बदलत्या जीवनशैलीमुळे आता २० ते ३५ वयोगटातील तरुण मेंदूत रक्तस्राव होत असल्याच्या तक्रारी घेऊन ‘गोमेकॉ’त येऊ लागले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आज(गुरुवारी) विधानसभेत दिली. ‘गोमेकॉ’त मध्ये पेटस्कॅन आणि मॅमोग्राफी यंत्र लवकरच उपलब्ध केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
याविषयीचा प्रश्न वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी विचारला होता. ते म्हणाले दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात रेडिओलॉजी विभागातील यंत्रणा चालत नसल्याने रुग्णाला खाजगी इस्पितळात पाठवण्यात आले. त्या खासगी इस्पितळाने, रुग्णाने शुल्क भरले नाही म्हणून वैद्यकीय अहवालच दिला नाही. या परिस्थितीत रुग्णाचे शुल्क सरकार भरणार आहे का. रेडिओलॉजी विभागातील काही यंत्रणा बंद पडली तर सरकारकडे काय पर्यायी यंत्रणा आहे.
आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, गोमेकॉतील काही नादुरुस्त यंत्रणा दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तेथे नवीन यंत्र घेण्याचा निर्णय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येतो. गोमेकॉच्या रेडिओलॉजी विभागात रुग्ण जास्त असतील तर तेथेच असलेल्या ‘रेडियन्स डायग्नोस्टिक्स’ कडे करार केलेला आहे, तेथे रुग्ण पाठवले जातात, मात्र चार वर्षात केवळ ३१० रुग्ण तेथे पाठवले गेले आहेत.
‘एमआरआय’साठी ४० मिनिटे लागतात यामुळे यंत्रे किती वाढवावीत, याचाही विचार करावा लागतो. तंत्रज्ञ आणि मनुष्यबळ यांची सांगड घालून इस्पितळ चालवावे लागते. केवळ इस्पितळासाठी मोठी इमारत बांधून चालत नाही तर यंत्रे उपकरणे आणि तंत्रज्ञ लागतात.
ते म्हणाले दर आठवड्याला आम्ही सगळ्या यंत्रणेचा आढावा घेतो. सगळी यंत्रणा कार्यवाहीत राहावी, असे प्रयत्न असतात.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, आपत्कालीन उपचार कक्षात रुग्ण संख्या वाढल्याने तेथील यंत्रणेवर ताण येतो. काही वेळेला हृदयविकाराच्या रुग्णावर पहिल्या तासातच कोणते उपचार करावे हे ठरवावे लागते. त्यासाठी आवश्यक ती उपकरणे आपत्कालीन उपचार कक्षाच्या आजूबाजूलाच उपलब्ध करावी लागतात. त्याची सोय व वैद्यकीय महाविद्यालयात केली गेली पाहिजे. डिचोलीचे आमदार चंद्रकांत शेटये यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील मॅमोग्राफी यंत्र बंद असल्याकडे सरकारचे लक्ष वेधले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.