
विजय केंकरे
आमच्या नाट्य क्षेत्रात एकच गुरू असण्याची परंपरा खूप कमी आहे. दामू केंकरे माझे वडील असल्यामुळे लहानपणापासून मी नाटक बघत आलो आहे आणि त्यातून माझ्यावर नाटकाचे संस्कार होत गेले आहेत, पण मी स्वतः जेव्हा नाटकात काम करायला उभा राहिलो तेव्हा माझ्यासमोर दिग्दर्शक म्हणून जो माणूस उभा होता, त्याला मी माझा गुरू मानला.
तो काय करतो, कुठल्या पद्धतीने तो नाटक करतो हे मी लक्षपूर्वक न्याहाळत होतो- तो माणूस म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे! त्या अर्थाने माझा नाटकातला पहिला गुरू पुरुषोत्तम बेर्डे होता. गुरु-शिष्यांचे नाते कसे असू शकते ते त्यानंतरच्या एका घटनेने मला कळले.
आमच्या 'या मंडळी सादर करू या' या संस्थेच्या नाटकाचा एक प्रयोग संपताना पुरुषोत्तम बेर्डेने माझ्या हातात एका एकांकिकेची संहिता ठेवली व तो म्हणाला, 'विजय, मला वाटते की तुझे सारे लक्ष मी नाटक कसे बसवत होतो याकडे आणि नाटकाच्या तांत्रिक अंगाकडे होते, तेव्हा ही एकांकिका तू बसव. तुझ्यात अभिनेत्यापेक्षा दिग्दर्शक जास्त आहे.' मला ही जाणीव करून देणारा माझ्या दृष्टीने माझा गुरूच आहे.
नाटक ही विचार करून करण्याचीच गोष्ट आहे, परंतु तो विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम रंजन आहे. ते कसे पोहोचवावे याची दीक्षा मला अरुण नाईक आणि राजीव नाईक या दोघांनी दिली. यांच्याशी माझा संबंध आला आणि एखाद्या नाटकाच्या आशयाकडे कसे बघावे हे मला समजून आले.
विजया मेहता यांच्याबरोबर मालिकेत काम करत असताना त्यांच्याकडून शिकलो ती गोष्ट म्हणजे शिस्त. आपले काम करत असताना कुठल्याही अवांतर गोष्टीवर चर्चा न करता 'फोकस्ड' काम कसे असावे याचा तो आदर्श होता. जो 'आपला' वास्तववाद आहे तो विजयाबाईंनी जयवंत दळवी यांच्या नाटकांद्वारे आपल्याकडे रुजवला. अर्थात इतर शैलींची नाटके त्यांनी केली असली तरी त्यांचा वास्तववाद मला खूप काही शिकवून गेला आहे.
त्यानंतर माझ्यावर प्रभाव पडला तो म्हणजे गुरुतुल्य पंडित सत्यदेव दुबे यांचा. अनेक कारणांसाठी त्यांच्याशी खूप काळ माझा संपर्क आला. गुरुजींचे एक वाक्य माझ्या आयुष्यभर लक्षात राहील- 'अभिनय शिकवता येत नाही पण शिकता येतो.
दुसरं त्यांनी शिकवलं हे की एखादी कलाकृती तुम्ही निर्माण करत आहात आणि मध्येच तुमच्या लक्षात आलं की ती बरोबर आकार घेत नाहीय तरी देखील तिच्याबद्दल वाईट बोलून त्याचे स्पिरिट घालवायचे नाही. ती कलाकृती पूर्ण करायची. त्यांनी सांगितलेली महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे- 'नाटक करते रहो!' जर कुणी आपण फक्त चांगलेच नाटक करीन हा विचार करत थांबून रहात असेल तर त्यातून काहीच होणार नाही.
बरे-वाईट कसेही असले तरी नाटक सातत्याने करत राहिले पाहिजे. त्यांच्या अशा विचारातून ‘जोखीम घेणे’ हा महत्त्वाचा भाग मी शिकलो. लेखक आणि दिग्दर्शकाचे संबंध कसे असावेत, नाटकाची संरचना म्हणजे काय, नाटकात अनावश्यक पात्रे कशी टाळावीत हे समजून घेण्यात मला रत्नाकर मतकरींनी मदत केली. त्यांच्या नाटकाचे पहिलेच वाक्य प्रेक्षकांना बांधून घेत असे. नाटकाच्या बांधणीचे महत्त्व त्यांनी माझ्या लक्षात आणून दिले.
निर्माते सुधीर भट यांनी मला नाट्यनिर्मिती कशी करावी आणि ही निर्मिती होत असताना कशाकशाचे अवधान बाळगावे लागते हे शिकवले. गोवा हिंदू असोसिएशनचे रामकृष्ण नायक, अविष्कारचे अरुण काकडे, आयएनटीचे दामू झव्हेरी हे नाटकाकडे निरपेक्ष वृत्तीने पाहणारे लोक होते.
संस्था कशी चालवावी याचे धडे त्यांच्याकडून अनेकांनी घेतले आहेत. अनेकदा आपण रंगभूमीची सेवा केली असे शब्द सहज वापरतो पण खरी सेवावृत्ती मला या लोकांकडे बघायला मिळाली. भास्कर चंदावरकर यांच्याबरोबर मी एकच नाटक केले. संगीताच्या दृष्टिकोनातून एखादे नाटक कसे डिझाईन करावे याचा भास्कर चंदावरकर हा वस्तुपाठ होता. 'ऐन वसंतात अर्ध्या रात्री' हे विलियम शेक्सपियरच्या नाटकावर आधारलेले नाटक होते. शेक्सपियरसमोर बालकवींच्या कवितांच्या इमेजेरीची (प्रतिमासृष्टीची) कल्पना त्यांनी केली. नाटकाचे वाचनदेखील पंचेंद्रियांनी करायची गोष्ट आहे व नाटकाचे सादरीकरण हा मानवी अनुभव असला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते.
विजय तेंडुलकर हे तर नुसत्या आपल्या नजरेने समोरच्या माणसाचा एक्स-रे काढायचे. त्यांचे ते डोळे आणि त्यांची नजर मी माझ्या कामाच्या वेळी आठवतो. ‘हे’ जर त्यांनी पाहिले असते तर ते काय म्हणाले असते हा विचार मला मार्गदर्शक ठरतो.
त्याशिवाय अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर त्याचबरोबर माझे सहप्रवासी वामन केंद्रे, चंद्रकांत कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, विनय आपटे, दिलीप कोल्हटकर, प्रकाश बुद्धिसागर, कुमार सोहनी, प्रदीप मुळ्ये, राजन भिसे ही सारी मंडळी एका अर्थाने आपली गुरूच होतात.
ते काय करतात हे पाहून आपणही अनेक गोष्टी करत असतो. कलेच्या क्षेत्रात जिथे जिथे संवाद होत राहतो तिथली सारी माणसे तुमची गुरु होतातच. एकेकाळी ज्ञानेश्वर नाडकर्णी, कमलाकर नाडकर्णी, पुष्पा भावे, माधव वझे, जयंत पवार यासारखे दिग्गज टीकाकार आपली कानउघडणी करायचे आणि त्यातूनच आपण शिकत जायचो.
आपल्याच सहकाऱ्यांनी एकमेकांच्या उरावर बसून केलेली घनघोर चर्चा देखील मला खूप काही शिकवून गेली आहे. माझ्या असंख्य गुरूंचा हा एक कोलाज आहे. या कोलाजमधील कुठला ना कुठला घटक घटक मला माझी निर्मिती करताना उपयोगाला येतो. या सर्वांचे स्मरण गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्हायला हवे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.