- आसावरी कुलकर्णी
Goa Culture: प्रत्येक माणसाला काही न काही तरी छंद असतो. अगदी सहज म्हणून सुरू केलेला छंद कधी कधी मोठं काहीतरी घडवून जातो. काहीजण छंद फक्त आत्मसंतोषासाठी जोपासतात, तर काही लोकांसाठी छंद आयुष्याची दिशा, एक ध्येय बनून जाते.
गोव्यातील सत्तरी तालुक्यामधल्या केरी गावचे सुपुत्र श्री गोपीनाथ गावस. हाडाचे शिक्षक, लोककलाकार, कवी, लोकवेद अभ्यासक, विचारवंत, ग्रामीण कोकणी भाषेचे संवर्धक, सजग लेखक आणि नाट्यकलाकार अशा विविध पैलुंनी नटलेलं व्यक्तिमत्व. गेल्या 3 दशकांच्या आपल्या अनोख्या छंदातून नकळत घडत गेलेल्या लोक वस्तू संग्राहलया बद्दल उत्साहाने बोलतात.
लहानपणापासून आपले काका महादेव गावस आणि वडिलांकडून शिमग्यातली गीते, सोकारती, जती, अशा लोकगीतांची लोकवारशाची माहिती मिळाली. याचाच अभ्यास करताना जुन्या काळात वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचे संकलन करण्याचा छंद लागला.
सुरवातीला आपल्याच कुटुंबियांकडे असलेल्या वस्तू आणि हळूहळू मग जिथे या वस्तू मिळतात तिथून गोळा करण्याचे काम सुरू झाले. 1995 सालापासून सुरू झालेला हा प्रवास आज लोकसंग्रहलायाच्या रुपात समूर्त झाला आहे.
आज या लोकसंग्रहलयात 3000 हुन जास्त जुन्या काळात दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्या वस्तू आहेत. अगदी 100 वर्ष जुन्या वस्तू ज्याबद्दल आजच्या पिढीने कधी विचारही केला नसेल अशा वस्तूंचा यात समावेश आहे.
यात दिव्यांचे 25 हून अधिक प्रकार, 50 च्या वर मातीची भांडी, तांब्याची, पितळेची भांडी, 2000 हून अधिक प्रकारची नाणी अशा विविध वस्तू आहेत. जीवनशैली बदलल्यामुळे या दैनंदिन वापरातल्या वस्तू नामशेष झाल्या आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत.
आमचे दायज लोकजीण संवर्धन मांड या संस्थेतर्फे गोपीनाथ यांनी 28 ठिकाणी आपल्या वस्तूंचे प्रदर्शन केले आहे. लोकोत्सव, साहित्य संमेलन, शाळांचे प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमात हे प्रदर्शन करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.
त्यांच्या या उपक्रमाचे मोठमोठ्या राजकीय व्यक्ती, प्रसिद्ध व्यक्तिमत्व तसेच विद्यार्थ्यांकडून कौतुक झाले आहे. यातल्या काही वस्तू काहींनी दान केल्या तर बऱ्याचशा वस्तू त्यांनी स्वतः विकत घेतल्या आहेत. आजपर्यंत 10 लाख रुपये घालून या वस्तू त्यांनी जमविल्या आहेत.
जुन्या काळातल्या या नामशेष होणाऱ्या वस्तू आपल्या पूर्वजाचे जीवन समजून घेण्यास मदत करतात. आजकालच्या विद्यार्थ्यांना केवळ इंटरनेटवर नव्हे तर प्रत्यक्षात या वस्तूंचे दर्शन घेणं शक्य होईल. हे काम करताना वडील, भाऊ, पत्नी इतकेच नव्हे तर संपूर्ण गावस कुटुंबीयांनी खूप मदत केली अस ते सांगतात.
प्रदर्शन भरवण्यात समीर प्रभू, महादेव गावकर, इत्यादी व्यक्तींचे खूप सहकार्य लाभले. केळावडे गावचा सूर्यकांत गावस स्वतःच्या जबाबदारीवर या वस्तू प्रदर्शनात नेण्यासाठी आपली रिक्षा विनामूल्य देतात. या सगळ्यांच्या मदतीमुळेच हे लोकसंग्राहलय उभे होत आहे. हे लोकसंग्राहलय 28 जानेवारीपासून सर्वांना खुले झाले आहे.
गोव्यातल्या शाळेच्या 20 मुलांसाठी प्रवेश मोफत असेल आणि वरच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 20 रुपये आकारण्यात येतील. पर्यटक आणि इतर लोकांसाठी प्रतीव्यक्ती 100 रुपये आकारण्यात येणार आहेत. ज्यांना आपल्या वस्तू दान द्यायच्या असतील किंवा विकत द्यायच्या असतील तर त्या स्वीकारल्या जातील, असं ते म्हणाले.
नविन राष्ट्रीय शिक्षण धोरणासाठी पूरक असे हे लोकसंग्रहालय आहे, असं ते आवर्जून सांगतात. गोव्यातल्या लोकजीवनाच्या संचिताचे संवर्धन करून नवीन पिढीला त्यांचे दर्शन घडविणाऱ्या गोव्यातल्या पहिल्या लोकवस्तूसंग्राहालयाला आवर्जून भेट द्यायलाच हवी.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.