Ramesh Tawadkar Interview
पणजी: मंत्री गोविंद गावडे आणि माजी मंत्री प्रकाश वेळीप यांचा नाद मी केव्हाच सोडून दिला आहे. ‘उटा’ संघटनेच्या मेळाव्याचे साधे निमंत्रणही मला देण्याचे सौजन्य त्यांनी दाखविले नाही, तशी अपेक्षाही नव्हती.
आदिवासी समाजासाठी मी काय केले आणि काय करत आहे याची जाणीव समाजाला आहे, असे सभापती डॉ. रमेश तवडकर यांनी ‘गोमन्तक’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. त्यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरे अशी...
प्रश्न ः आदिवासी समाजासाठी सर्वांत आधी काम केल्याचा दावा आहे?
उत्तर ः ‘उटा’चे काम सुरू झाले नव्हते, त्यावेळी ‘गाकुवेध’ चळवळीचे काम आम्ही हाती घेतले. आम्ही म्हणजे आदर्श युवक संघाचे कार्यकर्ते आणि मी. ७ सप्टेंबर २००० रोजी मेळावा घेतला. ‘गोमन्तक’ने पहिल्या पानावर अर्धे पान प्रसिद्धी दिली आणि आमचा हुरूप वाढला. पुढेही ‘गोमन्तक’ने आम्हाला सातत्याने पाठिंबा दिला.
१९९६ पासून समाजासाठी मी काम सुरू केले होते. आदर्श युवक संघाच्या माध्यमातून ते सुरू होते. त्यावेळी आज नेते म्हणवणारे कुठे होते ते त्यांचे त्यांनाच माहीत. आज ‘उटा’च्या माध्यमातून समाजाचा मेळावा घेणारे माजी मंत्री प्रकाश वेळीप यांनी वेगळी भूमिका घेतली होती. त्यांना ‘मोअर ओबीसी’ म्हणजे ओबीसीमध्ये वेगळा गट हवा होता. तसा ठरावही त्यांनी विधानसभेत मांडला होता. ते समाजांना आदिवासी समाजाचा दर्जा मिळण्याच्या बाजूने नव्हते.
प्रश्न ः गोविंद गावडे यांनी मेळाव्यात टीका केली, त्याकडे कसे पाहता?
उत्तर ः मंत्री गोविंद गावडे हे कार्यकर्ता म्हणून २००७ च्या दरम्यान आंदोलनात मला भेटले. त्याआधी ते आंदोलनात नव्हते. पुढे ते आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री झाले. मी आदिवासी कल्याण खात्याचा मंत्री असताना समाजासाठी २५ योजना मार्गी लावल्या.
त्या योजनांतील त्रुटी पुढे करून त्यांची अंमलबजावणी कशी होणार नाही, हे पाहण्यासाठी गावडे यांनी पाच वर्षे खर्ची घातली. आताही त्यांना समाजाची आठवण का येत आहे, याची कारणे सर्वांना माहीत आहेत.
प्रश्न ः वेळीप यांच्यावरही आपला रोख दिसतो?
उत्तर ः वेळीप आता सर्वांसोबत असले तरी त्यांनी वेगळी चूल मांडली होती. त्यांना समाजांना आदिवासी दर्जा मान्य नव्हता. मी १९९६ पासून काम करत आहे. चळवळी या काणकोणातून सुरू झाल्या आणि माझ्याच घरी बैठका होत होत्या. वेळीप यांनी वेगळी चळवळ सुरू केली होती, याचा विसर त्यांना व इतरांना पडला असेल. मी सातत्याने समाजाचाच विचार करत आलो आहे. गोमंतक गौड मराठी समाज या मूळ संघटनेच्या माध्यमातून आदिवासी दर्जा मिळाला तर काय, याची जागृती करण्यासाठी यात्रा काढण्याचे ठऱवले होते. त्याच्या तयारीसाठी केपे येथे झालेल्या बैठकीतून वेळीप निघून गेले. आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही ‘उटा’चे सदस्य नसतानाही ‘उटा’च्या नावाने यात्रा काढण्यास मान्यता दिली होती.
प्रश्न ः आदिवासी दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न केल्याचा तुमचा दावा आहे?
उत्तर ः अर्थातच. ‘गाकुवेध’चे आंदोलन त्यासाठी होते. स्व. मनोहर पर्रीकर यांनी या मागणीसाठी दिल्लीत शिष्टमंडळ नेले, त्यात मी कार्यकर्ता म्हणून सहभागी झालो होतो. त्यावेळी मी साधा आमदारही नव्हतो. यावरून मी समाजासाठी करत असलेले काम लक्षात येते. तत्कालीन केंद्रीय मंत्री लालकृष्ण अडवाणी यांची आम्ही भेट घेतली. पुढे २००३ मध्ये गावडा, कुणबी, वेळीप समाजाला आदिवासी दर्जा मिळाला. पुढे २००५ मधील पोटनिवडणुकीत मी आमदार झालो. २०१२ साली मंत्रीही झालो.
प्रश्न ः आदिवासी कल्याण खाते मिळाल्यानंतर सर्वांनी एकत्र काम केल्याचे कधी दिसले नाही?
उत्तर ःत्या निवडणुकीत प्रकाश वेळीप यांना उमेदवारी मिळाली नव्हती, तर गोविंद गावडे पराभूत झाले होते. त्यामुळे त्यांनी समाजाच्या कल्याणाऐवजी आपल्या मुद्यांवरच अधिक लक्ष केंद्रीत केले. मी त्यांना माझ्याविरोधात बंड करणार तर करा, असे थेट सांगितले. मी कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीवर भर दिला. पुढे २०१७ मध्ये मला भाजपची उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे मी राजकीयदृष्ट्या संपलो, असे समजून या द्वयींनी मला पाच वर्षे डिवचण्याचेच काम केले. आमदार नसतानाही मी सुरू केलेला लोकोत्सव असो किंवा बलराम विद्यालय असो, ही समाजासाठीची कामे पुढे नेण्यावरच मी भर दिला.
प्रश्न ःआदिवासींचे नेते असा शिक्का तुम्हाला नको, असा आऱोप होत आहे?
उत्तर ः तसे ते नाही. नेता हा सर्व समाजाचा असतो. एखाद्या आमदाराला केवळ आदिवासीच नव्हे, तर सर्व समाज मतदान करतो. आदिवासी समाजातून मी येत असल्याने आदिवासी समाजाच्या कल्याणाचा विचार करत राहणे साहजिक आहे, ते नैसर्गिक आहे. याचा अर्थ इतर समाजाच्या कल्याणाचा विचार करायचाच नाही, असे नाही. समाजकारणात सर्वांना न्याय देण्याची भावना असली पाहिजे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोचला पाहिजे. आदिवासी समाजासाठी खास योजना हव्यात; कारण अनेक वर्षे ते विकासापासून वंचित राहिले आहेत. याचा अर्थ इतरांसाठी योजना नको, असा होत नाही. सर्वांचेच कल्याण हे अंतिम ध्येय असले पाहिजे. त्यामुळे मी सर्व समाजाचा म्हटले, ते त्या अर्थाने आहे. आदिवासींसाठी मी काम करत आलो आहे आणि राहणार आहे. तसे करताना समाजाच्या इतर घटकांचा मला विसर पडणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.