Traffic Issue At Porvorim Due to Flyover Construction
पणजी: पर्वरी महामार्गावरील उड्डाण पुलाच्या बांधकामावेळी वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी पर्यायी अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येईल, असे सरकारने गोवा खंडपीठासमोर सांगितले आहे.
रस्त्याच्या बाजूने वाहनांची पार्किंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला सरकारने दिली. या रस्त्यावरील सुरक्षितता तसेच वाहतूक कोंडीसंदर्भातची जनहित याचिका मोसेस पिंटो यांनी सादर केली होती त्यावर प्राथमिक सुनावणी झाली. आता पुढील सुनावणी डिसेंबरमध्ये ठेवण्यात आली आहे.
या जनहित याचिकेवरील मागील सुनावणीवेळी गोवा खंडपीठाने सरकारला बैठक घेऊन या महामार्गावरील सुरक्षितता तसेच वाहतूक कोंडीसंदर्भात सूचना मांडण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार काल गिरी येथे वाहतुकीची कोंडी अपेक्षित असलेल्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांच्या अध्यक्षतेखाली विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
यामध्ये वाहतूक पोलिस अधीक्षक प्रबोध शिरवईकर, पीडब्ल्यूडी कार्यकारी अभियंता ए. डी. कार्व्हालो, वाहतूक पोलिस निरीक्षक संजीत काकोडकर, आरआरएसएम एजन्सीचे भट्टाचार्य उपस्थित होते. सांगोल्डा येथे असलेले वाहतूक सिग्नल ज्या ठिकाणी आहे तेथून ते हटवून इतर ठिकाणी बसवण्यात यावे.
सुरळीत वाहतुकीसाठी सांगोल्डा येथील रस्त्यावर ठेवण्यात आलेले ‘जीआय पाईप’ हटवण्यात यावेत. या भागातील रस्ता खडबडीत असल्याने त्याचे सपाटीकरण करून डांबरीकरण केले जाईल. वाहतूक वळवण्यात आलेला डॉ. सिडनी पिंटो निवास ते महिंद्रा शोरूमपर्यंतचा रस्ता रुंद केला जाईल व या रस्त्यावर वाहनांना पार्किंगसाठी बंदी केली जाईल.
पर्वरीत उड्डाण पुलाच्या कामामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीसाठी विविध सरकारी विभागांत समन्वयाचा अभाव असल्याचे कारण पुढे आले आहे. अपेक्षित वेळेत सेवा रस्त्यांचे रुंदीकरण व नव्या रस्त्यांचे उद्घाटन न झाल्यामुळे कोंडी होत आहे.
यामुळे स्थानिक आमदार म्हणून रोहन खंवटे यांनी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची बैठक घेत ५ डिसेंबरपर्यंत सर्व प्रश्न सोडवण्याचे निर्देश दिले आहेत. धुळीवर उपाय म्हणून पाणी फवारणीही वेळेत होत नाही,अशी कबुली खंवटे यांनी पर्वरीत पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग असा भेद करत बसू नका असे अधिकाऱ्यांना सांगितले आहे. दिवाळीच्या कालखंडात वाहतूक वाढली आहे. पर्यटन हंगाम सुरू झाल्याने वाहतूक वाढलेली असेल.यासाठी पर्यायी रस्ते वेळेत पूर्ण होणे गरजेचे होते ते झालेले नाहीत. १५ दिवसांनी पुन्हा आढावा बैठक घेणार आहे, असेही खंवटे यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.