
Guitar Fish in Goa : सागर आणि सह्याद्रीत वसलेल्या गोव्याच्या भूमीला समृद्ध आणि वैविध्यपूर्ण असा जैवसंपदेचा वारसा लाभलेला आहे. हल्लीच गोव्यातल्या विश्व प्रकृती निधीच्या गोवा शाखेच्या संशोधकांना जगातला महाकाय असा मोठ्या नाकाचा गिटार मासा पणजीतल्या करंझाळे येथील समुद्री पाण्यात मृतावस्थेत आढळला. यापूर्वी संशोधकांना 93 सेंटिमीटर लांबीचा जो गिटार मासा आढळला होता, त्यापेक्षा आकाराने मोठा असलेला सदर प्रजातीचा हा मासा 114.3 सेंटिमीटर होता. मत्स्य संशोधकांच्या अभ्यासानुसार जगातला सगळ्यात महाकाय मासा ठरल्याने गोव्यातल्या सागरी जैवसंपदेचे महत्त्व त्यामुळे प्रकाशझोतात आले आहे.
खरे तर जीवसृष्टीच्या उत्क्रांतीच्या प्रवासातला मासा हा पहिलाच मणकेधारी जीव असून त्याने गेल्या 50 कोटी वर्षांच्या कालखंडात निरनिराळ्या हवामानाशी निरनिराळ्या अशा परिसंस्थांशी जुळवून घेत आपले अस्तित्व टिकवलेले आहे. आपल्या कल्पनेपेक्षा माशांच्या प्रजातीत जगभरात विविधता आहे. गोव्याला निसर्गदत्त जो अरबी सागर लाभलेला आहे, त्याच्या 105 किलोमीटरच्या किनारपट्टीशी संलग्न असलेल्या क्षेत्रात माशांचे जे वैशिष्ट्यपूर्ण वैभव आहे त्याचे संशोधन करण्याचे काम विश्व प्रकृती निधी, गोवा शाखेमार्फत एप्रिल 2021 पासून सुरू आहे. सागरी संवर्धन मोहिमेचे वरिष्ठ संयोजक आदित्य काकोडकर आणि त्यांच्या चमूमध्ये समाविष्ट असणार्या संशोधकांनी आतापर्यंत विविध प्रजातीतल्या 77 व्यक्तिगत गिटार माशांची गोव्यात नोंद केलेली आहे.
गोव्यातल्या करंझाळेच्या खालोखाल बाणावलीत गिटार माशांचे वास्तव्य आढळलेले आहे. इथल्या रापणकारांच्या जाळ्यात मोठ्या नाकाचा गिटार मासा सापडल्याने राज्याच्या नैसर्गिक संपदेचा लक्षणीय वारसा विशेष चर्चेत आलेला आहे. गोव्यात खार्या आणि गोड्या पाण्यात मासे आढळत असले तरी दोन्ही प्रकारच्या माशांची श्वसनसंस्था भिन्न असते. मोठ्या नाकाचा गिटार मासा हवेतील ऑक्सिजनचे श्वसन करतो आणि त्याची मादी अंडी न घालता पिल्लांना जन्म देते. त्यानंतर ही पिल्ले समुद्रातल्या खार्या पाण्यात पोहताना जगण्यासाठी वारेमाप संघर्ष करतात. जेव्हा भल्यामोठ्या यांत्रिक बोटी वापरून मोठ्या जाळ्यांच्या मदतीने व्यापक प्रमाणात मासे पकडले जातात, तेव्हा खाद्यान्न म्हणून उपयुक्त असणार्या आर्थिकदृष्ट्या महत्त्व नसल्याचे मानल्या जाणार्या गिटार माशांची मच्छीमार समाज विशेष दखल घेत नाही. त्यामुळे, त्यांच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष होत असते. करंझाळेत पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे इथले मच्छीमार रापणीचा वापर करत असल्याने त्यांच्या जाळ्यात सापडलेल्या मोठ्या नाकाच्या गिटार माशाचा आकार सर्वसाधारण गिटार माशांपेक्षा जादा दृष्टीस पडल्याने, ही माहिती प्रकाशात आणण्याची कामगिरी मत्स्य संशोधकांनी केलेली आहे.
हा मासा खाद्यान्न म्हणून गोव्यात वापरला जात नसला, तरी पर्यावरणीय परिसंस्थेत त्याचे योगदान आहे. निसर्गातली अन्नसाखळी अव्याहत ठेवण्याच्या दृष्टीने त्याचा सहभाग असतो. मोठ्या नाकाचा गिटार माशाची प्रजाती ही शार्क आणि रे माशाच्या प्रजातींशी साधर्म्य असलेली आहे. भरती ओहोटी परिसरात त्यांचे वास्तव्य असते. पूर्वीच्या काळी हा मासा रापणीच्या जाळ्यात सापडला तर, त्याला सूर्यकिरणात वाळवल्यानंतर त्याचा आस्वाद काही मंडळी घेत असत, असे सांगितले जाते.
हा मासा आकाराने पाहायला गिटार या संगीतातल्या वाद्यासारखा दिसत असल्याने आणि त्याचे नाक या प्रजातीला इतर माशांपेक्षा काहीसे मोठे असल्याने त्याचे नामकरण ‘मोठ्या नाकाचा गिटार मासा’ असे करण्यात आले. विश्व प्रकृती विधी भारताच्या गोवा शाखेतर्फे कार्यान्वित असलेल्या ‘सागरी जैवसंपदेचे संवर्धन आणि संरक्षण’ या प्रकल्पाचे संयोजक म्हणून काम करणार्या आदित्य काकोडकरला आर्थिकदृष्ट्या मच्छीमार समाजातर्फे दुर्लक्ष केल्या जाणार्या या माशाचे वैज्ञानिक संशोधनाच्या दृष्टिकोनातून असलेले महत्त्व लक्षात घेता, सागरी पर्यावरणीय परिसंस्थेत या माशाचे स्थान किती गरजेचे आहे, याचे आकलन झालेले आहे. त्यामुळे खवय्यांसाठी अस्पृश्य गणला गेलेला हा मासा अन्य पक्षी आणि प्राण्यांसाठी अन्नाचा घटक ठरला आहे. या माशाच्या एकूण ज्ञात सात प्रजातींपैकी सहा प्रजाती अत्यंत संकटग्रस्त प्राण्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
भारतात पांढर्या ठिपक्यांच्या गिटार माशाला भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याद्वारे संकटग्रस्त घोषित करण्यात आले आहे. आपल्या गोव्यात मोठ्या नाकाच्या गिटार माशाप्रमाणे टोकदार नाकाच्या आणि पट्टेरी नाकाच्या गिटार माशाच्या प्रजातीचे वास्तव्य इथल्या सागर किनारी असल्याचे स्पष्ट झालेले आहे. या सार्या प्रजातींतले गिटार मासे आंतरराष्ट्रीय संवर्धन संघटनेच्या यादीनुसार संकटग्रस्त आहेत.
या माशाच्या शरीराच्या दोन्ही बाजूला बाहेर आलेला एक छोट्या पंख्याप्रमाणे अवयव असतो, याला ‘फिन’ म्हणतात, त्याच्या दोन जोड्या असतात. खरे तर मासा अशा फिन व शेपूट यांच्या साहाय्याने पाण्यात पोहताना दिशा बदलतो व काही प्रमाणात तोल सांभाळत असतो. या माशाला श्वसनासाठी एक खास अवयव असतो, त्याला ‘कल्ले’ म्हणतात. या कल्ले आणि फिन अशा दोन अवयवांना अन्य देशातल्या खवय्यांकडून मागणी होत असल्याने त्यासाठी भारताबाहेर या अवयवांची तस्करी करण्यात येते. या अवयवांचा उपयोग सूप तयार करण्यासाठी केला जातो. पारंपरिकरीत्या अशा टाकाऊ गणल्या जाणार्या माशांचा पूर्वी कसा वापर केला जायचा, त्याविषयीची माहिती गोळा करणे, शक्य झाले तर त्यांच्या अवयवांसाठी होणारी तस्करी थांबवण्यासाठी सरकारमार्फत कायदेशीरदृष्ट्या प्रयत्न करता येतील.
गोव्यातल्या सागरी किनारपट्टीवरच्या सतरा ठिकाणी या प्रजातीचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. पूर्वीच्या तुलनेत गोव्यात सध्या गिटार मासे सापडण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. गोवा राज्य सागरी पर्यटनासाठी देश विदेशातल्या पर्यटकांसाठी आकर्षण बिंदू ठरलेले आहे. त्यामुळे, समुद्रात पर्यटकांसाठी जे उपक्रम हाती घेतले जातात त्यावेळी बर्याचदा अशा माशाच्या अधिवासात घुसखोरी होत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. पूर्वीच्या काळी हे मासे कमी प्रमाणात दृष्टीस पडत होते. परंतु, सध्या त्यांचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवत आहे. त्याला, रापणीच्या ऐवजी मासेमारी करण्यासाठी ट्रॉलरचा होणारा वापर विशेष कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. रापणीच्या जाळ्यातल्या माशासमवेत खाद्यान्नाबरोबर अन्य गौण समजल्या जाणार्या माशांच्या प्रजाती आढळतात. करंझाळे येथील मच्छीमार रापणीद्वारे आजही मासेमारी करतात आणि त्यावेळी सापडलेल्या मोठ्या नाकाच्या गिटार माशाचे अस्तित्व त्यांच्या नजरेस पडल्याकारणाने आणि याविषयी सर्वेक्षण संशोधन करणार्या चमूने त्याच्या आकाराचे आणि लांबीचे त्वरित मोजमाप केल्यावर हा मासा जगातला आजपर्यंत सापडलेल्या माशांत आकाराने मोठा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भक्ष्य भक्षकाच्या साखळीत मासा समुद्रातील कवच असलेले व नसलेले प्राणी, लहान मासे व समुद्री वनस्पती खात असतो. तर मासा हा माणसाबरोबर इतर अनेक प्राण्यांचे अन्न ठरलेला आहे. मोठा नाकाचा गिटार मासा खेकडे आणि इतर छोट्या मोठ्या माशांना खाऊन जगतो, तर त्याला खाऊन अन्य प्राणी गुजराण करतात. आगामी हवामान बदल आणि सागरी पाण्याच्या पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन गोव्यासाठी मोठ्या प्रमाणात पौष्टिक अन्नांची रसद पुरवणार्या सागरातल्या माशांबरोबरच अन्य जलचरांचाही अभ्यास आणि संशोधन करणे महत्त्वाचे आहे.
-राजेंद्र पां. केरकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.