृत कडक होऊन लिव्हर सोरॅसिस होण्याची शक्यता वाढते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.