Comunidade Land: कोमुनिदाद संहिता बदलण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही!

Goa Comunidade: ‘गोंयची गांवकारी’चे अध्यक्ष रेमेडियस फर्नांडिस यांनी केला दावा
Goa Comunidade: ‘गोंयची गांवकारी’चे अध्यक्ष रेमेडियस फर्नांडिस यांनी केला दावा
Goa ComunidadeDainik Gomantak

गोव्यात असलेल्या कोमुनिदाद किंवा गावकरी जमिनीत उभारलेली अवैध बांधकामे वैध करता येत नाहीत तसेच कोमुनिदाद संहितेतील कलम १७ (१) (२) आणि असे इतर कायदेही बदलण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, असे ठाम मत ‘गोंयची गांवकारी’चे अध्यक्ष रेमेडियस फर्नांडिस यांनी व्यक्त केले.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात कोमुनिदाद जमिनींवरील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याविषयी कोणतेही विधेयक मांडणार नसल्याचे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी गुरुवारी सांगितले.

गेल्या वेळी आम्ही अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार कोमुनिदादला देणारी दुरुस्ती केली होती. अनेक कोमुनिदादी याच्या बाजूने आहेत, अशी पुष्टीही त्यांनी जोडली होती. त्यांचे हे वक्तव्य दिशाभूल करणारे आहे. किती कोमुनिदादींनी याला पाठिंबा दिला आहे, याचा तपशील जाहीर करावा, असेही फर्नांडिस पुढे म्हणाले.

सर्व कोमुनिदाद जमीन ही सरकारी जमीन नाही, हे जाहीरपणे कबूल कराल का? किती बेकायदेशीर बांधकामे पाडणे आणि निष्कासित करणे बाकी आहे, याचा तपशीलवार अहवाल सरकार देणार का? सार्वजनिक परिसर कायदा २०२३ बेकायदेशीर म्हणून घोषित करून रद्द करणार का?

कोमुनिदादचे प्रशासक कार्यक्षम नाहीत, असे म्हणता तेव्हा सरकारला उत्तम प्रशासक नेमण्यासाठी ‘गोंयची गांवकारी’ची मदत हवी आहे का, असे प्रश्‍नही फर्नांडिस यांनी यावेळी विचारले.

कोमुनिदाद जमिनींचे जतन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ही जमीन गोमंतकीयांकडेच राहावी, भावी पिढ्यांसाठी नैसर्गिक संपत्ती म्हणून संरक्षण करायचे असल्यास ती विकू न देणे, रूपांतरित होऊ न देणे अत्यावश्यक आहे.

कोमुनिदाद जमिनींवरील बेकायदेशीर बांधकामांना नियमित करण्याचा आणि मंजुरी देण्याचा अधिकार कुणालाही नसताना गटविकास अधिकारी, एडीपी, डीडीपी, डीओपी, जिल्हाधिकारी, टीसीपी कलेक्टर आणि इतर संबंधित सरकारी विभाग निरर्थक कारणे पुढे करून आमदार आणि नोकरशहांना जमीन बळकावण्याची परवानगी देण्याच्या आदेशात फेरफार करत आहेत. अशा सर्व अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही फर्नांडिस यांनी केली आहे.

Goa Comunidade: ‘गोंयची गांवकारी’चे अध्यक्ष रेमेडियस फर्नांडिस यांनी केला दावा
Comunidade Land: 'कोमुनिदाद'ला अधिकार मिळणार! अतिक्रमणे नियमित होणार...

विरोध कायमच!

कोमुनिदादची जमीन भूमिहीन स्थलांतरितांना दिली जाऊ शकत नाही. असे असतानाही सर्व स्थलांतरितांचा समावेश करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचे दिसते. कोमुनिदादच्या संहितेत बदल करण्याचा घाटही अवैध बांधकामे नियमित करवून घेण्यासाठी घातला जात आहे. त्याला ‘गोंयची गांवकारी’चा कायमच विरोध असेल, असेही फर्नांडिस पुढे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com