एबिगेल क्रेस्टो
काही घरे कॉक्रीट आणि मजले यापेक्षा अधिक काहीतरी असतात. त्या घरांमध्ये राहणाऱ्या माणसांची ती प्रतिबिंबे असतात आणि त्यांना स्वतःचा एक वैशिष्ट्यपूर्ण तोंडवळा असतो. फ्रेम करुन ठेवलेल्या आठवणींनी सजलेल्या भिंती, घरात असलेल्या अनमोल कलाकृती, तिथल्या लाकडी कलाकुसरीत रेंगाळणारा गंध यासह ही घरे आपल्या कथा आणि इतिहास घेऊन उभी असतात.
‘आमची ही वारसा घरे, त्यात राहणार्या लोकांच्या जीवनाबद्दल अगणित कथा सांगत असतात’, असे वास्तूविशारद गोल्डा परैरा यांना वाटते. गोव्यातील अनेक वारसा घरांच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांवर त्यांनी काम केले आहे.
गोव्यात जन्मलेल्या गोल्डाने ‘गोवा कॉलेज ऑफ आर्किटेक्टर’ मधून पदवी प्राप्त केली. सुमारे १ वर्ष चार्लस कुरैया फाउंडेशनमध्ये शिष्यवृत्तीवर काम केल्यानंतर गोमंतकीय वास्तूविशारद अमीत सरदेसाई यांच्याकडे काही काळ तिने काम केले. कामा करताना तिला आत्मविश्वास येत गेला व तिने स्वतंत्रपणे काम सुरु करायचे ठरवले. तेव्हापासून ती पडझड झालेल्या गोमंतकीय घरांमध्ये एक नवीन प्राण फुंकत आली आहे.
घरांच्या पूर्व-संरचनेचा गाभा अबाधित ठेऊन, समकालीन गरजांना सुसंगत ठरतील अशा रचना ती त्यात सफाईने अंतर्भूत करते.
‘जुन्या काळी अशा घरांची बांधणी करणे आजच्या इतके सोपे गेले नसेल. ही घरे बांधण्यासाठी खचितच फार विचार आणि वेळ यांची गुंतवणूक केली गेली आहे’ असा निष्कर्ष ती बोलून दाखवते. ‘मला या घरांच्या बाल्कनीमधला खास आमचा असा ‘सोपो’ खूप आवडतो. घरातील सर्वांनी एकत्र जमण्याची ती एक सुंदर जागा आहे.
सुंदर आकाराची छपरे, सिमेंट ऑक्साईडच्या फरशी, लॅटराइटच्या भिंती, बसण्याची व्यवस्था असलेल्या खिडक्या आणि अंगण आशा स्वरूपाचे, निसर्गाच्या सान्निध्यातले ते एक सुंदर विरामस्थळ असायचे.’ वसाहतकालीन घरांचे एक सुंदर चित्रच गोल्डा बोलता-बोलता डोळ्यांसमोर उभे करत होती.
गोल्डाच्या मते गोव्याच्या वास्तूकलेचा ‘पोर्तुगीज वास्तूकला’ असा चुकीचा अर्थ लावला जातो. वास्तूरचनेला ती त्या-त्या प्रदेशाचे अविभाज्य अंग मानते. ती म्हणते, ‘ घरे आम्हाला आमचे स्थान, तिथले हवामान, निसर्ग आणि जीवनशैलीबद्दल खूप काही सांगतात. पारंपरिक अंगण असलेली पुराण्या शैलीची अंतर्मुख घरे असोत वा लांबलचक व्हरांड्यांची उंच प्लिंथ असलेली भव्य घरे असोत, ती त्या त्या समाजाच्या जीवनपद्धतीला साजेशा असणाऱ्या रचना असतात.
गोल्डा आपल्या नव्या प्रकल्पाची सुरुवात कशी करते? सर्वप्रथम ती तिच्या क्लायंटला कामाच्या जागी भेटते. ‘ड्रॉईंग सुरु होण्याआधी बरेच काम साईटवरच होत असते’ असे ती म्हणते. ‘ घराच्या अंतर्भागातील अवकाशाचा अन्वयार्थ लावून, त्यात हवेला खेळवणे आणि त्याच्या संरचनेत प्रकाश आणि जीवन याची रुजवात करणे तिला आवडते. नवीन प्रकल्प हाती घेताना त्यात आव्हानात्मक काहीतरी असावे अशीच गोल्डाची सुप्त इच्छा असते. कामातील आव्हान तिला अधिक उर्जा देते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.